आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About Jnanpith Award Winner Bhalchandra Nemade

अभिव्यक्तीच्या चौकटी मोडणारा साहित्यिक, वादग्रस्त विधानांसाठीही प्रसिद्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भालचंद्र नेमाडे हे मराठी वाङ््मयविश्वातील अतिशय महत्त्वाचं नाव. "कोसला' या पहिल्या कादंबरीपासून अभिव्यक्तीच्या चौकटी मोडत आलेल्या नेमाड्यांनी मराठी कादंबरीला स्वतःचा चेहरा आणि आत्मविश्वास मिळवून दिला. १९६० च्या दशकातील अनियतकालिकांच्या चळवळीमधे ते आघाडीवर होते. "देशीवाद' ही संकल्पना मांडून नेमाड्यांनी भारतीय साहित्य विश्वामध्ये नवीन चर्चेला तोंड फोडलं. हिंदू चतुष्ट्यातील पहिल्या, "हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीतून त्यांनी आपली देशीवादाची मांडणी अधिक स्पष्टपणे केली आहे. कादंबरीशिवाय कवितेच्या प्रांतातही नेमाड्यांनी आपल्या "मेलडी' व "देखणी' या कवितासंग्रहांतून स्वतःचा ठसा उमटवला असून समीक्षेमधे "टीकास्वयंवर' या ग्रंथातून उग्र समीक्षेचा मार्ग प्रशस्त केला आहे.

नेमाडे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील सांगवी इथे झाला. त्यांचं शालेय शिक्षण खान्देशातच झालं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले आणि १९५९ मध्ये त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी घेतली. बी.ए.च्या काळातील आपल्या अनुभवांवर नेमाड्यांनी पुढे जाऊन (१९६३ मध्ये वयाच्या २५व्या वर्षी) "कोसला' ही कादंबरी लिहिली. मराठी कादंबरीच्या परंपरेत एक मजबूत मैलाचा दगड या कादंबरीमुळे रोवला गेला. या कादंबरीत नेमाड्यांनी उभा केलेला न-नायक पांडुरंग सांगवीकर आपली उभी-आडवी भारदस्त सावली पुढच्या पिढ्यांवरही पाडून अजूनही खंबीरपणे उभा आहे. या नायकाची विविध रूपं "कोसला'मध्ये आहेत.

नेमाड्यांनी १९६१ मध्ये पुण्यातच डेक्कन कॉलेजातून भाषाशास्त्रातील एम.ए.ची पदवी घेतली, तर १९६४ मध्ये मुंबई विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम.ए.ची पदवी संपादन केली. त्यानंतर दीर्घकाळ (सुमारे १९७१ पर्यंत) ते महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी प्राध्यापकाची नोकरी करत होते. या काळातले त्यांचे अनुभव चांगदेव पाटील या नायकाच्या रूपाने त्यांनी कागदावर उतरवले आणि त्यातून बिढार, हूल, जरीला, झूल या चांगदेव चतुष्ट्यातील कादंबऱ्यांचा जन्म झाला. पांडुरंगने बंडखोरी सोडून पण नैतिकता राखून प्रस्थापित व्यवस्थेत स्थिर होण्याचा निर्धार केला होता. चांगदेव हा निर्धार मनात पक्का ठेवून आपली नैतिकता जपत पण व्यवस्थेसोबत राहत आपला प्रवास करण्याचा प्रयत्न करत राहतो. १९७१ मध्ये नेमाडे लंडन इथल्या स्कूल ऑफ ओरिएन्टल अँड आफ्रिकन स्टडीज या संस्थेमधे प्राध्यापक म्हणून गेले; परंतु तिथे त्यांचं मन रमू शकलं नाही, आपल्या विद्यापीठीय कारकीर्दीच्या अखेरीस ते मुंबई विद्यापीठातून निवृत्त झाले.

भालचंद्र नेमाडे यांची गाजलेली विधाने...
१. इंग्रजी शाळांवर बंदी घाला
अफूवर जशी बंदी अाणली गेली तशी इंग्रजी शाळांवर बंदी अाणली पाहिजे. इंग्रजी भाषेच्या वाढत्या वर्चस्वास साम, दाम, दंड, भेद, नीती वापरून विराेध करण्यास सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. इंग्रजी शाळा बंद करा. मुलांना मातृभाषेत स्वप्नं पडली पाहिजेत.
गिरणा गाैरव पुरस्कार स्वीकारतानाचे भाष्य.


२. वर्तमानपत्रांमध्ये साहित्याला बेदखल करण्याची क्षमता नाही
जाहिरातींच्या, उत्पन्नाच्या उन्मत्त तोऱ्यांमध्ये साहित्याला बेदखल करता करता वृत्तपत्रे स्वत:च मानवी संस्कृतीत बेदखल होऊन जातील. साहित्य, काव्य मात्र अक्षय राहणार आहे. वर्तमानपत्रांमध्ये साहित्याला बेदखल करण्याची क्षमता नाही.

३. फुकाचे साहित्य संमेलन
साहित्य संमेलन म्हणजे नसती उठाठेव अाहे. ताे खरेतर रिकामटेकड्यांचा उद्याेग अाहे. साहित्य संमेलनावर चर्चा करणं म्हणजे निव्वळ वेळ वाया घालवणे. साहित्य संमेलन कुठे घ्यावं यावर चर्चा करणं मूर्खपणाचं आहे. शहाणपणाला मर्यादा असतात मात्र मूर्खपणा अमर्याद असतो, हे परेदशी विचारवंत व्हॉल्टेअर यांचे वाक्य येथे लागू पडते. तसंच महापुरुषांचे विचार केवळ पुतळ्यांमध्ये अडकवून ठेवणं अयोग्य अाहे.