आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Second Death Ceremony.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे दुर्मिळ आणि निवडक व्यंगचित्रांचे ‘फटकारे’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या शाब्दिक फटकार्‍यांनी भल्याभल्यांना घायाळ करणारे बाळासाहेब ठाकरे थोर व्यंगचित्रकार होते. त्यांच्या दुर्मिळ आणि निवडक व्यंगचित्रांचा ‘फटकारे’ हा संग्रह 24 आॅक्टोबर 2012 रोजी दसर्‍याच्या दिवशी प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकात बाळासाहेबांनी व्यंगचित्रकार कसा झालो हे सांगितले आहे. त्या लेखातील काही भाग...

प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. तसाच एक काळ व्यंगचित्रांचा होता. व्यंगचित्रांची एक वेगळी दुनिया होती. त्या दुनियेत मी माझ्या कुंचल्यांच्या फटकार्‍यांनी स्वतंत्र स्थान नक्कीच निर्माण केले होते.
मी व्यंगचित्रकार कसा झालो? ही एक रंजक कहाणीच आहे. त्यात अनेक पात्रं आहेत. अनेक प्रसंग आहेत. कडू-गोड आठवणी आहेत. आयुष्य म्हटले की हे असायचेच. पण माझ्या व्यंगचित्रांचे असे एक समग्र पुस्तक निघेल, त्यासाठी जुन्या काळातील सर्व व्यंगचित्रे मेहनतीने गोळा केली जातील असे कधीच वाटले नव्हते. कारण आम्ही ठाकर्‍यांनी जमवाजमव अशी कधी केलीच नाही. त्यामुळे उद्या पुस्तक काढायचे म्हणूनही व्यंगचित्रांची राखण करावी असे आमच्या हातून झाले नाही. कोणत्याही संपत्तीचा लोभ आम्ही कधी बाळगला नाही. धनसंचय केला नाही. जे आले ते वाटत राहिलो. व्यंगचित्रे हीच आमची संपत्ती. पण त्याबाबतीतही आम्ही बेपर्वा राहिलो. मागे एकदा माझी जुनी ‘फ्री प्रेस’मधली चित्रं मी माळ्यावर ठेवली होती. कुठला तरी संदर्भ पाहिजे होता म्हणून मी ती खाली काढली. त्या सगळ्याला वाळवी लागली होती. त्या व्यंगचित्रांचा गठ्ठा घेतला आणि जाळून टाकला. माझ्या आयुष्यातील तो एक दु:खद प्रसंग होता. पण ही सर्व व्यंगचित्रे आज पुन्हा माझ्यासमोर आली. उद्धवने हे मनावर घेतले नसते तर शक्यच झाले नसते व आज पुस्तकरूपाने निवडक व्यंगचित्रांचा हा खजिना जनताजनार्दनासमोर येत आहे.
आज आम्ही जे काही आहोत ते व्यंगचित्रकलेमुळेच आहोत. आमच्या हाती कुंचला नसता तर आज राजकारणात व समाजात आम्ही ज्या शिखरावर जाऊन पोहोचलो आहोत ते शिखर आम्हाला कधीच गाठता आले नसते. व्यंगचित्रांसाठी हात आणि डोळे सशक्त असावे लागतात. आता माझे हात थरथरतात. पण पूर्वी याच हातांनी मी भल्याभल्या राजकारण्यांना थरथरवले आहे. आज मी माझीच व्यंगचित्रे पाहतो तर आश्चर्य वाटते. खरंच का याच माझ्या हातांनी ही इतकी व्यंगचित्रे रेखाटली? माझ्या हातून ते घडले मात्र खरे. मी व्यंगचित्रकार कसा झालो? त्याचेही श्रेय मी प्रबोधनकारांना आणि बाबूराव पेंटरना देईन. बाकी इतरही आहेतच. मुळात मी व्यंगचित्रांकडे आकर्षित झालो ते बॅनबेरींच्या व्यंगचित्रांमुळे. बॅनबेरी दुसºया महायुद्धाच्या काळात ‘टाइम्स आॅफ इंडिया’त व्यंगचित्रे काढत असत. त्या वेळी आम्ही नुकतेच भिवंडीहून मुंबईत आलो होतो. 1939चा काळ तो. दादरला मुक्काम होता. दुसरे महायुद्ध सुरू झाले. रोज ‘टाइम्स’मध्ये मी बॅनबेरींची चित्रे पाहत होतो. एक दिवस दादांनी म्हणजे वडिलांनी विचारलं, ‘काय रे, काय पाहतोस?’ मी सांगितले, ‘ही चित्रे पाहतोय’. दादांनी विचारले, ‘आवडलं का?’ मी म्हणालो, ‘हो, आवडलं’. दादा म्हणाले, ‘ठीक आहे, आजपासून काढायला लाग. पेन्सिलने काढून ठेव. मी संध्याकाळी आल्यानंतर पाहीन.’ संध्याकाळी आल्यानंतर त्यांनी हात-पाय धुऊन, चहा घेऊन झाल्यावर विचारलं, ‘काय रे, काही केलंस का?’ मी जे केलं होतं ते दादांना दाखवलं. त्यांनी काही सुधारणा सुचवल्या. दादांचा हात चांगला होता. दादा स्वत: चित्रकार होते. दादांनी मला सदैव आधार दिला. ऐन उमेदीच्या काळात माझी व्यंगचित्रं प्रसिद्ध झाली. त्यांची कल्पना दादांचीच असायची. त्यामुळे व्यंगचित्रकलेतील माझे पहिले गुरू वडीलच होते. त्यानं मी दीनानाथ दलाल व डेव्हिड लो यांस गुरुस्थानी मानतो.
