आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : कल ललित कलेचा, प्रवेश विज्ञान शाखेचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दिव्य मराठी’ने संपर्क साधलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक म्हणजे २८ टक्क्यांचा कल आरोग्य व जैविक विज्ञान या शाखेचा होता. त्याखालोखाल ललित कला हा कल अधिक विद्यार्थ्यांचा दाखविण्यात आला. प्रत्यक्ष प्रवेश घेताना आरोग्य व जैविक विज्ञान यासह इंजिनिअरिंगमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या तांत्रिक कल असलेले विद्यार्थीही विज्ञान शाखेत अकरावीसाठी प्रवेश घेत असल्याने ते प्रमाण ६१ टक्के झाले आहे. परंतु तंत्रशिक्षण पदविकेसाठी फक्त ९%, ललित कलेसाठी फक्त २ % विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
 
नाशिक/सोलापूर/औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कलचाचणीत ‘ललित कला’ या क्षेत्रात सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल दिसून आला असला तरी सध्या अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू असताना फक्त २ टक्के विद्यार्थी ललित कला या क्षेत्रातील शिक्षण घेण्यास उत्सुक असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीतून पुढे आले आहे. गणवेशधारी आणि कृषी यासारखे कल आलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष शिक्षणाच्या नियोजनात त्याचा वापर कसा करावा याबाबत गोंधळ असल्याचे दिसले. ५१ टक्के विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी कलचाचणीचा उपयोग झाला नसल्याचे नमूद केले.
 
नाशिक, औरंगाबाद, जळगाव आणि सोलापूर या शहरांतील इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या आणि इयत्ता अकरावीत प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी संवाद साधला. शासनाने घेतलेल्या चाचणीत त्यांचा कोणता कल आला होता, त्याचा त्यांना प्रवेश घेताना कितपत उपयोग झाला, त्यांनी प्रत्यक्ष कोणत्या शाखेत प्रवेश घेतला आणि कलचाचणीबद्दल त्यांचे मत, अनुभव काय आहेत हे जाणून घेतले. यातील ४९ टक्के विद्यार्थ्यांनी कलचाचणीचा उपयोग झाल्याचे सांगितले. मात्र, त्यात ‘आधीच ठरले होते’ आणि ‘पालकांनी सांगितले म्हणून’ हा पर्याय निवडणारे बहुतांश विद्यार्थी होते. 
 
‘ललित कला’ आणि ‘गणवेशा’चा घोळ
ललित कला हा अधिकांश विद्यार्थ्यांचा कल आला असला तरी ती आपली आवड आहे, पण त्यात करीअर करण्याचे नियोजन नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. चित्र काढायला आवडतात का, नृत्य करायला आवडते का, भांडी रंगवायला आवडतात का या प्रश्नांची उत्तरे साऱ्यांनीच सकारात्मक दिली होती. परंतु, पुढील शिक्षणासाठी ललित कला या क्षेत्राची निवड फक्त २ टक्के विद्यार्थ्यांनी केली आहे. गणवेशधारी सेवा या कलाबद्दलही अनेकांच्या मनात घोळ आहे. १३ टक्के विद्यार्थ्यांचा कल ‘गणवेशधारी सेवा’ आला असला तरी त्याच उद्देशाने प्रवेश घेणारा एकही विद्यार्थी आढळला नाही. मेडिकल किंवा अभियांत्रिकीला जाऊन पुढे स्पर्धा परीक्षा देऊन गणवेशधारी सेवा करीअर करू शकतो, अशी शक्यता काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. परंतु, त्यासाठी अकरावीपासूनच नियोजन नसल्याचे दिसते.
 
