आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण क्षेत्र झाली प्रयोगशाळा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जानेवारी महिना हा जसा नवीन संकल्पांचा तसाच सरलेल्या वर्षाचा आढावा घेण्याचा. याच प्रथेनुसार देशभराचे शैक्षणिक वास्तव, ताळेबंद ‘असर’च्या रूपाने 15 जानेवारीला दिल्लीत प्रकाशित करण्यात आला. ‘प्रथम’ या संस्थेने देशभरातील 16000 गावांमधील 14724 शासकीय शाळांचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. यातून महाराष्‍ट्रासंबंधित आकडेवारी वेगळी केली तर ‘विदारक’ असंच याचं वर्णन करावं लागेल. ज्या महाराष्‍ट्राला शैक्षणिक चळवळीचा इतिहास व वारसा लाभला आहे त्या महाराष्‍ट्राचे आजचे चित्र निराशाजनक आहे. नमुनादाखल आठवी इयत्तेच्या 38% विद्यार्थ्यांना 10 ते 99 पर्यंतची अंकओळख, 21.2% मुलांना वजाबाकी, 33.8% मुलांना भागाकार करता येतो, असे हा अहवाल सांगतो. असेच निष्कर्ष तिसरी, पाचवी या इयत्तांसंबंधीही नोंदवले आहेत. ही स्थिती आजच कळली असे मात्र अजिबातच नाही. कारण याच संस्थेमार्फत याच सर्व निकषांवरचा पाहणी अहवाल दरवर्षी प्रकाशित होतो. म्हणजे रोग नवीन नाही, सर्व निदानविषयक चाचण्या झालेल्या आहेत, तपासणीचे निष्कर्षही हाती आलेले आहेत, रोग कोणता ते ठरवून झालंय; पण तरीही गेल्या काही वर्षांपासून औषधोपचार केलेले नाहीत, ही गोष्ट भयंकर आहे. प्रश्न असा उभा राहतो की, रोगी दगावण्याची वाट बघतोय का आपण?
शिक्षण क्षेत्र ही आज एक प्रयोगशाळा बनली आहे. बदलीची वाट पाहणारे शिक्षण सचिव व शिक्षणाच्या अर्थापेक्षा अर्थकारणाकडे लक्ष ठेवून असलेले शिक्षणमंत्री, यामुळे बदलती धोरणं व अल्पकालीन उपाययोजनांचा सुळसुळाट आपण येथे अनुभवतो. वर उल्लेखिलेल्या दोन मूलभूत कौशल्यांवर पुरेसे काम झालेले नसताना पहिलीपासून इंग्रजी, इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळा, सर्वांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा हे सर्व आणण्याचे कारण अनाकलनीय आहे.
भाषा हे सर्व विषयांच्या आकलनाचे माध्यम आहे. कोणतेही मूल, त्याची परिसरभाषा सहजच शिकतं. शाळेत या शिकण्याला एक चौकट, एक आकृतिबंध मिळतो. मुलांचे त्यांच्या घरातून, परिसरातून आलेले, त्यांच्या अनुभवविश्वाशी नाते सांगणारे, अर्थासह मनात उतरणारे शब्द, वाक्य मुले सहजतेने वाचतात. ‘टीचर’ पुस्तकात सिल्विया वोर्नर या शिक्षिकेचे लेखन-वाचन यासंबंधीचे अनुभव प्रत्ययकारी आहेत. ही इंग्रज महिला न्यूझीलंडमधील एका खेड्यात माओरी जमातीच्या मुलांना शिकवण्यासाठी जाते. मुलांना लेखन-वाचन शिकवण्यासाठी प्रभावी संवादी तंत्र ती विकसित करते. माओरी खेड्यातील स्वाभाविक वर्तनशैली, त्यांची जगण्यातील उत्स्फूर्तता, परस्परातील आत्मीयता, हेवेदावे, भांडणं, गाणी यांची गुंफण ज्या पुस्तकात नाही ती त्यांना परकीच वाटतात, हा तिचा अनुभव. शाळेत आल्यावर मुलं जो शब्द मागतील तो त्यांना कार्डावर लिहून द्यायचा, तो त्यांचा असल्याने लगेच आत्मसात होतो, याचा तिला प्रत्यय येतो. ही मुले स्वत:चं वाचन साहित्य स्वत:च बनवतात व या प्रयोगातून लेखन-वाचन सहजतेने घडतं. असाच अनुभव भाषा विकासाचे जाणीवपूर्वक प्रयत्न करणा-या अनेकांना आहे. एकदा ही भाषा पक्की झाली की, भाषा शिक्षणाचं मर्मच गवसतं मुलांना. शब्दांशी खेळण्याची मजा मुलांना कळली पाहिजे, परंतु त्यासाठी तशा संधी त्यांना उपलब्ध व्हायला हव्या.
