आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक व्यक्तिकेंद्रित पक्ष आहे. अवघे १७ वर्षे वय असलेल्या या पक्षाने राज्यात १५ वर्षे सत्ता उपभोगली आहे हा शरद पवारांचा व्यक्तिगत करिश्मा आहे. पण यापुढे शरद पवारांच्या पुण्याईवर राष्ट्रवादी काँग्रेसला फार काळ राजकारण करता येणार नाही हे उघड आहे.

नगर परिषदांच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून मान्यता पावलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार चौथ्या स्थानावर फेकला गेला आणि त्याच वेळी हिंदुत्वनिष्ठ पक्ष म्हणून ओळखला जाणारा भाजप मात्र ग्रामीण भागात आपली मुळे रोवतानाच पहिल्या स्थानी आला. एक मराठवाड्याचा आणि त्यातल्या त्यात धनंजय मुंडे यांच्या परळीचा अपवाद वगळता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच फटका बसला.

आता दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानात राष्ट्रवादीला जर चांगली कामगिरी करता आली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याचाच प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही हे उघड आहे. राष्ट्रवादीचा जो पराभव झाला त्यास पक्षांतर्गत गटबाजीसह अन्य अनेक कारणेही कारणीभूत असू शकतात. पण दलित, बहुजन ओबीसी समाजाचा विश्वासच गमावल्यामुळे या पक्षास नगर परिषदांच्या निवडणुकीत दारुण पराभवास सामोरे जावे लागले हे उघड आहे.

शरद पवारांची गत पन्नास वर्षातील राजकीय कारकीर्द पाहता ते समतेचे राजकारण करणारे नेते म्हणूनच ओळखले जातात याविषयी शंका बाळगण्याचे काही कारण नाही. पण सत्तेसाठी शरद पवार काहीही करू शकतात हेही उघड आहे. उदा १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांचा विश्वासघात करून पवार साहेबांनी जनसंघाच्या (आजचा भाजप) मदतीने पुलोदचे मुख्यमंत्रिपद भूषविले होते. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपस सरकार बनविण्यासाठी बहुमत मिळालेले नसताना भाजपने न मागताही शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ केला होता.

शरद पवारांचे राजकारण तसे अगम्यच राहत आले आहे. १९९९ मध्ये शरद पवारांनी साेनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे काँग्रेस बाहेर पडावे लागले होते. १९९९ सालीच झालेल्या विधनसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले नव्हते.
काँग्रेस व राष्ट्रवादीने सुद्धा स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्यामुळे हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे सरकार स्थापू शकत नव्हते. त्यावेळी भाजपा-सेना- राष्ट्रवादीस सरकार बनिवण्यासाठी खाणाखुणा करीत होते. पण तेंव्हा शरद पवारांनी केंद्रात काँग्रेसशी असलेला भांडणाचा मुद्दा राज्यात आणण्याचे काही कारण नाही अशी भूमिका घेऊन राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आणून १५ वर्षे सत्ता उपभोगली. शरद पवार स्वत: केंद्रात कृषीमंत्री राहीले. तेच पवार २०१४ साली न मागताही भाजपास कसा काय पाठिंबा देऊ शकतात? तर याचे उत्तर शरद पवारांचे सत्तेचे राजकारण हे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या मैत्रीलाही आता बहर आला आहे. एक सुसंस्कृत-शालिन राजकारण म्हणून मोदी-पवारांच्या मैत्रीवर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. पण दिसते तितकी ही मैत्री सरळ आहे काय? तसे मात्र दसित नाही. मोदीना भारत काँग्रेसमुक्त करायचा आहे. शरद पवार सुद्धा काँग्रेसला शत्रूच मानतात. या पार्श्वभूमीवर २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचा पराभव करून परत एकदा पंतप्रधान व्हावे असा मोदींचा उद्देश असणार हे उघड आहे.
आपल्या उद्दिष्ठपूर्तीसाठी महाराष्ट्रात शरद पवारांची मैत्री लाखमोलाची ठरू शकते असा पंतप्रधान मोदींचा होरा असू शकतो. तात्पर्य लोकशाही-धर्मनिरपेक्ष मूल्यांना छेद देणारे हे जे राजकारण आकार घेऊ पाहत आहे त्यास विरोध असणाऱ्या मतदारांनी नगरपरिषद निवडणूकीत राष्ट्रवादी विरोधी मतदान केलयाची शक्यताही नाकारता येत नाही. शरद पवारांनी दलित समाजाविषयी नेहमीच अस्था दाखविली हे खरे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठास देऊन त्यांनी नामांतराचे अग्निदिव्य यशस्वीपणे पैलतीरी लावले हे मान्य रामदास आठवलेनाही त्यांनी सत्तापदे दिली हे कबूल पण मराठा मूक मोर्चाना चुचकारण्यासाठी त्यांनी अॅट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भात जी वादग्रस्त विधाने केली ती ही राष्ट्रवादी काँग्रेसला भोवली व दलित मतदार राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावला.

