आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमातून मिळणाऱ्या आनंदातच जीवनसौंदर्य! संमेलनाध्यक्ष डॉ.आ.ह.साळुंखे यांचे भाषण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सन्मान्य बंधु-भगिनींनो, 
श्रम म्हटल्यानंतर प्राधान्यानं, प्रामुख्यानं शारीरिक श्रम डोळ्यांपुढं येतात, हे खरं आहे. परंतु बौद्धिक आणि मानसिक श्रमांचं महत्त्व आपण सर्वार्थानं आणि पूर्णांशानं नाकारू शकत नाही. अर्थातच प्रत्येकाचं आकलन वेगळं, क्षमता वेगळ्या, कौशल्यं वेगळी, परंतु वेगळेपण म्हणजे श्रेष्ठ-कनिष्ठता नव्हे, याचं भान ठेवलं गेलं नाही आणि याचा दुष्परिणाम म्हणून समाजाची वाढ अतिशय एकांगी आणि पक्षपाती पद्धतीनं झाली. आज गरज आहे ती हे सगळं बदलण्याची, त्यासाठी आपले दृष्टिकोन स्वच्छ आणि निकोप करण्याची. ज्याच्या वाट्याला जी कर्तव्यं आली असतील ती त्यानं पार पाडावीत. पण त्यामुळं कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ न ठरता माणूस म्हणून सगळे जण एकाच पातळीवर असावेत. असा समाज आदर्श आणि कल्याणकारी असू शकतो. थोडक्यात सांगायचं तर एका बाजूला नांगराची मूठ, हातोडा, छिन्नी, झाडू या गोष्टी आणि दुसऱ्या बाजूला लेखणी, पुस्तक, संगणक या गोष्टी असा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कमी-जास्त मिलाफ होणं आवश्यक आहे. यातूनच सुंदर, समृद्ध, परिपक्व आणि परिपूर्ण जीवनाचं ध्येय साकार होऊ शकतं. 

आपल्या समाजाला श्रमणसंस्कृतीचा अत्यंत प्रदीर्घ आणि प्रभावी असा वारसा आहे. ही संस्कृती भारतीय समाजामध्ये वेदपूर्व काळापासूनच रुजलेली होती. अर्थातच ती अवैदिक आहे. ‘श्रम करणारा’ हा ‘श्रमण’ या शब्दाचा मूळचा अर्थ आहे. विशिष्ट प्रकारचं त्यागमय आचरण करणारी व्यक्ती हा त्या शब्दाला नंतर प्राप्त झालेला अर्थ होय. बुद्धांनी सिगाल नावाच्या एका तरुणाला उपदेश केल्याचा एक विख्यात प्रसंग तिपिटकात आहे. हा सिगाल सकाळी उठल्यावर ओल्या वस्त्रांनिशी चार मुख्य दिशांना, तसेच वरच्या आणि खालच्या दिशांना हात जोडून नमस्कार करीत असे. एके दिवशी तथागतांनी त्याला तसं करताना पाहिलं आणि ‘तू सकाळी उठून असं का करीत आहेस?’ असं त्याला विचारलं. त्यावर, आपल्या वडिलांनी मरणसमयी दिशांना नमस्कार करायला सांगितलं होतं, त्यांच्या वचनाचं पालन करण्यासाठी आपण असा नमस्कार करीत आहोत, असं त्यानं सांगितलं. त्या वेळी, तथागतांनी त्याला त्याच्या वडिलांच्या बोलण्याचा खरा अर्थ समजावून सांगितला. दिशांना नमस्कार करायचा म्हणजे गृहस्थजीवन जगत असताना विशिष्ट प्रकारचे नियम पाळायचे, हे त्यांनी त्याला समजावून सांगितलं. ज्या सहा दिशांची पूजा करायची त्या दिशांपैकी पृथ्वीकडच्या दिशेच्या स्वरूपाविषयी बुद्धांनी त्याला जो उपदेश केला, तो मालक-नोकर संबंधांविषयी एक महान आदर्श घालून देणारा आहे. विशेषत: बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी हा आदर्श आपल्या समाजाला दिला आहे.  