1939-40 चा तो काळ. मी 13-14 वर्षांच असेन. लोकं विचारतात, ‘व्यंगचित्र शिकण्यासाठी तुम्ही कोणत्या स्कूलमध्ये गेलात?’ मी त्यांना सांगतो, ‘मी कुठल्याच स्कूलमध्ये गेलो नाही. गेलो असतो तर व्यंगचित्रकार झालोच नसतो. बिघडला असता माझा हात’. त्याचे श्रेय मी देईन ते बाबूराव पेंटरना. त्यांनीच मला आर्ट स्कूलला जाण्यापासून वाचवलं. एकदा दादरच्या घरी ते आले. शतपावली घालत होते. माझं एक पेंटिंग भिंतीवर लावलेलं होतं. त्यांना ते आवडलं. दादांना विचारलं, ‘कुणी काढलंय?’ ‘बाळनं काढलंय’असे दादांनी म्हटल्यावर त्यांनी मला बोलावून घेतलं नि विचारलं, ‘काय करतोस?’ मी म्हटलं, ‘मी उद्यापासून जेजे स्कूल ऑफ आर्ट्‍सला जाणार आहे.’ प्रवेश घेतला होता. साठ रुपये फी भरून झाली होती. रंग, ब्रश वगैरे आणून सगळी तयारी झाली होती. ते ऐकून बाबूराव दादांना म्हणाले, ‘अरे, या पोराचा हात चांगला आहे. स्कूल आॅफ आटर््समध्ये पाठवून तो फुकट घालवू नको. पाहिजे तर मी त्याला कोल्हापूरला घेऊन जातो आणि चांगला आर्टिस्ट तयार करतो.’ मी स्कूल आॅफ आर्ट्सला गेलो नाही. साठ रुपये फुकट गेले, पण माझा हात वाचला.
माझी व्यंगचित्र कला बहरली ती ‘नवशक्ती’, ‘फ्री प्रेस’मध्ये. 1947 ला मी स्टाफवर आलो तेव्हा आर. के. लक्ष्मण रुजू झाले होते. पण मी दोन वेळा राजीनामा दिला ‘फ्री प्रेस’चा. मला बसायची जी खोली दिली ती अडगळीची होती. तिथे एकाग्रता नव्हती. नीट वाचन होत नसे. पाट्या टाकण्याची कामं मला जमली नाहीत म्हणून मी राजीनामा दिला. मग त्यांनी मला दुसरीकडे खोली दिली. तिथे बसून मी चित्रं काढायला लागलो. त्यानंतर व्यंगचित्रातील एबीसी न कळणार्‍या ए. बी. नायर या माणसानं माझ्या व्यंगचित्रांवर सेन्सॉरशिप लादली. हा प्रकार पटला नाही. ‘फ्री पे्रेस’ सोडलं.
त्या काळात शकर हे एक जबरदस्त व्यंगचित्रकार होते. त्यांची एक स्वतंत्र शैली होती. त्यांच्या कल्पना उत्तम असायच्या. त्यांचा दबदबा चांगला होता. ‘फ्री प्रेस’मध्ये असताना एकदा मी चित्राची तयारी करीत असताना मागच्या खिडकीतून आवाज आला, ‘ए ठाकरे, ए ठाकरे’. मागे वळून पाहतो तर ‘शंकर्स वीकली’चे संपादक स्वत: शंकर उभे होते. ते म्हणाले, ‘पंडित नेहरू रशियाला चालले आहेत आणि त्या शिष्टमंडळात ऐनवेळी माझे नाव त्यांनी समाविष्ट केले आहे. त्यामुळे मी येईपर्यंत तू ‘शंकर्स वीकली’ची मुखपृष्ठं सजवायचीस. मुखपृष्ठावरची व्यंगचित्रं तू रेखाटायचीस ’ मी म्हटले, ‘ते शक्य नाही. संपादकांची परवानगी लागेल.’ त्या वेळी नटराजन संपादक होते. त्यांची परवानगी मिळाली आणि मी शंकर्स वीकलीच्या मुखपृष्ठासाठी पहिलं व्यंगचित्र रेखाटलां. प्रश्नांकित चेहरा करून तोंडाला पेन्सिल लावून पंडित नेहरू बसले आहेत. त्या वेळी रशियात बुल्गानिन आणि क्रुश्चेव यांची राजवट होती. क्रुश्चेव्ह एक सांगतोय त्या वहीवर बोट ठेवून आणि नक्की काय लिहू? कोणाचे ऐकू? अशा प्रश्नांकित चेहºयाने पंडित नेहरू बसलेले आहेत. आणि व्यंगचित्राचा मथळा होता, ‘रि...रि... डिस्कव्हरी आॅफ रशिया’. ते कार्टून गाजले. मग काही तरी कारस्थान शिजलं. शंकर रशियात होते, पण त्यांच्या कचेरीतून मला सांगण्यात आले की, ‘मुखपृष्ठ पाठवू नका, आतली कार्टून्स पाठवा’. एक दोन कार्टून्स त्यांनी छापली. नंतर बंद केली.
