आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी मुलाखत: संन्याशाच्या रुपात करू इच्छिणारे काम मुख्यमंत्री म्हणून करताेय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारला मंगळवारी ६ महिने पूर्ण झाले. या काळात पोलिसांनी ६०० पेक्षा जास्त एन्काउंटर केली आहेत. अवैध कत्तलखान्यांवर कारवाई, अँटी रोमिअो पथक आणि गोरखपुरात बालकांचा मृत्यूसारखे अनेक वादही निर्माण झाले. याेगींच्या मठातून सीएम हाऊसमध्ये पोहोचण्याच्या सहा महिन्यांत काय बदलले, यावर दैनिक दिव्य मराठी नेटवर्कने त्यांच्याशी संवाद साधला. वाचा त्यातील मुख्य बाबी ...
 
अजय सिंह ते योगी अशा प्रवासानंतर सीएमच्या रूपात तुम्ही स्वत:ला कसे पाहता?
- मी याेगी, खासदार आणि सीएमच्या रूपात तेच करत आहे जे एका संन्याशाच्या रूपात करू इच्छितो. लोककल्याण हेच उद्दिष्ट आहे.
 
तुम्ही मुख्यमंत्री बनल्यावर लोकांनी विचार केला की यूपीला शिकाऊ सीएम मिळाला आहे...
- लोकशाहीची व्यवस्था नेतृत्वातून चालत असते. मी १८ तास काम करताेय हे पाहिल्यावर माझी टीमलाही तितकेच काम करावे लागेल. मग काय कुणी अधिकारी वा मंत्री बैठकीतून उठून जाण्याची हिंमत करेल! त्यांना ठाऊक आहे की, निर्देश लागू करण्याचेच नव्हे तर त्यांच्यावर कामगिरी करून दाखवण्याचेही आहेत. मी दर आठवड्याला फीडबॅक घेत असतो. ५ वर्षांत यूपी देशाचे विकसनशील राज्य असेल. 
 
अशी चर्चा आहे की उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांची अतिकिरकोळ कर्जे माफ झाली आहेत. यात काही गफलत झाली आहे का?
- ही चूक नव्हे तर वास्तव आहे की ज्याचे एका रुपयाचे आणि ज्याचे एक लाख रुपयाचे कर्ज माफ झाले आहे, तोही शेतकरीच आहे. उत्तर प्रदेशातील शेतकरी इतके स्वावलंबी आहेत की त्यांनी कर्जेही स्वत:च फेडली. असे करणारे काही हजार शेतकरी असून आम्ही लवकरच त्यांचा सन्मान करणार आहोत.
 
नाेकरशाहीवर चर्चा हाेते. अधिकारी चांगले काम करत अाहेत का?
- १५ वर्षे राजकीय नेत्यांनी  अधिकाऱ्यांची निर्णय क्षमताच संपवली.  वैयक्तिक फायद्यासाठी ती नष्ट करण्यात अाली. चांगले काम करणाऱ्यांना अपमानित करण्यात अाले. दंडही ठाेठावण्यात अाले.

यूपीत पुरेसी वीज मिळत नाही. सणांत पाॅवर हाऊस बंद हाेत अाहेत...
- काही दिवसांपूर्वीपर्यंत ४ ते ६ तासच वीज मिळत हाेती. अाम्ही शहरांना २४ तास, तालुक्यांना २०, तर ग्रामीण भागात १८ तास वीज देत अाहाेत. शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी वीज मिळत अाहे. फीडरची क्षमता १७ हजार मेगावॅटची, तर मागणी २० हजार मेगावॅटची अाहे. संपूर्ण सिस्टिम एकत्र चालवून उद‌्ध्वस्त करायची नाहीय. ३५ % वीजगळती अाहे. ती कमी केली जाईल. 

राम अयाेध्येत परत अाल्याच्या दिवशी  दिवाळी साजरी हाेते. या सणामुळे अयाेध्येची विशेष अाेळख अजून बनलेली नाही?
- तसे तर व्हायला हवे. त्याचा विचारही सुरू अाहे. याच वर्षी प्रयत्न केला जाईल.

