आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story Of Sarojini Naidu On Ocassion Of Her Birth Anniversary

Birth Annv. : स्वातंत्र्य लढ्यातील ही नायिका होती \'भारताची कोकिळा\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींबरोबर लढलेल्या सरोजिनी नायडू यांना 'भारताची कोकिळा' असेही म्हटले जात होते. त्यांच्या काव्य प्रतिभेमुळे त्यांना ही उपाधी मिळाली होती.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्या, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री सरोजिनी नायडू यांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय (चॅटर्जी). सरोजिनींच्या आई वरदासुंदरीदेवी मूळच्या बंगालच्याच. त्या बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले. यांतून त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद जडला व स्फूर्ती मिळाली.
त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगी रीत्या झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्या मद्रास इलाख्यात मॅट्रिक परीक्षेत पहिल्या आल्या (1892).निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या (1895). लंडन आणि केंब्रिज येथे थोडे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून इटली पाहून त्या मायदेशी परतल्या; पण या वास्तव्यात त्यांचा अॅडमंड गॉस या इंग्रज साहित्य-समीक्षकाशी चांगला परिचय झाला. त्यांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. द गोल्डन थ्रेशोल्ड (1905) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्या वेळच्या साहित्यक्षेत्रात चांगलाच गाजला.
भारतात परत आल्यानंतर 1898 मध्ये त्यांनी डॉ. गोविंदराजुलू नायडू या निजामच्या संस्थानी विधुर डॉक्टरशी ब्राह्मोसमाजाच्या रीतिरिवाजानुसार लग्न केले. हा विवाह बंगाल व मद्रास असा आंतरप्रांतीय व आंतरजातीय होता. त्यामुळे त्या वेळी तो फार गाजला व येथूनच सरोजिनींच्या सामाजिक कार्यास सुरुवात झाली. त्यांना चार मुले झाली : जयसूर्या, पद्मजा, रणधीर आणि लैलामणी. रणधीर पुढे हैदराबादच्या राजकीय चळवळीत प्रसिद्धीस आला, तर पद्मजा बंगालच्या राज्यपाल झाल्या. सरोजिनींनी द गोल्डन थ्रेशोल्डनंतर द बर्ड ऑफ टाइम (1912) व द ब्रोकन विंग (1917) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. हिंदी महिलेने सुरेख इंग्रजीत लिहिलेल्या या कविता स्वरमाधुर्य, राष्ट्रीय दृष्टिकोण, प्रेमाचा पुरस्कार व क्रांतिकारक राष्ट्रवादी विचार इ. वैशिष्ट्यांनी लोकप्रिय झाल्या. पाश्चात्त्य तसेच पौर्वात्त्य देशांत त्यांस कीर्ती लाभली आणि कवयित्री म्हणून त्यांचा नावलौकिक वाढला.‘भारतीय कोकिळा’ म्हणून त्यांचा सर्वत्र उल्लेख होऊ लागला.

सरोजिनीबाईंचे मन हे हळव्या कवयित्रीचे, पूर्णार्थाने भावनाप्रधान स्त्रीह्रदय होते. तथापि राजकारणात त्या एक निःस्पृह देशभक्त होत्या आणि राजकारणी व्यक्तीला पोषक असे धाडस, दुसऱ्यावर छाप पाडणारे व्यक्तिमत्व आणि प्रभावी संभाषण हे त्यांचे विशेष. त्यांचा राष्ट्राभिमान जाज्वल्य होता व देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची त्यांची तयारी होती. पण याचबरोबर स्त्रीस्वातंत्र्य, हिंदु मुसलमान ऐक्य इ. गोष्टींचा त्यांनी आयुष्यभर पाठपुरावा केला आणि अखेरच्या दिवसांत त्यांच्या या तत्वांना अपयश आलेले पाहून त्या खचल्या. त्यांची इच्छा नसतानाही त्यांना उत्तर प्रदेशचे राज्यपालपद देण्यात आले; पण अल्पावधीतच त्या लखनऊ येथे मरण पावल्या.

पुढील स्लाइड्सवर वाचा, सरोजिनीबाईंच्या कार्याविषयी...