‘फ्री प्रेस’ सोडल्यानंतर आणि ‘न्यूज डे’चा प्रयोग अयशस्वी झाल्यानंतर मी आणि माझे बंधू श्रीकांत यांच्या साथीने ‘मार्मिक’ला हात घातला. त्याच ‘मार्मिक’नं इतिहास घडवला म्हणा, क्रांती केली म्हणा. महाराष्ट्राला, मराठी माणसाला जाग आणली. कुंचल्यांच्या फटकार्‍यांनी भले भले गारद झाले. ‘मार्मिक’मधून शिवसेना जन्माला आली. त्या शिवसेनेने फक्त महाराष्ट्रच नव्हे तर दिल्लीपर्यंत धडक मारली. अर्थात तेव्हा व्यंगचित्रं काढावीत अशी तोलामोलाची माणसं होती. आर. के. लक्ष्मण आणि मी रेषा आणि कल्पकता दोन्ही सांभाळायचो. हल्ली ज्या राजकारण्यांवर व्यंगचित्रं येतात ती त्या राजकारण्यांनाही कळत नाहीत. आज राजकीय व्यंगचित्रांना खोली राहिलेली नाही. महाराष्ट्र एकसंध ठेवण्याचे काम ‘मार्मिक’मधील व्यंगचित्रांनी केलं. त्या काळात जे विषय मी घेतले ते आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. आसामातील घुसखोरी व हिंसाचार, काश्मीर प्रश्नांचे भिजत घोंगडे, सीमा प्रश्न, महागाई, बेरोजगारी, बेकारी, भ्रष्टाचारावर काढलेली तेव्हाची व्यंगचित्रं आजही तितकीच चपखल आहेत. काहीही बदललेले नाही.
व्यंगचित्रं मी काढली. तशी असंख्य कॅरिकेचर्सही काढली. कॅरिकेचर हा शेवटी व्यंगचित्राचाच भाग आहे. त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्यासमोर उभा राहतो त्यातल्या वैगुण्यांसह. चेहरा कुठला चांगला? तर जो व्यंगचित्रकाराला स्फूर्ती देतो. असे बरेच होते त्या वेळेला. आज म्हणाल तर सोनिया गांधी हा काही चेहरा नाहीय. आज सगळ्याचाच दुष्काळ दिसतोय.
आज ताकदीचे व्यंगचित्रकार कुणीच दिसत नाहीत. मुळात व्यंगचित्रकलेचा अस्त होताना दिसत आहे. त्याला कारणे बरीच आहेत. राजकीय व्यंगचित्रं काढताना विचारांची जी खोली लागते, ती या राजकारण्यांत नाही आणि व्यंगचित्र काढणार्‍यांतही कुठे दिसत नाही. तुम्ही व्यंगचित्रं काढता तेव्हाच तुम्हाला विनोदबुद्धी आहे हे स्पष्ट झालेले असतं.ती कुठल्या शाळा कॉलेजात शिकवली जात नाही. ते उपजतच असतं. ‘पॉकेट कार्टून्स’चा एक जमाना होता. आता जी कार्टून्स येतात ती पाहून असे वाटते की यापेक्षा पॉकेटमार झालेले बरे!
आपल्या लोकांना शहाणं बनवलं पाहिजे. आपल्या लोकांना आपलं राजकारण, आपले प्रश्न समजावून सांगितले पाहिजेत, यावर माझा जोर होता. लोक किती शहाणी झाले ते सांगता येत नाही, पण शहाणपण शिकवणार्‍या व्यंगचित्रांचं पुस्तक मात्र प्रसिद्ध होत आहे. पुढच्या पिढीसाठी हा देशाचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. मागच्या दोन पिढ्या या व्यंगचित्रांतून खडबडून जाग्या झाल्या. ‘मार्मिक’मधील व्यंगचित्रे म्हणजे वाघनखेच होती. या वाघ नखांनी देशाच्या दुश्मनांना व महाराष्ट्रद्वेष्ट्यांना रक्तबंबाळ केले एवढे स्मरण नव्या पिढीने ठेवले तरी पुरे!

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब यांनी रेखाटलेली निवडक व्यंगचित्रे...