आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Speech Of Dr.Chhaya Mahajan In Marathwada Woman Writers Festivel

साहित्यात लिंगभेद नसावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहावे मराठवाडा लेखिका संमेलन जालना येथील किंग्ज कॉलेज येथे आज, १७ जानेवारी रोजी होत आहे. त्यानिमित्ताने संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. छाया महाजन यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश...
सध्या महाराष्ट्रात वेगवेगळी साहित्य संमेलने होत आहेत. ही साहित्य संमेलने समुदायप्रधान किंवा धर्मप्रधान वा समविचारी समुदायाची आहेत. तर लेखिकांचे साहित्य संमेलन असण्यास काहीच हरकत नाही. कारण स्त्रियांचा समुदाय एकूणच लोकसंख्येच्या ५० टक्के व ३३ टक्के आरक्षित आहे. तेव्हा ही छोटी चूल नसून अग्निशिखा आहे. मराठवाड्यात पेटलेली अग्निशिखा महाराष्ट्रातील लेखिकांना एकत्रित स्वरूपात व्यासपीठ देऊन अग्निज्वालांचे रूप घेईल, अशी आशा ठेवायला हरकत नाही.

आज येथे आपण शब्दोत्सवासाठी जमलो आहोत. हा साहित्याचा उत्सव आहे. लेखनाची स्फूर्ती देणा-या देवतेचा खरा उत्सव आहे. साहित्याची भाषा अंत:प्रेरणेची आहे. ज्या भाषेबरोबर मी वाढले ती भाषा माझ्या भोवतालच्या पर्यावरणातून सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि इतर कितीतरी सांस्कृतिक गुंतागुंतीचे संदर्भ घेऊन तयार झालेली असते. तो एक भाववाही संस्कार आहे. भाषेचा विषय निघाला की, मराठीचा उपयोग इंग्रजी व हिंदी यांना बहिष्कृत करण्यासाठी होतो. फाजील भाषा, भांडणे व मातृभाषेची कळकळ दाखवणे सोडून देऊन या निरुत्पादक चर्चा त्वरित थांबवल्या पाहिजेत. उलट भाषेने समावेशक राहून इतर भाषांचे स्वभाषेचे रूळलेले शब्द विशिष्ट अर्थासह स्वीकारल्याने भाषा समृद्धच होईल, हे इंग्रजी दाखवते. मराठी साहित्य समृद्धीला अनेक विचारप्रवाह कारणीभूत आहेत. मराठवाड्यातील दलित चळवळीने मराठी साहित्याला मोठी देणगी दिली आहे. दलित साहित्याने अन्यायांविरुद्ध आक्रोशाने इतर भाषांनाही हलवून जागे केले.

अनुराधा पाटील, ललिता गादगे, वृषाली किन्हाळकर, रसिका देशमुख, संजीवनी तडेगावकर, ऊर्मिला चाकूरकर, प्रिया धारूरकर, गीता लाटकर, रंजन कंधारकर, वैशाली दंडे, तृप्ती अंधारे, संध्या रंगारी या कवयित्रींनी अखिल भारतीय व्यासपीठावरून कविता सादर करून प्रशंसा मिळवली. कथालेखनात अनुराधा वैद्य, रेखा बैजल, छाया महाजन, मथू सावंत, वृंदा दिवाण, शैला लोहिया, सुनंदा गोरे, कुंदबाला खांडेकर, कमल गेडाम, कमल नलावडे, प्रभा पार्डीकर, सुषमा मुंजे, मीनाक्षी वैद्य, कविता महाजन यांचा सहभाग आहे. मी मराठवाड्यातील लेखिकांचे सर्व साहित्य वाचल्याचा दावा करणार नाही. त्यामुळे यातून काहींचा उल्लेख येणार नाही, याचा खेद वाटतो. पण त्या लेखिकांनी लिखाण चालूच ठेवावे.

स्त्रियांच्या लेखनांबाबत अत्यंत तुच्छतेने बोलले जाते, हे ढळढळीत सत्य आहे. बायकी लेखन म्हणून समीक्षकही पाठ फिरवतात. लेखिकांच्या लेखनाचा विषय आला की, लिखाण कसदार आहे का? हा पहिला प्रश्न येतो. पण कसदार कोण ठरवणार? याची प्रमाणित परिमाणे आहेत का? त्यासाठी समीक्षकांनी वाचायला नको का? स्त्रियांच्या संयमित अनुभवांच्या कक्षा आणि विषयाची व्यापकता कवेत घेण्याची असमर्थता असाही आरोप होतो. पण लेखिकांना वेगळी वागणूक देऊ नये, असे नमूद करावेसे वाटते. तिचे लिखाण इतर साहित्यासारखेच मानावे. त्याला साहित्यिक गुणवत्तेची परिमाणे लावावीत. मग भलेही निष्कर्ष असेल तो असो. या साहित्याला लिंगभेदाची शेपटी लावण्याचे कारण नाही.