यूपीत सांस्कृतिक-धार्मिक स्थाने खूप अाहेत. पर्यटकांना तिथे अाकर्षित करण्यासाठी काही याेजना अाहेत का? 
- पर्यटनस्थळांचा विकास सुरू अाहे. अयाेध्या, मथुरा, काशी, नैमिशारण्य येथील विंध्याचल, कुशीनगर, सारनाथ या स्थळांचा त्यात समावेश अाहे.  ऐतिहासिक स्थळे व इकाे टुरिझमचाही विकास केला जाईल.
 
शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारायची असल्यास काय राेड मॅप अाहे?
- उत्तर प्रदेशातील जमीन सुपीक अाहे. शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाची मदत देऊ, त्यामुळे उत्पन्न ३ ते ४ पट वाढेल. ज्या शेतात १५० क्विंटल गहू येताे तिथे ५०० ते ७०० क्विंटल येईल. २० नव्या कृषी विज्ञान केंद्रांसाठी सरकार जमीन देत अाहे. अमूलच्या मदतीने डेअरी समित्यांना सक्रिय केले जाईल. शिवराजसिंह सरकारच्या प्रयत्नातून मध्य प्रदेशात कृषी क्षेत्रात देशासाठी राेल माॅडेल तयार झाले अाहे. 
 
तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांत यूपीत काय बदल झाले?
- यूपीकडे बघण्याचा दृष्टिकाेन बदललाय. कायद्याची पद्धतीही बदलली. एकही दंगल झाली नाही. बदल्यांमध्ये पारदर्शकता अाली. एका टेबलवर तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस फाइल अडकत नाही. पाेलिसांची पायी गस्त सुरू झालीय. १.१८ लाख किमीपैकी ८० हजार किमी रस्ते खड्डेमुक्त झाले अाहेत.
 
काेणत्या निर्णयाबाबत खंत वाटते?
- नाही. विचार करूनच निर्णय घेताे व अंमलबजावणीही चिकाटीने हाेते. ५ वर्षांत विविध विभागात तयारीसह पक्षाचा लाेककल्याणाचा जाहीरनामाही लागू करण्यात येईल. 
 
 
राज्यात नव्या अाैद्याेगिक धाेरणावर कसा फाेकस असेल?
- राज्याच्या अाैद्याेगिक धाेरणामुळे माेठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत अाहे. उद्याेगांसाठी पायाभूत सुविधा हव्यात. बुंदेलखंड व पूर्वांचल एक्स्प्रेस वेला अामचे प्राधान्य अाहे. १८ मंडळ मुख्यालयांना विमानसेवा दिली अाहे. गुंतवणूकदार प्रतिसाद देत अाहेत. चांगल्या वातावरणामुळे चांगले परिणाम दिसून येतील.
 
राहुल गांधी व अखिलेश यादव यांचे पक्ष घराणेशाहीचा पुरस्कार करताे. राजकारणात घराणेशाही राहील का?
- २०१४ व २०१७ मध्ये जनतेने उत्तर दिले अाहे. लाेक बेरोजगार राहिले तर जाब विचारतीलच ना? त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नाहीय.
 
 
रोहिंग्या मुस्लिमांबाबत काय?
- केंद्र सरकार यावर निर्णय घेत अाहे. 
राष्ट्रीय सुरक्षेवरही गांभीर्याने विचार करायला हवा.  
 
गोरखपुरात मुलांच्या मृत्यूवर तुम्ही कठोर प्रशासक आहात, असा संदेश गेला नाही...
- ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नाही. फक्त अफवा पसरवण्यात आल्या. यामुळे सरकारी रुग्णालयांत गरिबांना मिळणाऱ्या सेवेवरील विश्वास उडाला. गरीब खासगी रुग्णालयांत जाण्यास बाध्य होत आहेत. हे मोठे पाप आहे.
बातम्या आणखी आहेत...