आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Second Death Anniversary News In Marathi

क्रीडाप्रेमी हरपला..!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील क्रिकेटच्या नाजूक वळणावर बाळासाहेबांनी दाखवलेला खंबीरपणा आणि घेतलेले धाडसी निर्णय क्रिकेटप्रेमी तर कधीच विसरू शकणार नाहीत. वानखेडे स्टेडियम उभारणीपासून ते अगदी क्रिकेटपटूंच्या गौरवनिधीपर्यंत बाळासाहेबांचे योगदान कौतुकास्पद असेच होते. बडेजाव मिरवणे त्यांच्या स्वभावातच नाही. त्यामुळे वेळोवेळी त्यांनी क्रिकेटसाठी व एकूणच खेळासाठी घेतलेले परिश्रम नेहमीच पडद्याआड राहिले.

खेळ, मग कोणताही असो, हिंदुस्थानी जीवनशैलीचा तो एक अविभाज्य भाग बनला आहे. त्यात क्रिकेट म्हणजे तर भारतीय क्रिकेटप्रेमींचा धर्मच! या खेळाचा आधार घेऊन आजवर अनेक जण मोठे झाले, तर काही जणांनी आपल्या कर्तृत्वाद्वारे या खेळाला मोठे केले. बरेचसे राजकारणी हे पहिल्या प्रकारात मोडणारे होते, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मात्र त्यास अपवाद होते. आपल्या कर्तृत्वाद्वारे मैदानाबाहेर राहूनही क्रिकेटला त्यांनी दिलेले योगदान पाहता ते सच्चे क्रीडाप्रेमी होते हे मी ठामपणे आज म्हणू शकतो.

आज खेळाचा आसरा स्वत:चे व्यक्तिमत्त्व फुलवण्यासाठी, प्रसिद्धीसाठी अन् हो, पैशासाठीही घेणारे बरेच आहेत, पण बाळासाहेबांना या कशाचाच कधी मोह झाला नाही. क्रीडांगणातील व्यासपीठापेक्षा जनसामान्यांसमवेत पॅव्हेलियनमध्ये बसणेच त्यांना अधिक भावले. क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडू त्यांचे मित्र बनले ते त्यांच्या याच साधेपणामुळे. बापू नाडकर्णी, माधव मंत्री यांच्यासमवेतची त्यांची दोस्ती तर त्या वेळी चर्चेचा विषय असायची. विशेष म्हणजे राजकारणात राहूनही बाळासाहेब ठाकरे याचे क्रिकेटचे ज्ञान वाखाणण्याजोगे होते. बाळासाहेबांसोबतच्या आमच्या मैफली रंगल्या त्या चौकार, षटकारांच्या आतषबाजीनेच! हजरजबाबीपणा हे त्यांचे अमोघ शस्त्र होते, असे म्हटले तर वावगे ठरू नये. मला आठवते, आमच्या बैठकीत एकदा युद्धाचा विषय निघाला होता. चर्चा रंगात आली होती अन् कोणीतरी म्हणालेही, शत्रूंनी या वेळी गुस्ताखी केली तर आपले मिसाइल त्यांना बेचिराख करून टाकतील. यावर बाळासाहेब मिश्कीलपणे म्हणाले होते, ‘अहो, मिसाइलचे काय घेऊन बसलात! प्रत्यक्ष युद्ध सुरू झालेच तर तुमची मिसाइल या बाथरूमपर्यंत तरी जाईल का? प्रबळ इच्छाशक्ती आपल्या राजकारण्यांमध्ये आहेच कुठे?’ बाळासाहेबांच्या या कोटीवर आमची हसता हसता पुरेवाट झाली होती.

पुढे बाळासाहेबांनी राजकारणात चांगलाच जम बसवला अन् मग आमच्या या कौटुंबिक मैफलींची संख्याही आटू लागली. आजही कधीतरी संध्याकाळी एकटा असलो तरी त्या मिश्कील बैठकींची आठवण होते. स्मृतीत दडून राहिलेला एखादा प्रसंग हळुवार डोळ्यांसमोर फेर धरू लागतो अन् मनाला पटतंही की, मराठी माणसाच्या मनात अंगार फुलवणारा, त्यांच्या हृदयावर राज्य करणारा हा माणूस प्रथमदर्शनी जरी कठोर वाटत असला तरी त्याच्या हृदयातील प्रेमळ झरा न आटणारा असाच आहे.

बरेच जण असे म्हणत की, बाळासाहेब हुकूमशहासारखे वागत. त्यात तथ्य नव्हते. वडिलकीच्या नात्याने जर कोणी दरडावत असेल तर त्याला आपण हुकूमशहा म्हणणार का? महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या आंदोलनाचा मी साक्षीदार आहे. स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये मी स्वत: उच्च पदावरून निवृत्त झालो आहे. मी ठामपणे सांगतो की, आज विविध संस्था अन् स्तरांवर मराठी माणसाचे जे अस्तित्व जाणवते आहे, टिकले आहे ते बाळासाहेबांमुळेच. मराठी माणसाला त्याच्यातील स्वाभिमानाची ओळख करून देण्याचे शिवधनुष्य बाळासाहेबांनी यशस्वीरीत्या पेलले. भूमिपुत्राचा मान राखला गेलाच पाहिजे यासाठी ते सदैव आग्रही राहिले. अशा वेळी जर मराठी माणूस ऐनवेळी कच खायला लागला तर त्याला दरडावण्याचा वडिलकीचा अधिकार बाळासाहेबांना होता.

बाळासाहेब गुणग्राही होते तसेच द्रष्टेही. अनेकांना त्यांनी जवळ केले. त्यांच्यातील गुण हेरले व त्यांना मोठे केले, पण स्वत: मात्र या सर्वांपासून विरक्त राहिले. संन्यस्तपणे त्यांनी फक्त कर्तव्य बजावले. त्यांनी मनात आणले असते तर कोणतेही मोठे पद ते सहजपणे उपभोगू शकले असते. मात्र, त्यांनी या सर्व पदांना अक्षरश: ठोकरले. किंबहुना आपल्या उद्देशपूर्तीच्या आड वैयक्तिक अभिलाषेला कधी त्यांनी थाराच दिला नाही.

खेळाचे संवर्धन खेळाडूंनीच केले पाहिजे : बाळासाहेब
मी स्वत: खेळाडू आहे. राजकारणातील गणिते मला केव्हाच उकलली नाहीत. खेळाडू म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचा मला भावलेला गुण जर तुम्ही विचाराल तर मी ठामपणे सांगू शकेन, या व्यक्तीने कधी खेळात राजकारण आणले नाही. खेळाचे संवर्धन खेळाडूंनीच केले पाहिजे याचा आग्रह त्यांनी नेहमीच धरला.
(‘अंगार’ या बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील गौरवग्रंथात प्रकाशित झालेल्या लेखाचा हा संपादित अंश.)