आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उशिरा सुचलेले शहाणपण ( भाष्य - प्रशांत दीक्षित)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तीन आठवड्यांनी शिवसेनेला स्वत:चा आवाज मिळाला याबद्दल उद्धव ठाकरेंचे अभिनंदन केले पाहिजे. गेले २१ दिवस शिवसेनेची फरपट सुरू होती. भाजप नेते शिवसेनेला व्यवस्थित खेळवीत होते व विरोधात वातावरणनििर्मतीही करत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पाठीशी असल्याने फडणवीस सरकारला आणखी कोणाची गरज नाही या समजुतीत भाजपची पावले पडत होती व त्याबद्दल भाजपला शाबासकीही मिळत होती. मात्र आता काही महत्वाच्या बाबींवर खुलासा करण्याची वेळ भाजपवर उद्धव यांनी आणली आहे. हे पहिल्या दिवशीही करता आले असते, पण सत्तेचा मोह व पक्ष फुटण्याची धास्ती या कैचीत सापडलेल्या उद्धव यांना निर्णय घेता येत नव्हता. रविवारी त्यांनी निर्णय स्पष्ट केला. त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे नरेंद्र मोदी यांना प्रथमच वैचारिक मुद्द्यावर आव्हान देण्याचे धाडस उद्धव यांनी केले. हिंदुत्वाच्या विरोधात प्रचार करणाऱ्यांसोबत जाणार काय असा खडा सवाल करून मोदींच्या बावनकशी समजल्या जाणाऱ्या हिंदुत्वाबाबत संशय उपस्थित करण्याचे चातुर्य उद्धव यांनी दाखविले. ही मात्रा भाजपचा रक्तदाब वाढविणारी ठरेल. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून दिलेले आव्हान इतके परिणामकारक ठरले नसते. मोदी व अमित शहा यांच्या वैचारिक निष्ठेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून ठाकरे यांनी भाजपची सध्या तरी कोंडी केली आहे. हिंदुत्वावर वेळ पडल्यास फडणवीस सरकारच्या विरोधात मतदान करू, असेही ठाकरेंनी स्पष्ट केले. मराठी अस्मिता, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव अशा प्रादेशिक भावनांना फाटा देऊन भाजपसोबतच्या पुढील वाटाघाटी हिंदुत्वाभोवती फिरविण्याची शिवसेनेची खेळी भाजपला कदाचित अनपेक्षित असेल. अर्थात कोणतीही तडजोड करून सत्ता राखायचीच, असे तद्दन व्यापारी धोरण मोदी-शहा यांनी अवलंबले तर फडणवीस यांचे सरकार तरून जाईलही. तथापि, मोदींचे हिंदुत्व पातळ झाल्याची चर्चा सुरू होईल. हिंदुत्वाचा मुद्दा मराठी मानसिकतेलाही मानवणारा आहे. हिंदुत्वासाठी शिवसेनेने भाजपला आव्हान दिले तर मराठी माणसाला ते पटेल. मंत्र्यांची संख्या, खात्यांचे वाटप अशा व्यावहारिक देवाणघेवाणीवरून उद्धव यांनी भाजपशी तंटा केला असता तर तो शिवसैनिकांसह मराठी मतदारांनाही पटला नसता. अशी देवाणघेवाणीची भाषा निदान आत्ता तरी उद्धव यांनी केलेली नाही, तर राष्ट्रवादीशी नाते स्पष्ट करा अशी स्पष्ट मागणी केली आहे. राष्ट्रवादीच्या आधारावर फडणवीसांचे सरकार उभे राहू शकते, पण त्याला वैचारिक निष्ठेचे पाठबळ असणार नाही हे जनतेच्या मनावर बिंबवण्यात ठाकरे यशस्वी झाले. मात्र िनकालानंतर लगेचच हे केले असते तर शिवसेनेची शान वाढली असती. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. भाजपकडून याचा प्रतिवाद होईलही. मात्र परस्परांच्या निष्ठेबद्दल संशय निर्माण झाला तर संसार टिकणे कठीण असते. महाराष्ट्रातील राजकीय संसाराला अस्थिरतेचे ग्रहण लागल्यात जमा आहे.