आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Second Death Ceremony.

बाळासाहेब गेले तेव्हा शोकाकुल झाला होता संपूर्ण महाराष्ट्र!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदुत्व आणि मराठीची पताका खांद्यावर घेऊन असंख्य वादळांना सामोरे जाणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शनिवारी (17 नोव्हेंबर 2012) अखेरचा श्वास घेतला. आपल्या शिवसैनिकांना आणि तमाम मराठी जगताला पोरके करून दुपारी 3.33 वाजता हा वटवृक्ष कोसळला आणि इतिहास निर्माण करणारा एक झंझावात काळाच्या पडद्याआड गेला.

आपल्या कुंचल्याच्या फटकार्‍याने आणि तळपत्या वक्तृत्वशैलीने महाराष्ट्राला स्वाभिमानाने उभे राहण्याचा मंत्र देणार्‍या या वादळी व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने महाराष्ट्र किंवा देशच नव्हे, तर जगभरातील मराठी जनमानसावर कुठाराघात झाला आहे.
प्रत्यक्ष सत्तेत नसतानाही महाराष्ट्राच्या राजकारणावर चार दशकांहूनही अधिक काळ स्वत:ची अधिसत्ता प्रस्थापित करणारे शिवसेनेचे संस्थापक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3.33 वाजता निधन झाले.

त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टर चमूचे प्रमुख, विख्यात छातीविकारतज्ज्ञ डॉ.
जलील परकार यांनी त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा सायंकाळी 5.00 वाजता ‘मातोश्री’बाहेर केली होती. ही बातमी पसरताच मुंबईसह महाराष्ट्रभरात सर्वत्र शोकाकुल वातावरण झाले होते.
शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीत गेल्या चार दिवसांपासून सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्यक्ष निधनाची बातमी आली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. आजारातून बाहेर येऊन बाळासाहेब त्यांच्या प्रिय शिवसैनिकांना दर्शन देतील अशी आशा बाळगून असलेले त्यांचे असंख्य चाहते शोकसागरात बुडून गेले. गेले काही महिने बाळासाहेब स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांत बोलले जात होते. मात्र त्याबाबत अधिकृतरीत्या कधीही काहीही सांगितले गेले नाही.

डॉ. परकार ‘मातोश्री’बाहेर जमलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर आले. त्यांच्यासोबत डॉ. प्रकाश जिंदियानी, शिवसेना खासदार संजय राऊत, शिवसेना नेते लीलाधर डाके, खासदार अनिल देसाई, आमदार रवींद्र वायकर, तसेच आजारपणात बाळासाहेबांसोबत असलेले विधान परिषद सदस्य डॉ. दीपक सावंत आदी होते. डॉ. परकार यांनी आपण सांगतो आहोत ते शांततेत ऐकून घ्या, अशी विनंती केली. त्यानंतर ते म्हणाले की, आपल्याला हे जाहीर करताना अत्यंत दु:ख होते आहे की, आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचे निधन झाले. याबाबत आपण अधिक काही प्रश्न आपल्याला वा बाळासाहेबांच्या कुटुंबीयांना विचारू नयेत, कारण आधीच सगळे कुटुंबीय तणावातून जात आहेत. त्यामुळे हे योग्य होणार नाही. या घोषणेपाठोपाठ उपस्थित शिवसेना नेते व शिवसैनिकांमध्ये सन्नाटा पसरला. रवींद्र वायकर, दीपक सावंत यांना अश्रू अनावर झाले. लीलाधर डाकेदेखील भावनाविवश झालेले दिसत होते.

