आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वर‘राज’उलगडणार स्वर‘लता’चे भावतरंग; लतादीदींच्या हस्ताक्षरातील गाणी पुस्तकरूपात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लता मंगेशकरांचे प्रभुकुंज आणि स्वरराज ऊर्फ राज ठाकरेंचे कृष्णकुंज यांच्यातील जिव्हाळा हा जणू आई-मुलाच्या नात्यासारखा... म्हणून त्या दोघांचे सूर अगदी पूर्वीपासूनच जुळलेले. त्यामुळे राज ठाकरे यांनी लतादीदींच्या गौरवार्थ केलेल्या प्रत्येक कलात्मक गोष्टीबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. लतादीदींच्या गान कारकीर्दीला नुकतीच ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. १९४२ ते २०१७ इतका मोठा, जवळपास सहा-सात पिढ्यांनी व्यापलेला हा काळ राज ठाकरेंना म्हणूनच खुणावतोय. या वेळी ते साकारत आहेत लतादीदींच्या हस्ताक्षरातील गाण्यांचे अतिशय आगळेवेगळे असे कॉफी टेबल बुक...  


लता मंगेशकर यांची कारकीर्दीच्या प्रारंभापासूनच पार्श्वगायनाची पूर्वतयारी करताना लतादीदींची स्वत:ची खास पद्धत होती. एक शिस्त होती. त्यानुसार जेव्हा लतादीदी गाण्याची रिहर्सल किंवा रेकॉर्डिंगसाठी जात तेव्हा त्या सर्वप्रथम जे गाणे गायचे आहे ते सोबत आणलेल्या वहीत किंवा डायरीत स्वत:च्या हस्ताक्षरात लिहून काढत. संगीत दिग्दर्शकाच्या-गीतकाराच्या सूचनेनुसार त्यात काही नोंदी करत. छोटेखानी टिपण लिहीत. गाण्यासाठी उपयोगी ठरावे म्हणून काही  खाणाखुणा करत. शेरे लिहीत. मनातले विचार त्यावर उतरवत.  


संगीताच्या क्षेत्रात ऐतिहासिक मोल असलेले व अनेक वर्षे जपून ठेवलेले हे दस्तऐवज लतादीदींनी काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले. या वह्या व टिपणांच्या कागदांची नीट वर्गवारी करून त्यातून एक सुंदर कॉफी टेबल बुक तयार करण्याचा निर्णय लतादीदींची भाची रचना शहा (मीना खडीकरांची कन्या) व राज ठाकरे यांनी मिळून घेतला. सध्या या कॉफी टेबल बुकचे काम जवळपास पूर्ण झाले असून छपाई, आकृतिबंध अशा तांत्रिक बाबतीत पुस्तक सर्वांगसुंदर करण्याचे राज ठाकरे यांनी ठरवले असून पुस्तकनिर्मितीकडे ते जातीने लक्ष पुरवत आहेत. या पुस्तकाच्या शब्दांकनाचे कार्य  लेखक व पत्रकार अंबरीश मिश्र हे करीत आहेत. या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेत संगीतातील दर्दी व्यक्तिमत्त्व मंदार कर्णिकही सहभागी झाले आहेत. हा एकूणच दुर्मिळ प्रकारात मोडणारा ग्रंथप्रकल्प असून त्यात संगीत अभ्यासक, गायक-वादक आदींना मार्गदर्शनपर ठरावा असा ऐवज त्याद्वारे प्रकाशझोतात येणार आहे.  
लता मंगेशकर यांच्यावर आजवर अनेक प्रकारची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. मात्र अशा प्रकारचा ग्रंथ प्रथमच प्रसिद्ध होणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची फोटोबायोग्राफी प्रसिद्ध केली होती. आता भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गाण्यांसंदर्भातील पुस्तक प्रसिद्ध करून ते आणखी एक संदर्भमूल्य असलेला ग्रंथ वाचकांपुढ्यात आणत आहेत.  


व्यंगचित्रकार असलेल्या राज ठाकरे यांना संगीताची, चित्रपटांची उत्तम जाण आहे. लता मंगेशकर या त्यांच्या अतिशय आवडत्या गायिका. त्यामुळे लतादीदींच्या गाण्यांवर ते भरभरून बोलत असतात. त्यांच्या लेखी लतादीदी म्हणजे साक्षात सरस्वतीचे रूप. त्यामुळे शिवसेनाप्रणीत शिव उद्योग सेनेचे राज ठाकरे अध्यक्ष असताना काही वर्षांपूर्वी त्यांनी अंधेरी येथे लता मंगेशकर यांच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमातून शिव उद्योग सेनेच्या उपक्रमांसाठी निधी उभारण्यात आला होता. लता मंगेशकर यांना क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व राज ठाकरे हे पुत्रवतच. हे तिन्ही मराठी मानबिंदू काही आपुलकीने एका व्यासपीठावर आल्याचे महाराष्ट्राने बघितले आहे. १० मार्च २०१४ रोजी राज ठाकरे यांनी आपल्या कृष्णकुंज निवासस्थानी सचिन तेंडुलकर यांचा लतादीदींच्या हस्ते सत्कार केला होता. तो क्षणही रसिकांनी आपल्या हृदयात कोरून ठेवला आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, कॉफी टेबल बुकमध्ये काय...

बातम्या आणखी आहेत...