जगण्याची नवी दिशा... / जगण्याची नवी दिशा...

Jun 06,2011 02:33:42 PM IST

सतत दहशतीच्या छायेत असणारे नक्षलग्रस्त गाव, शिक्षणाचा गंध नाही, त्यात भर म्हणून दारिद्रय़ाची सोबत, हे वर्णन आहे झारखंडची राजधानी रांचीपासून 45 किलोमीटरवरील बुंडू गावाचे, पण याच नक्षलग्रस्त गावातल्या दलित आणि आदिवासी महिलांना रेशमाने स्वत:ची एक नवी ओळख मिळवून दिली आहे. या गावातल्या महिला आता पारंपरिक, कलात्मक वस्तूंची निर्मिती करतात. 2007 साली रेशमाने आपल्या दोन साथीदारांसह शुची स्मितो आणि बदादूर यांच्याबरोबर या भागातल्या महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी ही मोहीम सुरू केली. रेशमाने शांतीनिकेतनमधून बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स, महाराजा सेगीरावहून मास्टर्स डिग्री आणि जपानमधून फेलोशिप मिळवली आहे. 25 वर्षांच्या पोलिओग्रस्त देवंतीपासून 80 वर्षांच्या मीनूपर्यंतच्या सर्व वयोगटातल्या जवळपास 70 महिला आज रेशमासोबत आहेत. आज त्या रांची, अहमदाबाद, आणि दिल्लीत कलेचे प्रदर्शन भरवतात.

बुडूंच का निवडले?
उच्चविद्याविभूषित असलेल्या रेशमाने आपल्या या कामासाठी बुंडूसारख्या नक्षलग्रस्त भागाची निवड का केली हा प्रश्न सर्वांनाच पडू शकतो. बुंडू हे आपले गाव आहे. या गावातल्या मातीशी आपले घट्ट नाते आहे. नक्षलवादामुळे इथल्या लोकांना सोसावे लागणारे दु:ख आपण डोळ्यांनी पाहिले आहे. त्यावेळी इथल्या लोकांसाठी काहीतरी करण्याचा आपण पक्का निश्चय केला. या दृष्टिकोनातून या गावाची निवड केल्याचे रेशमाने भास्कर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. देशातल्या अनेक महत्त्वाच्या भागांत आधार महिला शिल्प उद्योगाने आपल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवले आहे. शिक्षणाचा गंधही नसणार्‍या महिलांना रेशमाने स्वत:च्या पायावर उभे करून सगळ्यांसाठीच आदर्श घालून दिलाय.

अशी आहे महिलांच्या कामाची पद्धत
या भागातल्या दलित आणि आदिवासी महिला सकाळी आपले घरकाम आटोपल्यानंतर अकरा वाजेपर्यंत रेशमाच्या घरी पोहोचतात. त्यानंतर जवळच्या शेतातूनच आणलेल्या चांगल्या मातीला कुंभाराकडून हवे तसे आणि आकर्षक पद्धतीचे आकार दिले जातात. त्यानंतर आकार दिलेल्या वस्तूंना तिथल्याच जंगलातील फुले, पाने याने सजवले जाते. माडाच्या झावळ्या आणि बांबूच्या साह्याने सुंदर दागिने, पिशव्या इत्यादी तयार केले जाते. त्यानंतर त्याला आकर्षक रंगही दिला जातो.

X