आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 वर्षे कंपनी परत मिळण्यासाठी झगडले, आज क्रिकेटमध्ये सर्वाधिक वादग्रस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवळचे लोक त्यांना श्रीनि या नावाने ओळखतात. आज क्रिकेट जगतात ते सर्वाधिक वादग्रस्त आहेत. ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्र डेली टेलिग्राफने ‘क्रिकेटला सर्वाधिक नुकसान पोहोचवणारी व्यक्ती’ अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले आहे. त्यांना ‘स्ट्रीट फायटर’ म्हणजेच जिंकण्यासाठी काहीही करण्यास तयार असलेले असे म्हटले जाते. त्यांच्या विरोधात उभ्या राहणार्‍या व्यक्तीला ते विसरत नाहीत आणि माफही करत नाहीत. अगदी मुलालाही सोडले नाही. अवी मुखर्जी या व्यक्तीसोबत राहणे पसंत नसल्यामुळे श्रीनिवासन यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांचा मुलगा अश्विनने केला आहे. अश्विन म्हणाला होता, मे 2012 मध्ये मुंबईतील एका रेस्टॉरंटमधील सर्व कर्मचार्‍यांशी त्याचे भांडण झाले होते. हा सगळा डाव त्याचे वडील अर्थात श्रीनिवासन यांचा होता. त्यांनी अश्विनला पोलिस लॉक-अपमध्ये मारहाण करवली होती. 1999 मध्ये अश्विन अवी या व्यक्तीच्या संपर्कात आला होता. तेव्हापासून वडील त्याच्यावर नाराज आहेत. त्यामुळे मुलगी रूपा हीच श्रीनिवासन यांची वारसदार आहे, असे बोलले जाते.

बिझनेससाठी ते काहीही करू शकतात. 1946 मध्ये बँकर एसएनएन शंकरलिंगा अय्यर यांनी श्रीनिवासन यांचे वडील टीएस नारायणस्वामी यांच्यासोबत इंडिया सिमेंट्स कंपनी स्थापन केली. त्यांचे वडील अय्यर यांचे विश्वासू व्यवस्थापक होते. 1968 मध्ये वडिलांच्या निधनानंतर अमेरिकेत शिक्षण घेणारे श्रीनिवासन भारतात परतले. इंडिया सिमेंट्समध्ये डेप्युटी एमडी बनले. 1979 पर्यंत सर्वकाही चांगले चालले, मात्र अय्यर यांचा मुलगा केएस नारायण यांच्याशी खटके उडाले. श्रीनिवासन यांच्या हातून कंपनी निसटली. आयडीबीआयने कंपनी टेकओव्हर केली. कंपनी परत मिळवण्यासाठी संसदेत तासन्तास घालवत असत. खासदारांच्या जवळ पोहोचण्यासाठी त्यांची भाषणे लिहून देत असत. करुणानिधींचा पुतण्या मुरासोली मारन याच्याशी मैत्री झाली आणि त्याच्याच मदतीने 9 वर्षांनंतर कंपनी परत मिळवली. आज इंडिया सिमेंट्सची उलाढाल 4 हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. कंपन्या जबरदस्तीने टेकओव्हर करण्यात श्रीनिवासन यांचा हातखंडा आहे. काही वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील मोठे व्यावसायिक व्हीएस राजू यांची राशी सिमेंट्स ही कंपनी टेकओव्हर करताना राजू यांच्या एका जावयाला तोडले होते. व्यवसायात ते नैतिकतेला महत्त्व देत नाहीत. सिमेंटच्या किमती मनमानीपणे वाढवण्याच्या आरोपाखाली स्पर्धा आयोगाने कंपनीला 187 कोटींचा दंड ठोठावला होता.

क्रिकेटमध्येही अचानकपणे येऊन काही वर्षांतच बीसीसीआयचे सर्वेसर्वा बनले. 1993-94 मध्ये श्रीनिवासन यांचे नजीकचे शंकर हे तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनले. त्यांनी श्रीनिवासन यांच्याकडून उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवून घेतली. हरले. 1998 मध्ये पुन्हा लढले आणि जिंकले. या वेळी एसी मुथय्या यांनी त्यांना साथ दिली. तीन वर्षांतच मुथय्या यांची साथ सोडली. 2002 मध्ये टीएनसीएचे अध्यक्ष बनले. शरद पवारांनी त्यांना राष्ट्रीय पातळीवर आणले. श्रीनिवासन यांच्या मदतीनेच पवार 2005 मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष बनले. श्रीनिवासन अंधश्रद्धाळूदेखील आहेत. चेन्नईत चेपॉक स्टेडियमच्या बाहेरील गणेश मंदिराचे त्यांनी पुनर्निर्माण केले. यामुळे टीएनसीएची परिस्थिती सुधारेल, असा त्यांचा विश्वास आहे.

शिक्षण : बीएस्सी (टेक) मद्रास विद्यापीठातून, इलिनॉइस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, शिकागो येथून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर
कुटुंब : पत्नी चित्रा, मुलगी रूपा आणि मुलगा अश्विन. चित्रा आणि रूपा इंडिया सिमेंट्स लि. मध्ये संचालक आहेत.

चर्चेचे कारण : सर्वोच्च् न्यायालयाने स्पॉट फिक्सिंग प्रकरणी त्यांच्यावर कडक ताशेरे ओढले. कोर्ट म्हणाले, बीसीसीआय अध्यक्षपदाच्या खुर्चीला का चिकटून आहात, हटायला तयारच नाहीत!