आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena President Udhav Thackeray Issue In Maharashtra

उद्धवजींचे क्लासेस!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आओ हुज़ूर तुमको सितारों में ले चलू
दिल झूम जाए ऐसी बहारों में ले चलू

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले सध्या हेच गाणे गुणगुणत आहेत... महायुतीत मनसेने यावे म्हणून शीळ घालत आहेत, पण तिकडून प्रतिसाद मिळत नाही आणि मुलाला पालकांनी मुकाटपणे घरी बस नाहीतर... असा दम भरावा, तसा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना इशारा दिला आहे. त्यामुळे मैं चुप रहूँगा, अशी हमीच आठवलेंना द्यावी लागली आहे...

उद्धव यांनी सामनामधून राज यांना डोळे मारणार्‍या भाजप व रिपाइं नेत्यांचा समाचार घेतला आहे. कालपर्यंत सगळे मिळून डोळे मारत होतो, मग आता एकाएकी उद्धवजींना काय झाले, म्हणून आठवले बिचकले. भाजप नेते हतबल झाले आणि यावेळची बाजीही राज यांनीच मारली! आधी तुमच्या तिघांमधील जागावाटपाचा तिढा सोडवा, मगच मला आवतण द्या, अशी त्यांची प्रतिक्रिया आहे...

काँग्रेस-राष्ट्रवादीचा लोकसभा-विधानसभा निवडणुकांत पराभव करायचा असेल, तर मनसेला सोबत घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आठवले यांनी केले. वास्तविक शिवशक्ती व भीमशक्तीच्या युतीचा प्रयोग मुंबई महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जवळपास फेल गेला. आठवले हा स्पेंट फोर्स असल्याचे सिद्ध झाले, परंतु निवडणुका हा रिपब्लिकन नेत्यांच्या खर्चाचा नव्हे, तर कमाईचा काळ असतो. पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीची छावणी होती, आज शिवसेना-भाजपची छावणी आहे, इतकाच काय तो फरक.

मनसेकडे बर्‍यापैकी शहरी दलित मते आहेत. त्यामुळे मनसे महायुतीत आल्यास आपले काय होणार ही रिपाइंची चिंता होती. आता मनसे महायुतीत येणार नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाल्यावर, त्यांनी राजना आमंत्रण दिले आहे... राज्यसभेवर जाण्याच्या दृष्टीने मनसेच्या आमदारांची साथ लागेल हे लक्षात ठेवून!

लोचटपणा हा तर काहींचा स्थायीभावच आहे. शिवसेनाप्रमुख उद्वव ठाकरे यांनी कितीही अपमान केला, तरी मातोश्रीवर जाऊन लोटांगण घालणार्‍या नेत्यांची तेथे कमतरता नाही. उद्धव व राज एकत्र येणे या जन्मात शक्य नाही, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने खासगीत सांगितले, तरीसुद्धा गोपीनाथ मुंडेंपासून आशिष शेलारपर्यंत सर्वजण अहोरात्र मनसे, मनसे करत असतात...एकनाथ खडसे-राज ठाकरे कलगीतुरा रंगला की भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी राजकडे जाऊन वातावरण निवळवण्याचा प्रयत्र करतात. अमुक इतक्या जागा हव्यात, अशी नाटकी ताल-स्वरात आठवलेंनी ओरड केल्याबरोबर मुंडेंपासून प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणविसांपर्यंत विविध भाजप नेते जाऊन आठवल्यांची समजूत काढतात.

मुंडे-आठवले मनसेचे भजन करायला लागल्यावर उद्धवजी अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. राज्यातील लोकशाही आघाडी सरकारचा पराभव करण्यास महायुती समर्थ असताना चौथ्याला आमंत्रण देऊन युतीचा धोबीघाट बनवण्याचे नसते उपद्व्याप का करता? अतिघाई व हाव धराल, तर तुमचा श्रीशांत होईल, असा इशारा सामना ने अग्रलेखातून दिला आहे. आपल्या मित्रांनी सध्या स्वत:ची कामे सोडून टाळी-मृदंगाचे चाटे क्लासेस काढले आहेत. मांडव कोणाचा, यजमान कोण, नक्की स्वयंवर कोणाचे याचाच गोंधळ उडाला आहे, असा उपरोध संपादकीयात करण्यात आला आहे. मुळात आघाडीला धूळ चारण्यास सेना-भाजप युती असमर्थ असल्याची कबुलीच टाळी-मृदंगातून दिली जाते. त्यात आपल्या नेतृत्वाबद्दलही या मंडळींना विश्वास वाटत नाही, यामुळे उद्धवजींचा संताप झाला आहे.

