आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या माफियाच्या टोळीत आर्किटेक्ट, इंजिनिअरचा भरणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोआक्विन गजमॅन, ड्रग्ज गुन्हेगार
जन्म - २५ डिसेंबर १९५४
कुटुंब - चार पत्नी, १० मुले
चर्चेत - जगातील सर्वात धोकादायक ड्रग माफिया पुन्हा एकदा तुरुंगातून पळाला आहे.

जोआक्विन गजमॅनचे हस्तक त्याला चापो नावाने हाक मारतात. ५ फूट ६ इंचांचा हा माणूस अमली पदार्थांच्या जगातील गॉडफादर असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. अमेरिका त्याला मानवतेचा शत्रू मानत आहे. ओसामा बिन लादेननंतर तोच मोस्ट वाँटेड राहिला आहे. मेक्सिकोच्या ला टुना समाजात जोआक्विनचा जन्म झाला. सिनालोआ या भागात अफू शेती केली जात होती. दोन लहान बहिणी अाणि चार भावांमध्ये सर्वांत थाेरला जोआक्विन तिसरीपर्यंत शिकला आणि नंतर वडिलांना मदत करू लागला. सततच्या खोड्यांमुळे त्याला घरात मार खावा लागत होता.
मार टाळण्यासाठी तो मामाचे घर जवळ करी. मात्र, लहान भावंडांना मार खाण्यापासून तो वाचवत होता. नोकरी मिळण्याची शक्यता कमीच असल्याने तोही स्थानिक लोकांसोबत अफूची शेती करू लागला. अफू गोळा करून तो वडिलांना देत असे. काही दिवसांनंतर
लहान भाऊही सोबत काम करू लागला. मात्र, वडील सर्व पैसा दारू आणि स्त्रियांवर खर्च करत होते. यानंतर तो जवळच्या भागात मारिजुआना (अमली पदार्थ) विकू लागला. १५व्या वर्षी तो स्वत: मारिजुआनाची शेती करू लागला. वडिलांशी न पटल्याने त्याला घराबाहेर काढण्यात आले. तेव्हा तो आजोबांजवळ राहू लागला आणि याच काळात त्याला चापो नाव मिळाले. मेक्सिको भाषेत ठेंगण्या व्यक्तीला एल चापो संबोधतात. त्याची उंची कमी असल्यामुळे हे नाव त्याच्याशी जोडले गेले.
घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने काका पेड्रोची भेट घेतली. पेड्रो तेव्हा मेक्सिकोत अमली पदार्थांची तस्करी करत होता. त्यामुळे २० व्या वर्षी जोआक्विन गुन्हेगारी जगतात आला. १९७० च्या दशकात तो ड्रग माफिया हेक्टर एल गुएरोसोबत काम करू लागला. अमेरिका
आणि मेक्सिकोच्या सीमेवर तो अमली पदार्थ पाठवण्याचे काम करत होता. एखादा वेळेवर माल पुरवठा करत नसेल, तर जोआक्विन त्याला सरळ ठार करत असे.
पैसा आल्यानंतर त्याने मेक्सिकोत अनेक कंपन्या खरेदी केल्या. मात्र, त्यासाठी दुसऱ्यांची नावे वापरली. कंपन्यांत ड्रग्ज, शस्त्र आणि रोकड ठेवली जात होती. आपल्या टोळीत आर्किटेक्ट आणि इंजिनिअर ठेवणारा जगातील तो एकमेव ड्रग्ज माफिया आहे. अमेरिका आणि मेक्सिको सीमेवर बोगदे तयार करून तस्करीसाठी त्याचा उपयोग करणे हा त्यामागचा उद्देश होता. यासाठी त्याने कोट्यवधी रुपये खर्च केले आणि लपवण्याच्या जागाही तयार केल्या.
बातम्या आणखी आहेत...