अॅट्रॉसिटी कायद्याच्या दुरूस्तीची भाषा केल्यामुळे मराठा मतदार शरद पवार यांचेवर खूष होऊन राष्ट्रवादीच्या बाजूने उभा राहिला असेही काही घडले नाही. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य नेते मराठा मूक मोर्चे आमच्या विरूद्ध नसून सरकारविरूद्ध आहेत असे सांगत आले पण ते तितकेसे खरे नाही. मराठा मूक मोर्चाचा सरकारविरोधी रोष असू शकतो हे खरे. पण आपल्या दुर्दशेला दिर्घकाळ सत्ता भोगणारे काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीलाही नाकारले हे कसे नाकारता येईल? दुसरीकडे धनगर-माळी समाजाचाही जनाधार राष्ट्रवादी काँग्रेसने गमावलेला दिसतो.
छगन भुजबळांसारखेच भ्रष्टाचाराचे आरोप राष्ट्रवादींच्या अन्य नेत्यांवर असताना ते बाहेर आहेत आणि भुजबळ तेवढे तुरूंगात आहेत. यामुळे माळी समाजही राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावला नाशिकमध्ये भुजबळांच्या समर्थनार्थ निघालेला मोर्चा याचेच घोतक होता. तात्पर्य राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांना वाचविण्यासाठी शरद पवार भाजपाशी मैत्री ठेऊन आहेत. हा जो जनतेचा समज झालाय तो फारसा चुकीचा आहे, असे तरी कसे म्हणावे?

आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने विचार करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अॅट्रॉसिटीचा कायदा बदलणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे दलित मतदारांनी भाजपाला मत दिले असेल तर तो रोगापेक्षा इलाजच भयंकर म्हणावा लागेल. काँग्रेस-राष्ट्रवादीने दलित समाजाची सतत उपेक्षा नि फसवणूकच केली हे जरी खरे असले तरी त्यामुळे भाजपा दलितांचा मित्र होऊ शकत नाही. भाजपाचा धर्माधिष्ठीत हिंदुत्ववाद आणि बाबासाहेबांची लोकशाही धर्मनिरपेक्षता या परस्परविरोधी विचारधारा आहेत.

भाजपाचा वियज म्हणजे आंबेडकरवादाचा पराभव होय याचे भान ठेऊन दलित राजकारणाने तिसरा सक्षम आंबेडकरी पर्याय ऊभा करणेच इष्ट ठरेल हा सुद्धा नगर परिषद निवडणूकांचा एक संदेश आहे हे विसरता येत नाही हेही उघड आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक व्यक्तिकेंद्रीत पक्ष आहे.अवघे १७ वर्षे वय असलेल्या या पक्षाने राज्यात १५ वर्षे सत्ता उपभोगली आहे हा शरद पवारांचा व्यक्तिगत करिश्मा आहे. पण यापुढे शरद पवारांच्या पुण्याईवर राष्ट्रवादी काँग्रेसला फार काळ राजकारण करता येणार नाही हे उघड आहे.
महाराष्ट्रात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यशस्वी राजकारण करावयाचे असेल तर काँग्रेसचा द्वेष त्यातून धर्मनिरपेक्ष- डाव्या पक्षांची साथ करून दलित, बहुजन, ओबीसी, अलुतेदार, बलुतेदार समाजाचा विश्वास संपादन करून त्यांचा पाठिंबा मिळवावा लागेल. मराठ्यांचा पक्ष ही पक्षाची प्रतिमाही बदलावी लागेल. पक्ष नेतृत्वाचा प्रश्नही मार्गी लावावा लागेल. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आव्हान कसे पेलू शकतो यावर पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे.
बी. व्ही. जोंधळे
बातम्या आणखी आहेत...