आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीसॅट-7 मुळे विस्तारतील क्षितिजे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘इन्सॅट-थ्रीडी’च्या यशानंतर आता येत्या 30 ऑगस्ट रोजी फ्रेंच गियाना येथील कौरोऊ अवकाश स्थळावरून ‘एरियन’ या युरोपीय यानातून ‘जीसॅट-7’ हा उपग्रह अवकाशात पाठवण्यात येणार आहे. उपग्रह अवकाशातून किती महत्त्वाचे कार्य करू शकतो याची खात्री आता सर्वांनाच झाली आहे. इस्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांचे या कार्याबद्दल अभिनंदन करायला हवे.

‘जीसॅट-7’ या उपग्रहाचे वजन 2550 किलोग्रॅम असून त्यामधील प्रगत तंत्रज्ञान भारताच्या इस्रो संस्थेनेच विकसित केले आहे. दोन हजार सहाशे वॅट शक्ती क्षमतेचा हा उपग्रह एरियन-5 या युरोपीय यानातून अवकाशात पाठवल्यानंतर तो 74 अंश पूर्वेला आपली जागा घेईल. ‘जीसॅट-7’ उपग्रह ‘मल्टिबँड कम्युनिकेशन’ उपग्रह आहे. यूएचएफ, एस बँड, सी बँड आणि के यू बँड सुविधा असणार आहे. भारताच्या नौदलाला विशेषत: पाणबुड्या, युद्धनौका, डिस्ट्रॉयर्स आणि विमाने यांच्या दळणवळण संपर्कासाठी ‘जीसॅट-7’ हा उपग्रह उपयोगी पडणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच उपग्रह भारतीय हवाई दलासाठीही उपयुक्त ठरणार आहे. आपल्या भारतीय नौदलासाठी इस्रोने प्रथमच इतका अत्याधुनिक मौल्यवान तंत्रज्ञान असलेला उपग्रह तयार केला आहे. भारताच्या संरक्षण व्यवस्थेसाठी ‘जीसॅट-7’ उपग्रह विशेष महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

भारतीय नौदल, हवाईदल आणि आर्मीमधील संदेश दळणवळणासाठी ‘जीसॅट-7’ उपग्रह मोठे वरदान असल्याचे इस्रोने म्हटले आहे. वास्तविक हा उपग्रह सन 2011 मध्येच अवकाशात पाठवण्यात येणार होता, परंतु काही कारणाने त्याला उशीर झाला आहे. भारत सरकारने सन 2012-2013 मध्ये उपग्रह पाठवण्यासाठी 207 कोटी तरतूद केली होती, परंतु त्यामध्ये नंतर वाढ करून 448.51 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सन 2013-2014 च्या अंतराळ कार्यक्रमासाठी आणखी 14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘जीसॅट-7’ उपग्रह पंधरा वर्षे कार्यरत राहणार आहे. ‘जीसॅट-7’ उपग्रहातील तंत्रज्ञान हे भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. संपर्क-दळणवळणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली जीसॅट उपग्रहाची मालिका ही इस्रोची महत्त्वाकांक्षी योजना आहे. आतापर्यंत जीसॅट मालिकेतील जे उपग्रह इस्रोने अवकाशात पाठवले आहेत त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे- 1540 किलोग्रॅम वजनाचा जीसॅट -1 उपग्रह 18 एप्रिल 2001 रोजी अवकाशात पाठवण्यात आला होता. त्यानंतर 8 मे 2003 रोजी जी-सॅट-2, 20 सप्टेंबर 2004 रोजी जीसॅट-3, 15 एप्रिल 2010 रोजी जीसॅट-4, 25 डिसेंबर 2010 रोजी जीसॅट-5, 20 मे 2011 रोजी जीसॅट-8, 15 जुलै 2011 रोजी जीसॅट-12 आणि 29 सप्टेंबर 2012 रोजी जीसॅट-10 उपग्रह अवकाशात पाठवण्यात आले. भूस्थिर उपग्रह मालिकेत भारताने देखणे यश मिळवले आहे.