बुद्धांनी मालक-सेवक संबंधांविषयी सिगालाला सांगितलेली पाच तत्त्वं पुढील प्रकारची आहेत...
१) मालकानं सेवकाला त्याच्या शक्तीला अनुसरूनच काम द्यावं. २) मालकानं सेवकाला भोजन आणि वेतन देण्याची योग्य ती व्यवस्था केली पाहिजे. 
३) सेवक आजारी पडला असता मालकानं त्याची शुश्रूषा करावी. ४) सेवकाला वेतनाखेरीज काही द्यायचंच असेल, तर ते उत्तम दर्जाचं असावं. ५) दररोजच्या कामानंतर काही काळ विश्रांती मिळणं, हा जसा सेवकाचा हक्क असतो, तसाच काही दिवस काम केल्यानंतर योग्य ती सुटी मिळणं, हाही त्याचा हक्कच असतो. 

ज्या समाजात मालक-नोकर संबंध स्रेहाचे, एकमेकांवरील विश्वासाचे, एकमेकांचा आदर करण्याचे आणि एकमेकांची काळजी घेण्याचे असतात, त्या समाजामध्ये संबंधित व्यक्तीला पुरेपूर मन:शांती मिळते. त्या समाजातील प्रगतीच्या वाटा खुल्या होतात. मानवी जीवन अधिक उन्नत पातळीवर जातं. मालकानं सेवकांची योग्य काळजी घेणं, म्हणजे भूमीकडच्या दिशेची पूजा करणं, हे बुद्धांनी सिगालाला पटवून दिलं. शारीरिक श्रम आणि बौद्धिक-मानसिक कृती या दोहोंचा अतिशय मनोहर मिलाफ असलेली संयुक्त जीवनशैली, हे संतांच्या चरित्राचं आणि कार्याचं एक आगळं वैशिष्ट्यं होय. संत नामदेवांनी पंजाबपर्यंतचा प्रवास करून लोकांचं प्रबोधन केलं. परंतु आपल्या उपजीविकेसाठी आवश्यक व्यवसाय चालू ठेवला. संत जनाबार्इंनी दळण-कांडण वगैरेंसारखी कष्टाची कामं सोडून दिली नाहीत. संत सावता, संत गोराेबा, संत नरहरी यांनी आपल्या व्यवसायातच ईश्वर शोधला आणि लोकांनाही तोच मार्ग दाखवला. संत कबीर असोत की संत रविदास (रैदास)  त्यांनी आपापली शारीरिक श्रमाची कामं करत करतच आपलं जीवनाचं तत्त्वज्ञान मांडलं. संत तुकारामांनी शेती आणि व्यापाराविषयीची आपली कर्तव्यं पार पाडत अभंगलेखनही केलं हे इथे उल्लेखनीय ठरावे. 

आपला समाज अत्यंत संमिश्र आणि गुंतागुंतीचा आहे. विविध लोकांचे हितसंबंध परस्परविरोधी आहेत, पण इथंच खरी कसोटी आहे. अापण स्वीकारलेल्या लाेकशाही जीवनपद्धतीमध्ये कितीही दोष असले तरी तिला पर्याय देणारी यापेक्षा अधिक निर्दोष पद्धती आपल्याजवळ उपलब्ध नाही; आणि म्हणून कितीही त्रास झाला, संयमाचा कितीही अंत पाहिला गेला, तरी संवाद अाणि अहिंसेचा मार्ग हाच अखेरीस सर्वांच्या हिताचा मार्ग आहे, हे कदापि नाकारता येत नाही.  ज्याला जीवनाचा अर्थ कळलेला आहे, तो कामातून मिळणाऱ्या आनंदासाठी तहानलेला असतो, भुकेलेला असतो. आपली सर्जनशीलता वाया जाता कामा नये, आपलं जगणं निरर्थक बनता कामा नये, अशी उत्कट इच्छा त्याच्या मनात असते. हेच मानवी जीवनाचं खरं सौंदर्य आहे. ज्यांना त्या सौंदर्याची ओढ लागत नाही, त्यांचं जीवन निश्चितच अधुरं राहतं.  
बातम्या आणखी आहेत...