खरे तर, साधारणत: गेली आठ-दहा वर्षे उद्धवजींनीच पक्ष सांभाळला आहे. मुंबई महापालिकेतही त्यांनी पुन्हा पुन्हा विजयश्री खेचून आणली व ग्रामीण भागात काम वाढवले, परंतु त्यांच्याकडे बाळासाहेबांचा करिश्मा नाही आणि दुर्दैवाने करिश्म्याशिवाय तो पक्ष विस्तारू शकत नाही. शेवटी शिवसेना हा गंभीर विचारसरणीवर आधारलेला पक्ष नसून तो भावनाप्रक्षोभाचे राजकारण करणारा पक्ष आहे. राजकारणात विचारसरणीचा काही संबंध नाही, असे खुद्द बाळासाहेबच म्हणत असत.

मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंनी महापालिका व विधानसभेत चढत्या क्रमाने यश पटकावले. त्यांच्या सभांना फक्त अलोट गर्दीच उसळत नाही, तर भाषणांना लोकांचा प्रतिसादही जबरदस्त असतो. तरुण व महिलांची गर्दीही प्रचंड असते, जशी ती बाळासाहेबांच्या सभांना व्हायची. या स्थितीत मनसेला बरोबर घेतले पाहिजे असे भाजपला वाटते आणि केंद्रात सत्तेत येण्यासाठीही त्यांना मनसेची गरज वाटते. ज्यावेळी काँग्रेसमध्ये फूट पडली, तेव्हा ज्येष्ठ नेते एकीकडे व इंदिरा गांधी दुसरीकडे अशी परिस्थिती होती, परंतु इंदिराजींच्या मागे लोक होते आणि ज्येष्ठांकडे फक्त पदे! त्यामुळे इंदिरा गाधींची तीच खरी काँग्रेस असल्याचे जनतेने मानले. शिवसेनेकडे ज्येष्ठ व अनुभवी नेते असले, तरी बाळासाहेबांचा वारसा राजकडेच आहे, असे सामान्यजनांनाच नव्हे, तर अनेक शिवसैनिकांनाही वाटते. या जखमेवर पुन्हा मुंडे-आठवलेही मीठ चोळत असल्याने, आपली पत ती काय उरली, या भावनेतून सामनाचा अग्रलेख उतरलेला आहे. मुळात मनसेमुळे मराठी मतात फूट पडते, अशी टीका करूनही काहीही उपयोग झालेला नाही. कारण मनसेची मते उलट वाढतच आहेत. मनसेला मत देणारे, मनसेलाच निवडून द्यायचे म्हणून मत देतात. मनसे कुठल्याही युती-आघाडीत सामील झाल्यास, बाकीचे पक्ष व मनसे यात फर तो काय, असा सवाल केला जाऊ शकतो. राज ठाकरे यांना हे बरोबर माहीत आहे.

गंमत म्हणजे, आज राजवादी नेत्यांवर बरसणारे उद्धव ठाकरे काही महिन्यांपूर्वी स्वत:च टाळी देण्याची भाषा बोलत होते. सैनिकांची गळती रोखण्याची ही व्यूहरचना होती. दोन पक्ष एकत्र आल्यास, इकडून तिकडे उडी टाकायचे मावळ्यांच्या मनातही येणार नाही, असा आडाखा होता. टाळीसाठी पुढे केलेल्या हाताकडे दुर्लक्ष करून राजने उलट या गोष्टीची आपल्या दौर्‍यात खिल्लीच उडवली. लोचट मंडळी तरीही राजभोवती घुटमळत राहिल्यामुळे पक्षप्रमुख खवळले.
या निमित्ताने सेनानेतृत्वाने तत्त्वशून्य आघाड्यांबाबत प्रवचन झोडले आहे, पण शिवसेनेने पूर्वी नारायण राणेंना हरवण्यासाठी सिंधुदुर्गात राष्ट्रवादीबरोबर कोकण विकास आघाडी केली होती. विदर्भात जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांत राष्ट्रवादीस पाठिंबा दिला होता आणि पुणे पॅटर्न तर फिक्सिंगचा आदर्श नमुनाच होता!

