आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडिया प्रबळ झाला, पण किती प्रमाणात ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावरील राजकीय परिणामांबाबत एका पाहणीने नव्या वादाला तोंड फुटले आहे. आपल्या देशातील सोशल मीडिया निवडणूक निकालांवर परिणाम करण्याएवढा प्रबळ झाला आहे का?

अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीवर सोशल मीडियाचा खूप प्रभाव होता. एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यूच्या अहवालानुसार बराक ओबामांच्या विजयामध्ये त्यांच्या धोरणांपेक्षा त्यांनी राबवलेल्या ऑनलाइन प्रचाराचा मोठा वाटा आहे, पण अमेरिकेतील दोन्ही प्रमुख पक्षांनी प्रचारासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला होता. त्यामुळेच निकालांवर पूर्णत: सोशल मीडियाचा प्रभाव होता असे म्हणता येणार नाही. भारतात केलेल्या पाहणीलाही निवडणूक निकालाशी जोडण्यात आलेले नाही. त्यामध्ये फक्त प्रभावाची चर्चा आहे, निकालांवर झालेल्या परिणामांची नाही. फेसबुक युर्जसचे मतदानाबाबतचे विचार, वय आणि राजकीय सक्रियतेचाही त्यात उल्लेख नाही.

पाहणीत काय आहे? भारतीय इंटरनेट आणि मोबाइल संघाच्या सहकार्याने आयरिश नॉलेज फाउंडेशनने सोशल मीडियाबाबत सर्वेक्षण करून अहवाल दिला की, लोकसभेच्या 543 पैकी 160 जागांवर सोशल मीडियाचा अत्याधिक प्रभाव आहे. एखाद्या विजयी उमेदवाराला गेल्या निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यापेक्षा तेथील फेसबुक युर्जसची सध्याची संख्या अधिक आहे, अशा जागांचा यात समावेश आहे. उदाहरणार्थ ठाणे लोकसभा मतदारसंघात 18 लाख मतदार आहेत. त्यापैकी 7.5 लाख मतदारांनी गेल्या वेळी मतदान केले. राष्ट्रवादीचे संजीव गणेश नाईक यांना 3.01 लाख मते पडली, ते 49 हजार मताधिक्याने निवडून आले. सध्या येथे 4.19 लाख लोकांचे फेसबुकवर अकाउंट आहे. नाईक यांच्या मताधिक्यापेक्षा ही संख्या सुमारे नऊपट आहे.

कानाडोळा करता येणार नाही: 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी देशातील 16 लाख लोक सोशल मीडियाचा वापर करत होते. पण आज 6.5 कोटी भारतीय सोशल मीडियावर सक्रिय आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी हा आकडा 8 कोटींच्या वर गेलेला असेल. देशाची 6 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या सोशल मीडियावर असेल. याकडे कानाडोळा करता येणार नाही. अरब देशातील क्रांतीसह अण्णा हजारेंच्या आंदोलनापर्यंत सोशल मीडियाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. दिल्ली येथील सामूहिक लैंगिक अत्याचारप्रकरणी तर सोशल मीडियाच रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत होते. म्हणूनच तर पंतप्रधान कार्यालयापासून नियोजन आयोगापर्यंत सर्वांनीच सोशल मीडियात सक्रिय होण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.