आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Second Death Anniversary News In Marathi

खेळाडूंना आपलेसे वाटणारे नेते \'बाळासाहेब ठाकरे\'..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळासाहेब ठाकरेंचे व्यंगचित्रकलेवरील प्रेम जितके वादातीत आहे तितकेच त्यांचे खेळाविषयी प्रेमही निखळ आणि निरपेक्ष होते. पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद बाळासाहेबांना भेटला. त्या ऐतिहासिक घटनेपासून वेंगसरकरांनी अनुभवलेले बाळासाहेब त्यांच्याच शब्दांत....!
बाळासाहेब ठाकरे यांना खेळाची आणि विशेषत: क्रिकेटची आवड होती. त्यांच्या या आवडीमुळे मुंबई, महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण भारताचे क्रिकेटपटूदेखील त्यांच्याकडे आदराने पाहायचे. कारण ते सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने बोलायचे. त्यांना क्रिकेट कळायचे. त्यामुळे ते आमच्या मर्मावरदेखील बोट ठेवायचे. एखादा खेळाडू खेळताना चुकला तर त्याची चूक ते स्पष्टपणे सांगायचे. क्रिकेट सामना सुरू असला की प्रत्येक चेंडू ते पाहायचे. वानखेडे स्टेडियमवर कसोटी किंवा अन्य महत्त्वाच्या सामन्यांना ते आवर्जून उपस्थित राहायचे. अनेक महत्त्वाच्या क्रिकेट सामन्यांत मी त्यांना समोर बसलेले पाहिले आहे.

माझ्या क्रिकेट कारकीर्दीत मी अनेक राजकीय नेते, पुढारी आणि राज्यकर्त्यांना भेटलो आहे; परंतु बाळासाहेबांइतका खेळाडूंशी मनमोकळ्या गप्पा मारणारा, त्यांच्याशी हितगुज करणारा राजकीय नेता पाहिला नाही. त्यांना मुंबईच्या खेळाडूंविषयी विशेष प्रेम होते. मुंबईच्या कोणत्याही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली की ते खुश व्हायचे. त्यांच्या कर्तृत्वाला दाद द्यायचे. मुंबईच्या सर्व खेळाडूंबद्दल त्यांचे नाव घेऊन ते नेहमी म्हणायचे, आपला रमाकांत, आपला बापू इ. मुंबईच्या खेळाडूला वगळले किंवा त्यांच्यावर अन्याय झाला की त्यांना खूप राग यायचा. आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या वेळी वानखेडे स्टेडियमवर ते दिसायचेच, परंतु शिवाजी पार्कवर त्यांनी खूप क्रिकेट पाहिले होते.

दादरहून चर्चगेटला जाणारी त्यांची ‘8-12’ ची लोकल फेमस होती. त्या लोकलने बाळासाहेब, माधव मंत्री, बापू नाडकर्णी, रमाकांत देसाई ही मंडळी जायची. मंत्री, बापू, रमाकांत हे एसीसी सिमेंट कंपनीत कामाला होते. ते चर्चगेट स्टेशनला उतरायचे. बाळासाहेब पुढे फ्री प्रेसमध्ये जायचे. त्यांची ट्रेनमधली दोस्ती प्रसिद्ध होती. बाळासाहेबांनी स्वत:साठी काहीही केले नाही. त्यांच्या आजूबाजूला वावरणारे, पक्षाशी संबंधितांपासून अन्य लाखो लोक कोट्यधीश झाले. बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी केलेले काम अन्य कुणालाही करणे जमले नाही, जमेल असेही वाटत नाही.
दिलेला शब्द न पाळणा-यांच्या युगात दिलेला शब्द पाळणारे बाळासाहेब हे दुर्मिळ राजकीय नेते होते. आम्हा खेळाडूंना आपलेसे वाटणारे ते नेते होते. आम्हाला त्यांच्यात, त्यांच्यातील आपुलकीत आपला माणूस दिसला. त्यांच्याबद्दल भारतातच नव्हे, तर परदेशातही कुतूहल होते. विशेषत: पाकिस्तानात अनेकांनी मला त्यांच्याबद्दल विचारणा केल्याचे मला आठवते. पाकिस्तानातील लोकांना त्यांच्याबद्दल खूपच जिज्ञासा होती.