कृषी होते, पण क्रीडा नाही
शहरी भागात राहाणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. ज्याचा शेतीशी काहीही संबंध नाही अशा विद्यार्थ्यांचा कल ‘कृषी’ हा आल्याचे त्यांना सांगितले. ‘झाडांची आवड असणे’ म्हणजे कृषी क्षेत्रात करीअर करण्याचा कल नाही, अशा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या. दुसरीकडे क्रीडा, कायदा, मानसशास्त्र, पत्रकारिता, व्यवसाय यांसारख्या वेगळ्या क्षेत्रात आवड असणाऱ्या, त्यात करीअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या चाचणीद्वारे त्यांच्या ‘कला’ची चाचपणी करता आली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. 
 
काय करावे ? याचे उत्तर मिळावे...
 
पूनम कुलकर्णी, करिअर कौन्सिलर
कलचाचणीबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्यात जागरुकता निर्माण झाली हे चांगले आहे. परंतु शासनातर्फे करण्यात येणारी कलचाचणी करिअरविषयी निर्णयास परिपूर्ण नाही. करिअर कौन्सिलिंग तीन टप्प्यांवर होते. त्यात प्रश्नावली भरण्यापूर्वीची त्या विद्यार्थ्यासोबतची चर्चा, भरत असतानाची निरीक्षणे व चाचणीच्या आधारावर समुपदेशन हे तिन्ही टप्पे पूर्ण झाल्यावरच विद्यार्थ्यांचा कल कळतो. त्या दृष्टीने शासकीय चाचणीचा अहवाल समाधानकारक येत नाही. ‘काय करायला आवडते’ या प्रश्नाचे उत्तर ही कलचाचणी देते, ‘काय करावे’ याचे नाही. 
 
नीलिमा आपटे, विभाग प्रमुख, अधिक्षमता मापन चाचणी, ज्ञान प्रबोधिनी
विद्यार्थ्यांची अधिक्षमता मापन चाचणी म्हणजे अॅिप्टट्यूट टेस्ट ही समग्र मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. यामध्ये चाचणीचा अहवाल आणि पालक-विद्यार्थी यांचे एकत्रित सामुपदेशन गरजेचे असते. विद्यार्थ्याचा अहवाल, त्याची आवड, कलागुण, कौटुंबिक पार्श्वभूमी, पालकांचा व्यवसाय, अपेक्षा या साऱ्यांचा त्यात साकल्याने विचार करून पुढील कल सुचविला जातो. परंतु शासनाच्या चाचणीत छंद कळतात, त्याला व्यावसायिक कल म्हणता येणार नाही.
 
वैशाली बालाजीवाले, करिअर कौन्सिलर
शासनाच्या या चाचणीत फारच कमी क्षेत्रांची माहिती विद्यार्थ्यांना कळते. या प्रक्रियेत समुपदेशन ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. चाचणीत आलेल्या स्कोअरबाबत विद्यार्थ्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या क्षमता आणि करिअरसाठीच्या उपलब्ध संधी यांची योग्य सांगड घालता येते. हा उपक्रम चांगला असला तरी त्याचा उपयोग होणे गरजेचे आहे.
 
कलचाचणीचा उपयोग झाला, कारण 
विचार करता आला.
स्वत:बद्दल माहिती झाली.
आवडी कळाल्या.
निर्णय पक्का झाला.
द्विधा टळली.
 
चाचणीचा उपयोग झाला नाही, कारण  
प्रश्न साधे होते.
गांभीर्याने घेतले नाही.
प्रश्नावली कळली नाही.
वेळ पुरला नाही.
निकालाचे काय करायचे हे कळले नाही. 
 
कलचाचणीचा उपयोग 
यातील २७% विद्यार्थ्यांनी त्यांचा निर्णय आधीच झालेला असल्याने कलचाचणीने त्यास पुष्टी मिळाली, असे नमूद केले. १९% विद्यार्थ्यांनी कलचाचणीपेक्षा त्यांच्या पालकांची इच्छा प्रवेशाचे कारण असल्याचे सांगितले.
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
- ठोकळेबाजपणा कायम, पारंपरिक चौकट मोडवेना
​- आवड ते व्यावसायिक नियोजनात सांगड नाही
- कृषी होते, पण क्रीडा नाही