भारतीय जनता पक्षाची पाळंमुळं महाराष्ट्राच्या कानाकोप-यात रुजवणारा नेता म्हणून गोनीपाथ मुंडे यांची ओळख होती. प्रमोद महाजन हे युतीचे तर मुंडे महायुतीचे शिल्पकार. त्यांच्या याच कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना केंद्र सरकारमध्ये ग्रामविकास, पंचायत राज, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाची जबाबदारी दिली होती. भाजपचा तळागळापर्यंत पोहोचलेला नेता म्हणून मुंडेंकडे पाहिले जात होते. बीड जिल्हा परिषदेपासून त्यांची राजकीय कारकिर्द सुरु झाली होती. मोठ्या संघर्षाने ते आमदार आणि आता केंद्रीय मंत्री झाले होते.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी त्यांनी शिवसेना-भाजप युतीमध्ये या दोन्ही पक्षांच्या एकदम विरोधात असणा-या रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतले. त्यानंतर महायुती हे नाव ख-या अर्थाने सार्थ करण्यासाठी त्यांनी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांना सोबत घेऊन आम्ही पाच पांडव असल्याचे सांगितले. काँग्रेस - राष्ट्रवादीचा पाडाव केल्याशिवाय राहाणार नाही, अशी घोषणा केली. त्यांनी त्यांचे हे शब्द खरे करुन दाखवले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा त्यांनी कधीही लपवून ठेवली नाही. भाजपमध्ये असतानाही त्यांची इतर पक्षातील नेत्यांसोबतची मैत्री कायम चर्चेत राहीली. विलासराव देशमुख यांच्यासोबतची त्यांची मैत्री महाराष्ट्रासाठी कायम कुतूहलाचा विषय राहीला.
मराठवाड्यातील बीड जिल्हा हा मुंडेचा गड होता. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथ्रा हे त्यांचे मुळ गाव. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि मुंडे यांनी महाराष्ट्र पिंजून काढत शिवसेनेच्या सोबतीने 1995 मध्ये युतीची सत्ता आणली आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. 2009 मध्ये पक्षाने त्यांना लोकसभा लढवण्यास सांगितली आणि ते संसदेत गेले. तिथेही त्यांनी त्यांची चमकदार कामगिरी करुन दाखवली. लोकसभेत ते पक्षाचे उपनेते होते. महाराष्ट्रात केवळ भाजपचे नेते म्हणूनच त्यांनी काम केले नाही, तर राज्यात सर्वात मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार बीड जिल्ह्यातील आहेत. या ऊसतोड कामगारांचे ते नेते होते.
पुढील स्लाईडवर वाचा गोपीनाथ मुंडे यांचा जीवनप्रवास....