आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Second Death Anniversary News In Marathi

बाळासाहेबांनी उठविले होते ‘महाराष्ट्र भूषण’ वरून घमासान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - महाराष्‍ट्राची लाडकी व्यक्तिमत्त्वे : एका प्रसंगी हास्यविनोदात रममाण पु.ल. देशपांडे आणि बाळासाहेब. शेजारी मीनाताई ठाकरे व सुनीताबाई देशपांडे.)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वाद यांचे नाते अतिशय घट्ट होते. रिडल्सपासून नामांतरापर्यंत, ‘महाराष्‍ट्र भूषण ’ पासून साहित्यिकांपर्यंत अनेक विषयांवर त्यांच्या परखड, बिनधास्त आणि बोच-या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले. या वादांनी अवघा महाराष्‍ट्र ढवळून निघाला. त्यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे राजकारणाला वेगळी दिशाही दिली. गाजलेल्या काही वादांवर हा प्रकाशझोत...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्यामध्ये झालेल्या वादंगाने 1996 मध्ये महाराष्ट्र ढवळून निघाला होता. शिवसेना- भाजप युती महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार सुरू केला. पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्रभूषणचा प्रथम पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्यावर त्याचे सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातल्या सर्वांनीच मनापासून स्वागत केले. शिवसेनाप्रमुख व पु. ल. देशपांडे यांचे नाते गुरू-शिष्याचे आहे. मुंबईतील दादरच्या ओरिएंट हायस्कूलमध्ये पु. ल. देशपांडे 1945 मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. याच शाळेत पु. लं.च्या पत्नी सुनीताबाई देशपांडे याही शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. ओरिएंट हायस्कूलमध्ये बाळासाहेब ठाकरे हे विद्यार्थी होते. तिथे त्यांना मराठी हा विषय पु. ल. देशपांडे यांनी शिक्षक या नात्याने शिकविला होता. या गुरू-शिष्याच्या अनोख्या नात्याची आठवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच मर्मबंधात जपलेली होती. पु. ल. देशपांडे यांची साहित्यिक थोरवी विषद करणारी काही व्यंगचित्रेही आपल्या मार्मिक या साप्ताहिकात ठाकरे यांनी प्रसंगोपात रेखाटलेली होती. या सा-या आदरभावातूनच पुलंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय युती सरकारने घेतला होता. महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात आयोजिण्यात आला होता. पु. ल. आजारी असूनही कसेबसे समारंभाला उपस्थित राहिले होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर पुलंच्या वतीने त्यांचे मनोगत सुनीताबाई यांनी वाचून दाखवले. त्यात महाराष्ट्राच्या त्या वेळच्या भयग्रस्त वातावरणाबद्दल व सामान्य माणसांच्या होलपटीबद्दल खंत होती. या निवेदनाच्या जोडीला सुनीताबाई देशपांडे यांनी गोविंदाग्रजांचे ‘मंगल देशा, पवित्र देशा’ हे महाराष्ट्रगीत म्हटले व ती खंत अधिक तीव्र केली. या निवेदनावरून राज्यात भयंकर वादंग निर्माण झाला. पु. ल. देशपांडे यांनी त्या वेळी व्यक्त केलेल्या मनोगताचा आशय साधारणपणे असा होता ‘ शिवसेना-भाजप युतीने छत्रपती शिवरायांच्या तत्त्वांना अनुसरून असलेली शिवशाही राबविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी शिवशाहीऐवजी ठोकशाहीचाच कारभार सुरू केला आहे.’ पु. ल. देशपांडे यांनी केलेली ही मर्मभेदी टीका बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जिव्हारी लागली होती. शिवसेनेच्या हुकूमशाहीवर उठविलेली झोड सहन न होऊन बाळासाहेब ठाकरे यांनी पु. ल. देशपांडे यांच्यावर आसूड ओढताना म्हणाले होते ‘झक मारली आणि यांना (पु. ल.) पुरस्कार दिला. हे पु. ल. की मोडका पुल ’ अशी रुचीहीन शाब्दिक कोटी करण्याचा प्रयत्नही शिवसेनाप्रमुखांकडून त्या वेळी झाला होता. शिवसेनाप्रमुख पु. ल. देशपांडे यांच्याविरोधात जे म्हणाले ते नेमके शब्द असे होते. ‘युती सरकारच्या विरोधात बोलायचे होते तर घेतली कशाला पदवी? या साहित्यिकांना (पु. लं. सहित) काय कळतंय? उपयोग काय यांचा समाजाला? या मोडक्या ‘पुला’कडून कोण ऐकणार उपदेश? खरं म्हणजे युती सरकार पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मलाच द्यायला निघालं होतं.’ पाच लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र असे स्वरूप असलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर पु. ल. देशपांडे यांनी केलेल्या भाषणाचे प्रागतिक विचारांच्या सर्वच लोकांनी मनापासून स्वागत केले होते. शिवसेनाप्रमुखांनी काढलेल्या अनुदार उद्गारांचा निषेध म्हणून पु. ल. देशपांडे यांनी हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाला परत करावा, अशीही मागणी तमाम साहित्यप्रेमींनी त्या वेळी केली होती. पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल अनुदार उद्गार काढल्याबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पर्यायाने युती सरकारवर इतकी जोरदार टीका समाजाच्या सर्वच थरांतून होऊ लागली की त्याची गंभीर दखल या घटकांना घेणे भागच पडले. त्यानंतर काही काळाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पु. ल. देशपांडे यांच्या पुणे निवासस्थानी गेले. आपले गुरू असलेल्या पु. ल. देशपांडे यांना त्यांनी नमस्कार करून अभिवादन केले. हे दृश्य त्या प्रसंगीच्या छायाचित्रांच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका जाहीर मुलाखतीत सांगितले होते ‘प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला अनेकदा रात्र रात्र डोळा लागत नाही. त्या वेळी मी एकच करतो. टेपरेकॉर्डरवर पु. ल. देशपांडे यांची बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, वा-यावरची वरात आदींच्या कॅसेट लावतो. आणि त्या ऐकत बसतो. पु. लं.च्या जातिवंत विनोदाने माझे मन प्रफुल्लित होते. थकवा जातो. पु. ल. देशपांडे यांचा विनोद हा अजरामर आहे.’ पु. ल. देशपांडे यांच्याविषयी एका बाजूला आदराने ओतप्रोत भूमिका मांडणा-या शिवसेनाप्रमुखांनी जेव्हा त्यांच्यावर टीका केली त्याचा अत्यंत कडक शब्दांत निषेध अहमदनगर येथे भरलेल्या 72 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात साहित्यिक व साहित्यरसिकांनी केला होता. युती शासनाच्या काळात मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेचे महत्त्वाकांक्षी काम हाती घेण्यात आले होते. हा महामार्ग बांधण्याचे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न प्रत्यक्षात आले. 1999च्या विधानसभा निवडणुकीत युतीचा पराभव होऊन काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आले. राज्यातील कोणत्याही रस्ते आणि पुलांना यापुढे कोणत्याही मान्यवरांचे नाव देण्यास मनाई करणारा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने 15 फेब्रुवारी 2000 रोजी काढला होता. तरीही मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गाला यशवंतराव चव्हाण यांचे व नरिमन पॉइंट ते वर्सोवा या प्रस्तावित सागरी सेतूला त्या वेळी राजीव गांधी यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गाला पु. ल. देशपांडे यांचे नाव द्यावे यासाठी शिवसेनेने लगेच आंदोलन पुकारले होते. कालक्रमात घटना घडतात, पण त्या वेळी घेतलेल्या भूमिकेच्या बरोबर विरुद्ध भूमिका कालांतराने कशी घेतली जाते याचे हे जिवंत उदाहरण आहे.
गर्व से कहो हम हिंदुजा में हैं
बाळासाहेब व पु. ल. यांच्या सामाजिक संबंधांत काही काळ कडवटपणा जरूर आला, पण त्यांचे वैयक्तिक संबंध चांगले होते हे दर्शविणारा एक किस्सा मशहूर आहे. शिवसेनाप्रमुख एकदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे माहिमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल होते. ते ऐकताच पु. ल. देशपांडे उद्गारले होते ‘रुग्णालयातील शिवसेनाप्रमुखांच्या खोलीच्या दरवाजावर आता ‘गर्वसे कहो हम हिंदुजा मे है’ असं लिहायला हरकत नाही!’
‘पुलं’ की ‘मोडका पूल’
‘ युतीने शिवशाही राबविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ठोकशाहीचाच कारभार सुरू आहे.’ पुलंच्या या टीकेनंतर बाळासाहेबांनी ‘झक मारली आणि यांना पुरस्कार दिला, असे म्हणत पु. ल. की मोडका पुल अशी कोटी केली. ‘सरकारविरोधात बोलायचे होते तर घेतली कशाला पदवी? या साहित्यिकांना काय कळतंय? उपयोग काय यांचा समाजाला?’ असे बाळासाहेब म्हणाले होते.