आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिना सिद्धू : नेमबाज
जन्म : 29 ऑगस्ट 1989, लुधियाना येथे आजोळी
कुटुंब : वडील रणवीरसिंह (राष्ट्रीय नेमबाज ), आई रुमिंदर कौर गृहिणी, काका बंदूक दुरुस्त करतात.
पती : रौनक पंडित, आंतरराष्ट्रीय नेमबाज, 7 फेब्रुवारी 2013 रोजी विवाह
चर्चेचे कारण- हिना सिद्धू 10 मीटर एअर पिस्टलमध्ये जगातील नंबर 1 नेमबाज
घरात बंदुकांमध्येच खेळलेली, लहानपणी घरातील भिंतींच्या विटांवर निशाणा साधणारी हिना एक दिवस जगातील नंबर-1 नेमबाज होईल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. लहानपणापासूनच तिला काही तरी वेगळे करण्याची इच्छा होती, असे तिची आई सांगते. ती जे ठरवते, ते करूनच दाखवते. तेसुद्धा तिच्या पद्धतीने. शाळेत मित्र-मैत्रिणी कमी होत्या, पण घरातील प्रत्येक सदस्याशी तिचे घट्ट नाते आहे. आईशी मैत्रिणीचे नाते, वडिलांशी मार्गदर्शक, काका पक्के मित्र तर भाऊदेखील मित्र आहे. हिनाच्या घरात नेमबाजीची परंपरा आहे.
वयाच्या सहाव्या वर्षीच तिने काकांकडे बंदूक चालवण्याचा हट्ट धरला. त्यांनीही आनंदाने तिचा हट्ट पूर्ण केला. त्या दिवशी हिनाच्या हाती आलेल्या बंदुकीने तिला पाहता पाहता नेमबाजीच्या क्षेत्रात ओढून नेले. त्यानंतर घराच्या छतावरील विटांवर नेम धरत तिने आपला निशाणा अधिक पक्का केला. सोबत अभ्यासही सुरूच होता. दहावीनंतर सायन्स घेतले. बारावीत 85 टक्के गुण मिळाले. हिनाला डॉक्टर व्हायचे होते. अचानक तिच्या आयुष्यात एक वेगळे वळण आले. नेमबाजीच्या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी ती पतियाळातील स्वर्ण मॅडमच्या क्लबमध्ये गेली. येथूनच तिच्या करिअरची सुरुवात झाली. दोन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर तिने राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला. नंतर ज्युनियर इंडियन टीममध्ये तिची निवड झाली. 3 महिन्यांनंतर भारताच्या सीनियर टीममध्ये नावनोंदणी केली. आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप खेळण्यासाठी कुवैतला गेली. तेथे हिनाने भारतासाठी वैयक्तिक कांस्यपदक मिळवले. ही तिची पहिली स्पर्धा होती. त्यानंतर तिने शूटिंगवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. 2006 मध्ये वडिलांनी हिनासाठी पहिली गन घेऊन दिली. ही बंदूक तिचे काका आजही सांभाळतात. याच बंदुकीने हिनाने राष्ट्रकुल स्पर्धेत निशाणा साधला होता. तेथे तिला पहिले आंतरराष्ट्रीय पदकही मिळाले होते. हिनाच्या सरावासाठी वडील आणि काकांनी लाखो रुपये खर्च करून घरातच शूटिंग रेंज बांधली. प्रशिक्षण शिबिरासाठी तिला बाहेरगावी जावे लागत होते. तेव्हा आईने चिंता व्यक्त केल्यावर ती म्हणते, ‘आई, आयुष्यात काही मिळवण्यासाठी अशा गोष्टी सहन कराव्या लागतात आणि तुझी मुलगी कशालाही घाबरत नाही.’
लग्नानंतर हिना ज्या कुटुंबात जाईल, तेथे तिला समजून घेतले जावे, अशी आईची इच्छा होती. नेमबाजीची परंपरा असलेल्या घरातच ती सून म्हणून गेल्यामुळे आई समाधानी आहे. हिनाचे सासरे राष्ट्रीय पातळीवरील नेमबाज आहेत. पती प्रत्येक पावलावर तिच्यासोबत असतो. (हिनाच्या आई-वडिलांनी दिलेल्या माहितीवरून..)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.