आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shirish Boralkar Article About One Hundred Days Of Fadnavis Government

यशस्वी शतकपूर्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर ते मुंबई हजार किलोमीटरचे अंतर असेल. येऊन-जाऊन दोन हजार किलोमीटर. भाजयुमोमध्ये (भारतीय जनता युवा मोर्चा) काम करत असताना एक तडफदार युवा नेता काही तासांच्या बैठकीसाठी स्वत: मोटार चालवत मुंबईला येत असे. मोठे अप्रूप वाटायचे. आम्ही मराठवाड्यातील बस, रेल्वेने जात असू. मी आमच्या ‘त्या’ युवा नेत्यांना एकदा विचारलेही, ‘तुम्ही एवढ्या लांबून स्वत: मोटार चालवत मुंबईला येता!’ त्यावर ते हसले. म्हणाले, ‘मला मोटार चालवायला खूप आवडते. त्यात सर्व सहकारी कार्यकर्ते सोबत असतात. अनेक विषय मािहती होतात. चर्चा होते. अंतर सहज ओलांडले जाते.’ ते देवेंद्र फडणवीस आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून १०० दिवसपूर्ण करत आहेत. ते पाहताना मोठा आनंद होतो. दुष्काळाने होरपळत जाऊन जागतिक पटलावर राज्याचे विपणन करणे असेल... फडणवीस यांनी ते प्रभावीपणे केले आहे.

दाओसमध्ये जाऊन त्यांनी राज्यातील पायाभूत सुविधा, वैशिष्ट्यांची माहिती जगासमोर मांडली. त्यातून राज्यात दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. राज्यात २० हजार रोजगार निर्माण होणार आहेत. राज्यातील १४ पिके त्यांनी निवडली आहेत. त्यावर खास शेतक-यांसाठी उत्पादन वाढ तसेच गुणवत्ता वाढ, त्याला बाजारपेठ आणि मोठा मोबदला मिळणे या दृष्टीने काम होणार आहे. शेतक-यांच्या योजनांतील पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने त्यातून सावकार वगैरे तत्समांच्या घशात जाणारे हे पैसे थेट त्यांच्या उपयोगी पडणार आहेत. भाजप युवा मोर्चात दोन सत्रे सोबत काम करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांची कार्यशैली जवळून पाहण्याचा योग आला. अत्यंत मुद्देसूद, प्रभावी मांडणी करण्यात त्यांची हातोटी जाणवत असे. मोठा नेता होण्याचे गुण त्या वेळीही प्रकर्षाने जाणवत. मुंबईतील बैठकांनंतर सोबत भेळ खायला चौपाटीवर सोबत गेल्याच्या काही आठवणी आहेत. सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याची मोठी आवड त्यांना आहे. त्यांचे वक्तृत्व अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. अभ्यास हा त्यांचा अत्यंत मोठा गुण आहे. पक्षातच नव्हे, तर विरोधी पक्षांतही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार तसेच आमदार पराग अळवणी, रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने, दिनेश सूर्यवंशी आणि मार्गदर्शक असलेले मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री गिरीश महाजन असा आमचा त्या वेळचा भारतीय जनता युवा मोर्चा संघ होता. गोपीनाथ मुंडे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मुंडे साहेब त्यांना राज्यातील विषयांवर काम करायला सुचवत. ते त्यानुसार त्यावर तासन् तास अभ्यास करत. राज्यभर त्यावर बोलत. ते विषय तडफेने विधानसभेत मांडत. नेतृत्वाचे त्यांचे गुण गडकरी यांच्यासोबत काम करताना अधिक विकसित झाले.
राज्याच्या या दोन मोठ्या नेत्यांची छाप त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वावर आहे. ते मैत्री जपण्याला, जिवाला जीव लावण्याला अतिशय महत्त्व देतात. आज भेट होते तेव्हाही ते मुख्यमंत्री झाले आहेत असे वाटू नये तेवढी त्यात सहजता असते. पूर्वीच्या जिव्हाळ्याने बोलणे होते. भेटलो की ‘काय शिरीष’ असे म्हणत, खांद्यावर हात ठेवून ते सुरुवात करतात. मराठवाड्यात काय नवीन सुरू आहे, हे त्यांना सतत जाणून घ्यायचे असते.

अत्यंत साधे, मितभाषी, नियोजनबद्ध, मेहनतीने काम करणारे आणि अत्यंत चांगली प्रतिमा असलेले हे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवडले त्या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांना झालेला आनंद मोठा होता. त्याला कारण होते. त्यांनी राजकारणात प्रवेश केला तो १९९२-९३ मध्ये. नागपूरचे नगरसेवक म्हणून ते सक्रिय झाले. अगदी युवा अवस्थेत महापौर झाले आणि धडाडीने निर्णय घेत नागपूरचा कायापालट केला. तसेच राज्याचे होईल, असा प्रत्येकाला विश्वास आहे. मराठवाड्यात मुख्यमंत्रिपदावर आल्यावर दोन वेळा आले. इथले विषय जाणून घेण्याची, सोडवण्याची त्यांची तळमळ त्या वेळीही प्रकर्षाने जाणवली. मुख्यमंत्री झाल्यावरही वेळ काढतात, प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतात हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य जाणवते.

केंद्रात आणि राज्यात भाजपला जी सत्ता मिळाली त्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. राज्यात सत्ता आली त्या वेळी युतीत काही काळ अकारण तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या वेळी त्यांनी परिस्थिती अतिशय प्रभावीपणे हाताळताना कटुता निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली, ते अतिशय महत्त्वाचे होते. मोटार चालवण्याची मोठी आवड असलेले हे मुख्यमंत्री राज्यकारभारही अतिशय जोमाने चालवत आहेत. राज्य विकासाच्या दिशेने अग्रेसर आहे. यशोशिखर नक्की गाठणार आहे.

नागरी हक्क सनद : मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम लालफितीचा कारभार थांबवण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत नागरी हक्क सनद जारी केली. अधिका-यांना यामुळे सर्वसामान्यांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करणे बंधनकारक झाले आहे.सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्याचा कारभार चालावा, असा त्यांचा आग्रह आहे. अधिकारांचे विकेंद्रीकरण करताना विभागीय पातळीवर बदल्यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयावरून येणारा दबाव यामुळे थांबणार आहे. उद्योजकता वाढीस लागावी यासाठी घ्याव्या लागणा-या परवानग्या, मंजुरी, करावे लागणारे अर्ज आता केवळ २५ वर आणले आहेत.