तणावाचे वातावरण : बाळासाहेबांच्या निधनाची घोषणा होताच मातोश्रीवरील वातावरण तणावाचे बनले. काही शिवसैनिकांचा या बातमीवर विश्वास बसत नव्हता. शिवसैनिकांनी ‘बाळासाहेब अमर रहे’, ‘शिवसेना जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी केली, तर शोक अनावर झाल्याने आमदार वायकरांसह अनेकांना रडू कोसळले. शिवसैनिकांतील अस्वस्थता वाढली. प्रत्येकाला आत जाऊन बाळासाहेबांचे दर्शन घ्यायचे होते व तशी मागणी कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली. त्यामुळे लगेच पोलिसांनी मातोश्री परिसराचा ताबा घेतला. प्रमुख रस्ता बंद करण्यात आला व शिवसैनिक, माध्यमांच्या प्रतिनिधींना मागे सरकण्यास सांगण्यात आले. व्हीआयपी गेटवरही आणखी पोलिस तैनात करण्यात आले व मोजक्याच लोकांना आत जाण्याची परवानगी देण्यात आल्याचे समजते. मातोश्रीच्या दिशेने जाणार्‍या इतर रस्त्यांवरही कडक बंदोबस्त होता. आजूबाजूच्या परिसरातील दुकाने, हॉटेल्स, टॅक्सी, रिक्षा बंद करण्यात आल्या.

शांततेचे आवाहन :
शिवसैनिकांना आवरणे कठीण होईल, हे दिसत असल्याने पोलिसांनी नेत्यांना शिवसैनिकांसाठी आवाहन करण्यास सांगितले. त्यानुसार संजय राऊत यांनी रविवारी सकाळी सात वाजेपासून शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे सांगून शांततेचे आवाहन केले. मात्र गर्दीतून वारंवार मातोश्रीमध्ये जाण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे आमदार विनायक राऊत यांनी शिवसैनिकांना आवाहन करणे सुरू केले. आपल्या निधनानंतर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. त्यामुळे बाळासाहेबांची तुम्हाला शपथ आहे की कोणताही अनुचित घटना टाळा. त्यांचे अंत्यदर्शन सर्वांना मिळणार असल्याचे ते म्हणाले. मात्र मातोश्रीवरची गर्दी वाढतच होती.

‘माध्यमांवर हल्ला करू नका’
दरम्यान, तणाव आणि वाढती गर्दी पाहता माध्यमांच्या प्रतिनिधींना रस्त्यावरून मातोश्रीसमोरील म्हाडा कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये पाठवण्यात आले. गुरुवारपासूनच सर्व वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी मातोश्री परिसरात रात्रंदिवस तळ ठोकून होते. त्यांनी काळजी घ्यावी व कंपाऊंडच्या पुढे येऊ नये, अशा सूचनाही पोलिसांकडून देण्यात आल्या. त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली. त्यामुळे आमदार रामदास कदम आणि संजय राऊत यांनी माध्यमांवर हल्ला करू नका, अशा सूचना लाऊडस्पीकरवरून कार्यकर्त्यांना दिल्या.
शिवाजी पार्कवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते बाळासाहेबांचे पार्थिव..
शिवसेनाप्रमुखांचे पार्थिव रविवारी (18 नोव्हेंबर 2012) सकाळी 10 वाजेपासून दादरच्या शिवाजी पार्कवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तत्पूर्वी, 7.30 वाजेपासून ‘मातोश्री’वरून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. सायंकाळी पाच ते सहा या वेळेत त्यांच्या पार्थिवाला मंत्राग्नी देण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली. शिवसेनाप्रमुखांनी 40 वर्षे जे मैदान गाजवले त्याच शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे शिवसेना नेत्यांनी सांगितले. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे मुंबई पोलिस कायद्यानुसार नेहमीच्या ठिकाणांऐवजी इतरत्र अंत्यसंस्कार करता येतात, मात्र त्यासाठी पोलिस वा पालिकेची परवानगी लागते. बाळासाहेबांच्या अंत्यविधीसाठी अद्याप ती घेण्यात आली नसल्याचे समजते. दरम्यान, शिवाजी पार्कवर स्टेज उभारले जात असून, विजेचे मोठे दिवे लावण्यात अले आहेत. अंत्ययात्रा, अंत्यदर्शन व अंत्यसंस्काराच्या समन्वयासाठी संजय राऊत, सुभाष देसाई, राज ठाकरे व उद्धव यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांची समिती करण्यात आल्याचे समजते.
वाचा, मान्यवरांच्या प्रतिक्रिया...