बाळासाहेबांनी लहान ते मोठ्या प्रत्येक खेळाडूला त्याच्या कामगिरीसाठी मनात नेहमी मोठे स्थान दिले, तेही निरपेक्ष.
शब्दांकन-विनायक दळवी

वृद्धांसाठी काहीतरी करावे, असे त्यांना नेहमी वाटायचे...
बाळासाहेबांना प्रत्यक्ष भेटलेल्या माणसांना त्यांच्याविषयी वेगळेच वाटायचे. खूप आदर वाटेल, असे हे व्यक्तिमत्त्व होते. स्पष्टवक्ते आपुलकी असलेले, वचनपूर्ती करणारे, मैत्री जपणारे ते एक आगळेवेगळे राजकीय नेते होते. म्हणूनच ते इतरांपेक्षा वेगळे वाटतात.
कर्जत येथील वृद्धाश्रमाच्या उभारणीसाठी त्यांनी ठाण्यात क्रिकेट सामना आयोजित केला होता. वृद्धांसाठी काहीतरी करावे, असे त्यांना नेहमी वाटायचे.
मियाँदाद भेटला तेव्हा
जावेद मियाँदाद मला नेहमीच त्यांच्याबाबत विचारायचा. झी टेलिव्हिजनने मागे जावेद मियाँदादची बाळासाहेबांच्या घरी मातोश्रीवर भेट आयोजित केली होती. बाळासाहेबांनी जावेदच्या आग्रहावरून मला बोलावून घेतले होते. त्या वेळी बाळासाहेबांनी जावेदचे केलेले आदरातिथ्य पाहून मीच भारावून गेलो होतो. जावेदसाठी त्यांनी खास वेगवेगळे कबाब बनवून घेतले होते. खेळाडू म्हणून मी तुझा ‘फॅन’ आहे, असे मियाँदादला ते म्हणाले होते. मियाँदादने अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराची बाळासाहेबांनी त्या वेळी आठवण करून दिली होती. जावेदला ते म्हणाले होते, ‘मला अजूनही तो षटकार आठवतो. तू पाकिस्तानला पराभवातून वाचवलेस. हरलेली मॅच तू जिंकून दिलीस.’ त्या वेळी मोका साधून जावेदने बाळासाहेबांना म्हटले होते, ‘आमच्या खेळावर एवढे प्रेम करता, मग भारत-पाकिस्तान सामन्यांना विरोध का करता ? पुन्हा सुरू होऊ द्या ना सामने.’ तेव्हा बाळासाहेब ताडकन उसळून उठले आणि म्हणाले, ‘मुशर्रफ आणि पाकिस्तान सरकार जोपर्यंत काश्मीरमधील कारवाया थांबवत नाहीत तोपर्यंत तरी ते शक्य नाही.’
...अन् वानखेडेची खेळपट्टी उद्ध्वस्त
भारत-पाक सामना होऊ नये म्हणून खेळपट्टीवर वंगणासाठी वापरण्यात येणारे तेल टाकण्यात आले.
1991 च्या आॅक्टोबर महिन्यात पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारताच्या दौ-यावर येणार होता. त्या वेळी आॅक्टोबर महिन्यात एक कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार होता. बाळासाहेबांची भूमिका ठाम होती. काश्मीरमध्ये घातपाती कारवाया करणा-या पाकिस्तानशी राजकीय आणि अन्य क्षेत्रात संबंध ठेवू नयेत, अशी त्यांची भूमिका होती. क्रीडा क्षेत्रही या गोष्टीला अपवाद ठरू नये असे त्यांना वाटत होते. त्या वेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माधव मंत्री होते. माधव मंत्री हे त्यांचे स्नेही होते. एकेकाळी एकाच ट्रेनने प्रवास करणारे हे दोन जिवलग मित्र या प्रश्नावरून एकमेकांचे वैरी झाले. माधव मंत्री यांनी आपण याबाबत कसोटी रद्द करण्यास असमर्थ असल्याचे ठाकरेंना कळवले. त्यानंतर शिवसैनिकांनी गनिमी काव्याने ही कसोटी होणार नाही याचा बंदोबस्त केला. त्यावेळचा शिवसेनेचा युवा नेता शिशिर शिंदे याने कसोटी होणार होती त्या खेळपट्टीवर वंगणासाठी वापरण्यात येणारे तेल टाकले. खेळपट्टीवर ओरखडे काढण्यात आले. खेळपट्टी खणण्यासाठी शिवसैनिकांनी त्या वेळी कुदळ, फावडीही नेली होती. मात्र, तेल टाकल्यामुळे खेळपट्टी कसोटी सामना खेळण्यास अयोग्य ठरली. बीसीसीआयने तो सामना मुंबईत आयोजित केला नाही.