आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखादे प्रकरण फक्त 2 मिनिटे ऐकून खटला लढणारे वकील मुकुल रोहतगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्याचे प्रकरण फक्त दोन मिनिटे ऐकून त्याचा खटला न्यायालयात लढण्यासाठी तत्पर अशी मुकुल रोहतगी यांची ओळख आहे. आत्मविश्वासातच माझा विजय दडला असल्याचे ते म्हणतात. रोहतगी यांनी योगेश कुमार सभरवाल यांच्याकडून वकिलीचे धडे घेतले. सभरवालनंतर देशाचे सरन्यायाधीश बनले होते. तसे पाहता रोहतगी यांच्या रक्तातच वकिली आहे. त्यांचे वडील अवधबिहारी रोहतगी हे दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते.  
 
न्यायालयात मुकुल रोहतगी प्रचंड वाद प्रतिवाद करत असले तरी बाहेर ते कधीच अन्य वकिलांप्रमाणे माध्यमांवर आगपाखड करत नाहीत. माध्यमांची इच्छा असूनही रोहतगी नम्रतेने त्यांच्यापासून दूर निघून जातात. भाजपची त्यांच्यावर नेहमीच कृपा राहिली आहे. दिल्ली न्यायालयात ते वकिली करायचे तेव्हा तत्कालीन वाजपेयी सरकारने त्यांना अतिरिक्त महाधिवक्ता बनवले होते. अंबानी बंधूंच्या वायू पुरवठा प्रकरणाच्या वादावेळी रोहतगी यांनी अनिल अंबानी यांची बाजू मुंबई उच्च न्यायालयात मांडली होती. नरेंद्र मोदी सरकारने २०१४ मध्ये रोहतगी यांना महाधिवक्ता बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना या पदावर नियुक्त करू नये, असे एका प्रसिद्ध वयोवृद्ध वकिलाने पत्राद्वारा मोदींना सांगितले होते. तरीही मोदींनी रोहतगी यांची नियुक्ती केली.  रोहतगी हे अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निकटवर्तीय मानले जातात. २००२ मध्ये गुजरात दंगलीच्या प्रकरणात त्यांनी मोदी अाणि गुजरात सरकारची बाजू मांडली होती. बनावट चकमक ते बेस्ट बेकरी इत्यादी प्रकरणेही त्यांनीच न्यायालयात लढली.

 
महाधिवक्ता नव्हते त्या वेळी रोहतगी सोमवार ते शुक्रवारपर्यंत न्यायालयाच्या या खोलीतून त्या खोलीत सतत धावपळ करताना दिसायचे. त्यांच्याकडे अनेक खटले होतेे. त्यामुळे सुपरकार, हॉलिडे होममध्ये राहून ते सुट्या घालवायचे. एखादा खटला लढताना रोहतगी असा एखादा धागा शोधूनच काढतात जो न्यायाधीशांसाठीही आव्हानात्मक ठरू शकतो. ते याच मुद्द्यावर न्यायाधीशांना केंद्रित करून टाकतात. प्रतिवादी वकिलांशी जेव्हा ते या मुद्द्यावरील सहमतीबाबत विचारतात तेव्हा प्रतिवादी वकील आपल्या फिर्यादीस याविषयी विचारणा करतात. तोपर्यंत रोहतगी यांना संधी मिळते आणि तो खटला ते आपल्याकडे झुकवून घेतात.

वय -  सुमारे ५८ वर्षे
वडील- न्या. अवधबिहारी रोहतगी
कुटुंबीय- वसुधा (गृहिणी), मुलगा निखिल आणि समीर (दोघेही वकील)
चर्चेचे कारण- महाधिवक्ताचे पद सोडण्याची रोहतगी यांनी नुकतीच घोषणा केली आहे.
बातम्या आणखी आहेत...