आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाची छाया आणि पवार परिवारावरील माया

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


महाराष्ट्राच्या काही भागामध्ये उद्भवलेला दुष्काळ आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी निवडणूक न लढवण्याची केलेली घोषणा याचे पडसाद ऐतिहासिक किल्ले पन्हाळा येथे आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता अभ्यास शिबिरामध्ये उमटले. त्यामुळे एकीकडे पवार साहेबांवर असणा-या मायेचे दाखले देत असतानाच शिबिरावर दुष्काळाचीही छाया असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष वसंत वाणी, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, महिला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा निवेदिता माने यांच्या नियोजनाखाली झालेल्या या शिबिराला कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे रोखठोक भाषण, छगन भुजबळ यांची शेरोशायरी आणि विरोधकांना दुबळे मानू नकाचा सल्ला, आर. आर. पाटील यांचे नेहमीचे इशारे, प्रा. लक्ष्मण ढोबळे यांचे साहित्यप्रचुर भाषण, जयंत पाटील यांचे शांत मतप्रदर्शन, रामराजे निंबाळकर यांच्या आग्रही मागण्या आणि प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांचे मार्गदर्शन या वेळी कार्यकर्त्यांना ऐकायला मिळाले. सर्वच मंत्री आणि वक्त्यांच्या भाषणामध्ये दुष्काळाच्या परिस्थितीचा उल्लेख अपरिहार्यपणे येत होता. सोलापूर, सांगली, सातारा तसेच मराठवाड्यातील दुष्काळाचे चित्र या वेळी स्पष्ट करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अशा आपत्तीमध्ये समाजाला हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यामुळे दुष्काळाची छाया या मेळाव्यावर जाणवत होती. आपण पुन्हा लोकसभा लढवणार नाही असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केल्याने कासावीस झालेल्या नेते-कार्यकर्त्यांनी या वेळी साहेबांनी असलं काही करू नये असा धोशा लावला होता. परंतु अजितदादांनी मात्र बरोबर याच्या उलट भूमिका मांडली. अहो, आता त्यांचं वय 72. माणूस चोवीस तास राबतोय आणि त्यांनी लोकसभा नाही म्हटलीय, आपण सगळे बसू, साहेबांना राज्यसभेसाठी का असेना आग्रह करू, तिथं सहा वर्षे आहेत. साहेबांनी संघटनेला अधिक वेळ देणार असं सांगितलं तर संघटनेला फायदाच होईल ना, असं त्रैराशिक अजितदादांनी मांडलं आणि अनेक जण ते सोडवण्यात मग्न झाले. दुष्काळाचा विषय झाला, शरद पवारांवरील माया व्यक्त करण्यात आली आणि जोडीला अजितदादांना काही नेते आणि कार्यकर्ते यांनी भाषणात भावी मुख्यमंत्री करून टाकले. अखेर अजितदादांना बळेबळे का असेना, खुलासा करावा लागला की आमच्याकडे या पदासाठी आणखी अनेक जण पात्र आहेत. प्रश्न आहे तो तेवढे आमदार निवडून आणण्याचा.

राष्ट्रवादीचे वजनदार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तांबड्या पांढ-या रश्श्यापासून बासुंदीपर्यंत चोख व्यवस्था केल्याने तृप्तीचा ढेकर देत 20 खासदार आणि 100 आमदार निवडून आणण्याचा संकल्प करत नेते, कार्यकर्त्यांनी अखेर पन्हाळा सोडला.