आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यमान आणि भावी सरन्यायाधीशांची अशी आहेत वैशिष्ट्ये, निकालात 192 शब्दांचे एकच वाक्य लिहिले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यायमूर्ती दीपक मिश्रा - Divya Marathi
न्यायमूर्ती दीपक मिश्रा
सर्वोच्च न्यायासनावर आरूढ होणारे सरन्यायाधीश आणि निवृत्त होणारे सरन्यायाधीश यांच्याबद्दल ‘दिव्य मराठी’ सतत वृत्तांत देत आहे. सलग सहाव्यांदा आम्ही ते देत आहोत.

न्यायमूर्ती दीपक मिश्रा- निकालात १९२ शब्दांचे एकच वाक्य लिहिले  
१९ मार्च २०१५ ला न्यायमूर्ती दीपक मिश्रांनी प्रियंका श्रीवास्तव विरुद्ध उत्तर प्रदेश सरकारच्या एका प्रकरणात निकाल दिला. या निकालातील ओळी विशेष होत्या, त्यात शेक्सपिअर आणि प्राचीन ग्रंथातील उदाहरणे होती. त्यातील एक वाक्य तर १९२ शब्दांचे होते. हा भारतीय न्यायिक इतिहासातील विक्रम मानला जातो. न्यायमूर्ती मिश्रा हे विद्यमान सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या सेवानिवृत्तीनंतर २८ ऑगस्टला ४५ वे सरन्यायाधीश होतील. त्यांचा कार्यकाळ २ ऑक्टोबर २०१८ पर्यंत असेल. खटले जलद निकाली कसे काढावेत, हे मिश्रांना चांगलेच माहीत आहे. २० ऑक्टोबर २०१६ ला त्यांनी एक महिला आणि तिचा पती यांच्यातील तीन वर्षांपासूनचा मुलीचा ताबा, वैवाहिक वादाच्या प्रकरणाचा निपटारा फक्त १५ मिनिटांच्या सुनावणीनंतर केला होता. न्यायमूर्ती मिश्रांनी आर्टिकल १४२ नुसार आपल्या सर्वोच्च अधिकारांचा पहिल्यांदा वापर करत दोन्ही बाजूंशी चर्चा केली, लग्न रद्द केले आणि  मुलीचा ताबा आईकडे सोपवला. एवढेच नाही, कनिष्ठ न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयात दाखल विविध खटलेही रद्द केले. त्यांचा हा निकाल खूप गाजला. खटला त्वरित निकाली काढण्यासाठी तो निकाल मार्गदर्शक ठरला.  

याकूब मेमनच्या फाशीला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका २९ जुलै २०१५ रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ३० जुलै २०१५ रोजी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री अडीच वाजता न्यायालय उघडले. याचिकेवर सुनावणी केली आणि याकूब मेमनची फाशीची शिक्षा कायम ठेवत याचिका खारीज केली.  
 
त्याचप्रमाणे न्यायमूर्ती मिश्रांनी ७ सप्टेंबर २०१६ च्या एका निर्णयात, एफआयआर २४ तासांच्या आत वेबसाइटवर अपलोड करा, असा आदेश दिल्ली पोलिसांना दिला होता. त्या वेळी मिश्रांसोबत न्यायमूर्ती सी. नागप्पनही होते. गेल्या वर्षीच त्यांनी देशात स्त्री-पुरुष प्रमाणावरही चिंता व्यक्त केली होती. देशातील स्थिती एवढी भयावह आहे की, मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत, असे त्यांनी म्हटले होते. ही टिप्पणी करून त्यांनी सर्व सोशल नेटवर्किंग साइट्सना ३६ तासांच्या आत लिंग चाचणीबद्दलची माहिती हटवण्याचा आदेश दिला होता. ५ मे २०१७ रोजी बहुचर्चित निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरणातील चारही दोषींची फाशीची शिक्षा न्यायमूर्ती मिश्रांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने कायम ठेवला होता. चित्रपटगृहांत चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्रगीत गायन व्हावे आणि त्या वेळी चित्रपटगृहातील सर्व लोकांनी उभे राहावे, असे न्यायमूर्ती मिश्रांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानेच म्हटले होते. ओडिशा उच्च न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील अशोक परिजा यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, मी न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांची कारकीर्द सुरुवातीपासून जवळून अनुभवली आहे. त्यांच्यासोबत प्रॅक्टिसचीही संधी मिळाली आहे. न्यायमूर्ती मिश्रांचा दिवाणी, फौजदारी, घटनात्मक आणि सेवांशी संबंधित प्रकरणांचा गाढा अभ्यास होता. अत्यंत कमी वयातच त्यांची गणना ओडिशाच्या टॉप ५ वकिलांमध्ये झाली होती. न्यायाधीश होण्याच्या वेळी ओडिशात त्यांची प्रॅक्टिस शिखरावर होती.  
 
अॅड. परिजांनी सांगितले की, न्यायमूर्ती दीपक मिश्रा आपल्या आरोग्याबाबत खूप सतर्क आहेत. ते दररोज मॉर्निंग वॉकला जातात. ते खाण्याचेही शौकीन आहेत. पण आरोग्याला नुकसानकारक ठरणार नाहीत, असेच पदार्थ ते खातात. सध्या ते अयोध्या राम मंदिर वाद, सहारा-सेबी वाद आणि बीसीसीआयच्या प्रकरणांत सुनावणी करत आहेत. न्यायमूर्ती मिश्रांचा जन्म ३ आॅक्टोबर १९५३ ला ओडिशात झाला होता.
 
१४ फेब्रुवारी १९७७ ला त्यांनी ओडिशा उच्च न्यायालयात वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली होती. १९९६ मध्ये ओडिशा उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती झाले. नंतर त्यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयात बदली झाली. २००९ च्या डिसेंबरमध्ये त्यांना पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती करण्यात आले. नंतर २४ मे २०१० रोजी दिल्ली उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तिपदी बदली झाली. १० ऑक्टोबर २०११ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तिपदी नियुक्ती झाली.  
 
पुढील स्‍लाइडवर...सरन्यायाधीश जे. एस. खेहर  
बातम्या आणखी आहेत...