गणितासाठीही भाषेचा पाया पक्का असणं गरजेचं आहे. लहान मुलांना गणित आवडलं तर जमतं व जमलं तर आवडायलाही लागतं. यासाठी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्यांच्या भोवताली गणित आहे, हे त्यांना जाणवणं. झाडांची पाने, शेंगेतील बिया, जनावरांचे पाय, शिंगे, कणसातील दाणे, काड्यापेटीतील काड्या अशा सर्व वस्तू गणिताच्या प्रवासातील त्यांच्या साथीदार बनू शकल्या तर प्रवास सोपाच नाही, गमतीचाही होतो. मूर्त गोष्टींमधले गणित मुलांना लवकर कळते. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे नुसते शब्द किंवा क्रिया नाहीत तर संकल्पना आहेत. त्यांचा अर्थ कळायला त्यांना व्यवहाराची जोड हवी. म्हणूनच असे वाटते की, या दोन्ही विषयांच्या अध्यापनाचे भान नव्याने व वारंवार जागवायला हवे.
शिक्षण क्षेत्रात दरवर्षी हजारो डीएड, बीएड पदवीधर ओतले जातात. शिक्षणशास्त्र महाविद्यालये कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे फोफावली आहेत. त्या प्रमाणात नोक-या उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रवेश घेणा-यांची संख्या घटते आहे. कॉलेजला न येताही पदवी घ्या, असे म्हणत महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या मागे आहेत. एकही पाठ न घेणा-या, मुलांसमोर एकदाही उभे न राहणा-या या भावी शिक्षकांकडे अध्यापनाची कोणती कौशल्ये असतील हे सहजच स्पष्ट होईल. दर्जेदार शिक्षणशास्त्र महाविद्यालये, कालसुसंगत शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
आरटीईअंतर्गत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती सर्व शाळांमध्ये लागू करण्यात आली. याचा सर्वदूर प्रचलित असलेला अर्थ म्हणजे ‘आठवीपर्यंत मुलांना नापास न करता पुढच्या वर्गात पाठवणे.’ ‘असर’च्या अहवालातील गणित, भाषा विषयाच्या खालावलेल्या टक्केवारीमागे वरील गैरसमज कारणीभूत आहे, असे प्रतिपादन ‘प्रथम’च्या संचालक उषा राणे यांनीच केले आहे. खरं तर यासंबंधीची प्रशिक्षणे राज्यभर झाली आहेत. पण या मूल्यमापन पद्धतीचे मर्म, आवश्यकता, गांभीर्य पोहोचले नसल्याने स्वीकारार्हता सोडाच, ही एक नसती ब्याद असल्याचीच भावना बहुसंख्य शिक्षकांची आहे. प्रभावी अंमलबजावणी व पाठपुराव्याची गरज येथेही आहे.
खासगी शाळा व शिकवणी वर्गांना जाणा-या विद्यार्थ्यांचे वाढणारे प्रमाण या अहवालात नोंदवले आहे. शासकीय शाळांसाठी ही चिंतेची बाब आहे. खासगी शाळांबरोबरच इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडेही ओघ वाढला आहे. शासकीय शाळांचे रंगरूप व तेथील शिक्षणाचा दर्जा हे यामागील दोन प्रमुख मुद्दे आहेत. लोकसहभाग व स्थानिक लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती एकत्र आली तर या शाळांचा पूर्ण कायापालट शक्य आहे.
केरळमधील कोझिकोडे जिल्ह्यातील नादाक्कावूमधील शासकीय कन्याशाळा अशा सहभागाचा वस्तुपाठ आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या आराखड्यात इयत्ता दुसरीच्या स्तरापर्यंत मूलभूत वाचन व गणिती कौशल्ये, तर इयत्ता पाचवीच्या स्तरापर्यंत तार्किक विचार, अभिव्यक्ती व समस्या परिहार ही कौशल्ये मुलांमध्ये विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. आजच्या पायावर ही इमारत उभी करणे हे अशक्यप्राय आव्हान आहे. आज आपण ज्यांच्यासंबंधी विचार करतो आहोत ती मुले ही आपली राष्‍ट्रीय संपत्ती आहे. मानवी संसाधन विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहायचे असेल तर दूरगामी नियोजन, सातत्यपूर्ण पाठपुरावा व प्रभावी अंमलबजावणीला पर्याय नाही.