आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Second Death Anniversary News In Marathi

शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी लातूरमधील भूकंपग्रस्तांचे पुसले होते अश्रू...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विचारांच्या पातळीवर शिवसेना आणि जनता दल एका ध्रुवाची दोन टोकं असली तरी सेना सुप्रीमो बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्ववादी भाषणातून निर्माण झालेले भगवे वादळ समाजवाद्यांच्या पथ्यावर पडल्याचा अनुभव लातूर जिल्ह्यातील जनतेला 1995 मध्ये आला होता. वास्तविक बाळासाहेब त्यांच्या हयातीत लातूर जिल्ह्यात फार कमी वेळा आले. त्यांनी सन 1990 ते 1995 या काळात प्रचाराच्या तीन सभा घेऊन आणि एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमास उपस्थिती लावून महाराष्‍ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या जिल्ह्यातील तरुणांच्या मनांत प्रस्थापित नेत्यांविषयी आणि घराणेशाहीविरुद्ध चीड निर्माण केली होती.

परिणामी गळ्यात भगवे उपरणे घातलेल्या तरुणांचे जत्थे ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करीत रस्त्यारस्त्यांवर दिसायचे. त्यातून सत्तापरिवर्तनाचा लढा तीव्र झाला आणि जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून सामान्य घरातील दिनकर माने शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. लातूर जिल्ह्यातून शिवसेनेला मिळालेले हे यश माफक वाटत असले तरी कार्यकर्त्यांचे जाळे मात्र सगळीकडे विणले गेले. दरम्यान, स्थानिक काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नव्हते आणि शिवसेनेचे वारे जोरात होते. परिणामी काँग्रेसमधील दुस-या फळीतील नेत्यांनाही आमदारकीची स्वप्ने पडू लागल्याने धर्मनिरपेक्षतेचा नारा देणा-यांना बाळासाहेबांची साथ हवीहवीशी वाटू लागली होती. अशात बाळासाहेब 1990 मध्ये पहिल्यांदा लातुरात आले. त्या वेळी विधासभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले होते. राजस्थान विद्यालयाच्या मैदानावर त्यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. जवळपास दीड लाख लोक सभेला आले होते. त्या वेळी काँग्रेसचे प्रदीप राठी यांनी लातूर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेबांकडे तिकिटाची मागणी केली होती. परंतु बाळासाहेबांनी अगोदर प्रवेश करा, मग तिकीट देऊ, असे सांगितल्याने राठींनी शेवटी अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली. तरीही सभेत बाळासाहेब आपल्या नावाची घोषणा करतील म्हणून राठी व्यासपीठाच्या परिसरात घुटमळत होते. मात्र, बाळासाहेबांनी भरसभेत पूर्वाश्रमीचे काँग्रेसचेच प्रभाकर उदगीरकर यांच्या उमेदवारीची घोषणा करून राजकीय खेळी केली होती. खरे तर उदगीरकर यांनी शिवसेनेकडे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. पण ठाकरे यांनी त्यांच्या नावाची विधानसभेसाठी घोषणा करून सर्वांनाच अचंबित केले होते. सन 1993 मध्ये किल्लारीला भूकंप झाल्यानंतर परिसरातील हजारो नागरिकांचा बळी गेला होता तर शेकडो गावे उद्ध्वस्त झाली होती. त्या वेळी शिवसेनेचा सेवाभाव ग्रामस्थांनी अनुभवला होता. शिवसैनिकांनी दिवसरात्र झटून आपत्तीग्रस्तांची मदत केली. शिवसेनेने पुनर्वसन करण्यासाठी औसा तालुक्यातील लिंबाळा (दाऊ) गाव दत्तक घेतले. त्याचे भूमिपूजन करण्यासाठी 1994 मध्ये बाळासाहेब लिंबाळ्यात आले होते. त्यांच्यासमवेत मीनाताई ठाकरे, उद्धव आणि राज ठाकरे होते. त्या वेळी त्यांनी शिवसेनेला साजेशी दर्जेदार घरे बांधा, उत्कृष्ट पुनर्वसन करा, अशा सूचना तत्कालीन मराठवाडा संपर्क नेते दिवाकर रावते यांना दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामस्थांना सर्वसोयींनीयुक्त 393 टुमदार घरे बांधून देण्यात आली. या वेळी बाळासाहेबांनी नागरसोगा, जवळगा (पोमादेवी) या गावांना भेटी देऊन भूकंपग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्नही केला होता.

भगवे वादळ समाजवाद्यांच्या पथ्यावर
1995 मध्ये निलंगा येथे बाळासाहेबांची जंगी प्रचारसभा झाली. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, जनता दलाकडून कॉ. माणिकराव जाधव आणि शिवसेनेकडून चंचलादेवी सूर्यवंशी मैदानात होते. सामना तिरंगी होता. त्या वेळी बाळासाहेबांनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेत निलंगेकरांवर घणाघाती टीका करून ‘सभेला नुसतीच गर्दी करू नका, त्याचे मतांत रूपांतर करा, परिवर्तन झाले पाहिजे’असे बजावले होते. त्यातून जनता एकवटल्याने परिवर्तन झाले. मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या मातब्बर अशा निलंगेकरांचा पराभव झाला होता. पण त्यांना नमवले होते जनता दलाचे जाधव यांनी 36 हजार मतांनी. कारण निलंग्यातील जनतेला माहीत होते की, तिरंगी लढतीचा फायदा काँग्रेसला होतो आणि बलाढ्य निलंगेकरांसारख्या नेत्याला हरवण्याची सर्वार्थाने ताकद शिवसेनेच्या उमेदवारात नव्हती. त्यामुळे बाळासाहेबांच्या सभेचा असा फायदा जनता दलाला मिळाला होता.

वार्ताहराला जवळ बसवून घेतले
निलंगा येथील सभा झाल्यानंतर बाळासाहेबांनी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. ग्रामीण भागातील ही प्रेस असल्याने पत्रकारांची एकच गर्दी उसळली होती. त्यामुळे अनेकांना बसण्यासाठी जागाही मिळाली नाही. त्यामुळे ज्येष्ठ पत्रकार निवृत्तीराव इंगळे तेथेच कोप-यात उभे राहून टिपणे घेत होते. त्यांच्यावर नजर पडताच बाळासाहेबांनी त्यांना आपल्या बाजूला बसवून घेतले. त्या वेळी बाळासाहेबांसोबत काढलेला फोटो इंगळे यांनी आजही जपून ठेवला आहे.