सामनाने मात्रा दिल्यानंतर, महायुतीत मनसेला घ्यायचे की नाही, हे उद्धवच ठरवतील, असा खुलासा आठवलेंनी केला आहे. आपली ताकद किती हे न ओळखता वारेमाप विधाने करणार्‍या आठवलेंना शेवटी जागा दाखवून द्यावी लागली. जाहीर अवमान झाल्यावरदेखील तो गिळून शिवशक्तीच्या मागेमागेच जाण्याची त्यांची भूमिका दिसते!

राजचा अनुनय करण्यापेक्षा रिपब्लिकन गटातटांना एकत्र करून भीमशक्तीची ताकद वाढवण्याचे आवाहन सामनाने आठवलेंना उद्देशून केले आहे, परंतु प्रकाश आंबेडकरांनी स्वत:ची आघाडी आधीच स्थापन केली आहे. काही नेते काँग्रेसच्या कच्छपी लागले आहेत. तेव्हा भीमशक्तीच्या छायेत येणार कोण? मुळात शिवसेनेत एकसंधपणा आहे कुठे? दिवाकर रावते-रामदास कदम यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. 1995 नंतरच्या झोपडपट्ट्यांना संरक्षण देण्यास विरोध ही सेनेची अधिकृत भूमिका आहे. मात्र, ठाण्यात सेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी अनधिकृत बांधकामांचे समर्थन केले. बाळासाहेब असताना त्यांचे असे धाडस झाले असते काय? नाशिक महानगरपालिकेत सत्तास्थापनेवेळी सेनेने मनसेऐवजी दोन्ही काँग्रेसला मदत केली. नंतर स्थायी समितीसाठी मनसेच्या उमेदवारास सेनेने पाठिंबा दिला! म्हणजे शिवसेनेच्या धोरणात एकसूत्रता व सातत्य नाही. पक्षप्रमुखांचा वचक नाही, दरारा नाही.
पुन्हा, राज्यात एकदा सत्ता मिळाली होती हे त्यांच्या डोक्यातून गेलेले नाही. 1995 मध्ये हिंदुत्व अथवा मराठी अस्मिता या अजेंड्यावर सेना-भाजपला सत्ता मिळाली नव्हती, तर काँग्रेसमधील गटबाजी आणि पवारनीतीच्या परिणामी युतीच्या हाती राज्य आले. पुढे हे राज्य गेले व 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला. आता परत सत्ता मिळवण्यासाठी तेच तेच मुद्दे न उगाळता नवा कार्यक्रम द्यावा लागेल.

आज विधिमंडळात युतीचा कोणताही प्रभाव दिसत नाही. रस्त्यावरच्या आंदोलनातही जोर नाही. पूर्वीचे चित्र वेगळे होते. 1988 मध्ये औरंगाबाद महापालिकेत 60 पैकी 26 नगरसेवक, तर 1995 मध्ये जवळपास निम्मे सेनेचे आले. कल्याण, नाशिक असे गड सर झाले. विदर्भ-मराठवाड्यात बरीच मजल मारली गेली. सेनेने औरंगाबाद सर केलेले पाहून साक्षात शरद पवार म्हणे हवालदिल झाले होते...मराठवाड्यात सैनिक रुळांवर आडवे पडून रेल्वे रुंदीकरणाचा, तर विदर्भात संत्र्याचा व कुपोषणाचा प्रश्न मांडत होते. नगर जिल्ह्यातील सेनेचा एक तालुकाप्रमुख वडार समाजाचा होता. त्याने तेथील सत्ताधार्‍यांच्या जुलमाविरुद्ध आवाज उठवला. त्याच्यासह इतर सैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. तेव्हा त्या तालुकाप्रमुखाने आपली गाढवे विकून ते खटले चालवले. एवढी निष्ठा. एकेकाळी मुंबईच्या कापडगिरण्यांच्या दरवाजावर उभे राहून कामगारांकडून वसुली करणार्‍या, पैसे न फेडल्यास त्यांना आया-बहिणींवरून शिव्या देणार्‍या पठाणांना सेनेने सरळ केले होते. ती शिवसेना आज लुप्त झाली आहे. मनसेमध्ये लोक अस्सल सेना बघत आहेत. शिवसेनेची प्रतिमा बदलण्याचा उद्धव ठाकरेंचा उपक्रम रिझल्ट देत नाही आणि आजचे दिवस तर रिझल्ट ओरिएंटेड क्लासेसचेच आहेत. मग ते क्लास कोणाचेही असोत!
hemant.desai001@gmail.com