इन्सॅट थ्रीडीचे यश
26 जुलै 2013 रोजी फ्रेंच गियाना येथील कौरोऊ अवकाश तळावरून एरियन-5 या युरोपीय यानातून भारताने आपला अत्याधुनिक इन्सॅट-थ्रीडी हा हवामान उपग्रह अवकाशात सोडला. या उपग्रहामुळे भारतातील हवामानाचा अधिक अचूक अंदाज वर्तवणे आता शक्य होणार आहे. तसेच या उपग्रहामुळे नैसर्गिक आपत्तीविषयी अचूक माहिती मिळू शकणार आहे. इन्सॅट थ्रीडीमध्ये अत्याधुनिक छायाचित्रण व्यवस्था आहे, वातावरणीय ध्वनियंत्रणेच्या साहाय्याने तापमान, आद्र्रता, वातावरणातील पहिल्या थरापासून ते शेवटच्या थरापर्यंतचे ओझोनचे एकत्रित प्रमाण यांची अधिक सविस्तर माहिती प्राप्त होणार आहे. इस्रोच्या कर्नाटकातील हसन येथे असलेल्या मुख्य नियंत्रण केंद्राने इन्सॅट-थ्रीडी उपग्रहाचे नियंत्रण हाती घेतले आहे. या उपग्रहाची आणखी काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. त्याचे वजन 2060 किलोग्रॅम असून पुढील सात वर्षे हा उपग्रह कार्यरत राहणार आहे. या उपग्रहावर अत्याधुनिक कॅमेरा व ध्वनित्र असून प्रतिसंप्रेक्षक (डेटा रिले ट्रान्सपाँडर) असल्याने शोध व मदतकार्य यंत्रणा सक्षम होईल तसेच पृथ्वीवरील छायाचित्रे अधिक स्पष्टपणे मिळणार आहेत. अवकाशातील हा ‘दिव्य चक्षू’ असणार आहे.

भावी योजना
इस्रो या संस्थेची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी झाली. आपल्या 44 वर्षांच्या काळात या संस्थेने मोठी प्रगती केली आहे. सध्या या संस्थेचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन हे आहेत. इस्रोतर्फे पुढील काळात खगोल संशोधनासाठी ‘अँस्ट्रॉसॅट’, संपर्क दळणवळणासाठी जीसॅट-6, जीसॅट-7, जीसॅट-9, जीसॅट-11, जीसॅट-14 हे उपग्रह अवकाशात पाठवण्यात येणार आहेत. तसेच चांद्रयान -2, मंगळयान, शुक्र संशोधन यान, सूर्य संशोधन यान प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. भारत इतर देशांना अंतराळ संशोधनात सहकार्य देत आहे. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन, कॅनडा, इजिप्त, फ्रान्स, र्जमनी, हंगेरी, इस्रायल, इटली, जपान, कझाकिस्तान, नेदरलँड, नॉर्वे, रशिया, स्वीडन, युक्रेन, ब्रिटन आणि अमेरिका या देशांचा प्रामुख्याने समावेश आहे. एकाच यानाने एकाच वेळी दहा उपग्रह अवकाशात पाठवून भारताने विक्रम प्रस्थापित केला आहे. सध्या इतर देशांचे उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ही अवकाशात पाठवून परकीय चलन मिळवत आहे. सध्या इस्रोने हाती घेतलेल्या उपक्रमांवर या संस्थेच्या माजी अध्यक्षांनी टीका केली होती. हे एक मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. सामान्य लोकांचा त्यामुळे बुद्धिभेद होण्याची शक्यता असते. यापुढे तरी असे होता कामा नये, अशी इच्छा आहे. अंतराळ संशोधन क्षेत्रात प्रगती करीत असताना त्या संशोधनाचा उपयोग विज्ञानाच्या इतर शाखांनाही होत असतो. या स्पर्धेत भारतीय शास्त्रज्ञ संशोधन क्षेत्रात मागे राहून कसे चालेल? त्या दृष्टीने भारताने स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. dakrusoman@yahoo.co.in