आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Second Death Ceremony.

बाळासाहेब ठाकरे: नेतृत्वाएवढेच माणूसपणही होते विशाल- छगन भुजबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व एक नेता म्हणून कसे आहे ते सर्वज्ञात आहे. मात्र, नेतृत्वगुणाएवढेच त्यांच्यातील माणूसपण देखील विशाल होते. त्यांच्या वागण्याबोलण्यातूनच नव्हे तर कृतीतून देखील त्याचा प्रत्यय अगदी सहजपणे येऊन जायचा. किंबहुना त्यामुळेच त्यांच्याकडचे चाहत्यांचे, अनुयायांचे, कार्यकर्त्यांचे मोहोळ उत्तरोत्तर वाढतच गेले. शिवसेनेच्या जन्मानंतर जो रस्त्यावरच्या संघर्षाचा काळ होता त्यावेळचा बाळासाहेबांचा एक खंदा समर्थक आणि संघटनेतल्या आघाडीच्या फळीचा शिलेदार म्हणून मला त्यांचा सहवास अगदी जवळून लाभला.
शिवसेना स्थापनेची जी ऐतिहासिक सभा शिवाजी पार्कला झाली त्या सभेला मी व्हीजेटीआय इंजिनिअरिंग कॉलेजचा स्टुडंटस् सेक्रेटरी म्हणून उपस्थित होतो. बाळासाहेबांचे त्या सभेतील विचार ऐकून आमचे तरुण रक्त सळसळू लागले अन्् तेथेच मी व माझे सहकारी शिवसैनिक बनून गेलो. सत्ताकारणापेक्षा समाजकारण आणि चळवळ हेच त्यावेळी आम्हा सर्वांच्या डोळ्यासमोर सदैव असायचे. त्यातून मुंबईत शिवसेनेच्या शाखा उद्घाटनाचा धडाका सुरू झाला आणि काम बघून साहेबांनी मला शाखाप्रमुख बनविले. त्यावेळी आम्ही मोजकेच 12 ते 15 शाखाप्रमुख होतो. एकेकाकडे खूप मोठा इलाखा असायचा. माझ्याकडे माझगाव, डोंगरी, काळाचौकी असा भाग होता. संघटनाविस्ताराच्या निमित्ताने बाळासाहेबांशी दैनंदिन संपर्क असायचा. त्यातून त्यांच्याठायी असलेल्या चाणाक्षपणाची अनुभूती येत गेली. मुळातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यंगचित्रकार असल्याने त्यांचा अगदी जागतिक राजकारणाचाही अभ्यास होता. राष्ट्रीय आणि राज्यातील राजकारणाबाबत तर विचारूच नका. शिवाय, प्रबोधनकारांकडून मिळालेले बाळकडू, नाशकातील विमादी पटवर्धनांसारखे सुपर थिंकटँक व त्याबरोबरच श्याम देशमुख, सुधाकर अधिकारी, माधव देशपांडे, बळवंत मंत्री यांच्यासारख्या विचारी आणि विचारवंतांच्या सान्निध्यात बाळासाहेब कायम असत. शिवाय, जात्याच असलेला मिश्किल स्वभाव व रोखठोक बोलणे यामुळे त्यांच्याशी बोलताना आम्हाला देखील कायम ‘अपडेट’ राहावे लागत असे.

बाळासाहेबांचे बोलणे, वाचन आणि वक्तृत्व याला जोड लाभली ती दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, मी, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी आणि दादा कोंडके यांच्यासारख्या तोफखान्याची. त्यामुळे अल्पावधीत मुंबईत शिवसेना चांगलीच फोफावली. त्यानंतर पक्षाचा विस्तार राज्यभर करण्याचा विषय पुढे आला व त्याची जबाबदारी मुख्यत: माझ्यावर टाकली गेली. साहजिकच पुणे व नाशिक या क्षेत्रावर लक्ष अधिक केंद्रीत केले गेले. नाशिकशी निकटचा संबंध असल्याने या भागात खूपच फिरणे सुरु केले. बाळासाहेब देखील त्यावेळी अनेकदा नाशिकला यायचे. ठिकठिकाणी सभा व्हायच्या. मान्यवरांच्या भेटी-गाठी झाल्यावर मग निवांतपणात आमच्या अनेक गप्पा व्हायच्या. त्यावेळी साहेब मुक्कामाला येणार म्हणून आम्ही भुजबळ फार्मला तारेचे कुंपण घालून घेतले. गार्डनिंगची प्रचंड आवड असल्याने साहेब फार्मवर खूष असायचे. झाडांची त्यांना प्रचंड जाण होती. बाळासाहेबांनी फार्मवर रातराणीचे एक झाड देखील लावले. विशेष म्हणजे, तत्पूर्वी रात्रीच्या वेळी वारा सहसा कोणत्या दिशेने वाहतो ते विचारुन घेतले आणि रातराणीचा मंद सुगंध परिसरात दरवळावा या उद्देशाने बरोबर जागा निवडून ते झाड लावले. हे फक्त बाळासाहेबच करु जाणोत ! साहेबांबरोबर माँ साहेब, राज, उद्धव वगैरे सगळेच असायचे. अगदी घरच्यासारखा सगळ्यांचा वावर असायचा.
होता होता माझी पण गणना नेत्यांमध्ये होऊ लागली. एकदा नव्हे तर दोनदा मुंबईचा महापौर झालो. दरम्यान, मंडल आयोगाच्या मुद्द्यावरुन आमच्यात वैचारिक मतभेद झाले. एक वेळ तर अशी होती की, मी मुंबईचा महापौर म्हणून मंडल आयोगाचे स्वागत करत होतो आणि त्याचवेळी नाशिक दौºयावर आणि भुजबळ फार्मवर मुक्कामी असलेले बाळासाहेब मंडल आयोगाविरोधातील जाहीर भूमिका घेत होते. त्यानंतर मी शिवसेनेतून बाहेर पडलो, पण माणूस म्हणून त्यांच्यातले मोठेपण नेहमीच जाणवत राहिले. कालांतराने पुन्हा ठाकरे कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे नाते बनत गेले. या सगळ्या प्रवासावर नजर टाकता एक गोष्ट राहून राहून जाणवते ती म्हणजे बाळासाहेबांचे कार्यकर्तृत्व. कारण, कोणतेही पाठबळ वा राजकीय पार्श्वभूमी नसताना एखादा पक्ष काढायचा, तब्बल चार दशकांहून अधिक काळ तो यशस्वीपणे मुठीत ठेवायचा, एकट्याच्या बळावर चालवायचा, वाढवायचा एवढेच नव्हे तर सत्ता प्राप्तीचे स्वप्न देखील सत्यात उतरवायचे अन् राज्याचे राजकारण आपल्या भोवती प्रदीर्घकाळ फिरत ठेवायचे ते देखील उपजत असलेले नानाविध कलागुण जपत .. अंगी असलेल्या असामान्यत्वाशिवाय हे सारे केवळ अशक्यच !

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, बाळासाहेब यांच्यासोबत छगन भुजबळ यांचे छायाचित्रे...