आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थट्टा लावील नावाला बट्टा, सोशल साइटवर गमतीने फेरफार करणे गंभीर गुन्हा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर - ‘बरी नव्हे थट्टा, भल्याभल्यास लाविला बट्टा, अशी ही थट्टा’, असे शाहीर साबळे यांनी आपल्या भारुडात कित्येक वर्षांपूर्वीच सांगून ठेवले असून, आजच्या इंटरनेट युगालाही ते तंतोतंत लागू पडते. थोडीशी गंमत करण्यासाठी किंवा कुणाला तरी त्रास देण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइटवर एखाद्या अकाउंटमध्ये फेरफार करणे आता महागात पडू शकते.
हा गंभीर गुन्हा करणा-या उदयपूरमधील काही युवकांना नुकतेच गजाआड करण्यात आले असून, त्यांना जबर दंडही ठोठावण्यात आला आहे. आजकाल बहुतेक सर्वच तरुण-तरुणींची फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर खाती आहेत. दिवसातील अनेक तास ते या साइट्सवर असतात. या साइट्सचा चांगला उपयोग करणा-या तरुणांबरोबरच काही
खोडकर वृत्तीची मुले त्यांचा दुरुपयोगही करतात. पोलिस ठाण्यांमध्ये दिवसेंदिवस अशा तक्रारींचे प्रमाण वाढत चालले आहे. यातील कुणाचे
अकाउंट हॅक करण्यात आले आहे, तर कुणाच्या प्रोफाइलमध्ये फेरफार करून
अश्लील छायाचित्रे किंवा साहित्य अपलोड करण्यात आले आहे. काही प्रकरणांत आपसातील भांडण यास कारणीभूत आहे, तर ब-याच प्रकरणांत गंमत म्हणून असे केल्याचे समोर आले आहे. बहुतेक प्रकरणांत तरुणींना लक्ष्य करण्यात आले आहे.
पुरावे भक्कम असतात
पोलिस महानिरीक्षक गोविंद गुप्ता म्हणाले की, अशा प्रकारची प्रकरणे आजकाल वाढली असून, आयटी कायद्यान्वये असे गुन्हे गंभीर म्हणून गणले गेले आहेत. आयटी कायद्याबरोबरच गुन्ह्याच्या प्रकारानुसार भारतीय दंड संहितेतील कलमेही लावली जातात. अशा प्रकरणांमध्ये शास्त्रीय पुरावे भक्कम असल्याने आरोपीला शिक्षा मिळतेच. ब-याच प्रकरणांमध्ये पीडित आणि आरोपी दोघेही तरुण असतात आणि कुठल्या तरी लिंकने परस्परांशी त्यांची ओळख झालेली असते. या प्रकरणांची चौकशी करताना सर्वात जास्त वेळ वेबसाइटकडून माहिती मिळवण्यात जातो. संबंधित व्यक्ती आणि संगणकाबाबत वेबसाइटकडून माहिती मागवली जाते. कधी ही माहिती लवकर मिळते, तर कधी बराच वेळही लागतो; पण ही माहिती नक्की मिळते आणि त्यानंतर आरोपी गजाआड होतो.

कडक शिक्षेची तरतूद
अ‍ॅडव्होकेट मनीष शर्मा यांनी सांगितले की, आॅनलाइन खात्याचा आयडी हॅक केल्यास आयटी अ‍ॅक्टच्या 65, 66 व 67 या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात येतो. गुन्हा सिद्ध झाल्यास कलम 67 नुसार तीन वर्षांची शिक्षा आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. दुस-यांदा हाच गुन्हा केल्यास 5 वर्षांची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंडाची तरतूद आहे.

दोघांना अटक
सप्टेंबर महिन्यात उदयपूरमधील एका खासगी इंजिनिअरिंग महाविद्यालयातील 20 विद्यार्थी-विद्यार्थीनींचे फेसबुक आयडी हॅक करण्यात आले होते. उदयपूर पोलिसांनी आयटी कायद्याच्या 65, 66,67 कलमांन्वये गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.