आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कथा दोन युवराजांची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजघराण्यांना राजकारण नवं नाही, परंतु राजकारणाच्या युद्धभूमीवर सर्वच राजघराण्यांना यश मिळालं असंही झालं नाही. माधवराव शिंदेंपासून ते उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत अनेकांना यश मिळालेही. या पार्श्वभूमीवर लोकसभा आणि विधानसभेचे बिगुल वाजू लागताच कोल्हापुरात चर्चा सुरू आहे ती दोन युवराजांची.


नऊ वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या. कोल्हापूरचे धाकटे युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी आमदारकी लढवायची असा निर्धार केलेला. राष्‍ट्रवादीकडून संधी मिळाली तर बघायचे म्हणून श्रीमंत शाहू महाराज आणि मालोजीराजे यांनी दिल्लीतच तळ ठोकला होता. अर्थातच ज्यांचा राजघराण्यांशी चांगला संबंध असतो त्या शरद पवारांवरच त्यांची भिस्त होती. परंतु कोल्हापूर विधानसभा मतदारसंघ गेला काँगेसकडे. पुन्हा पवारांनी आपली पॉवर दाखवली आणि एका रात्रीत मालोजीराजे छत्रपती यांना काँग्रेसमध्ये धाडले. त्यांना तिकीटही मिळाले आणि शिवसेनेच्या सुरेश साळोखे या विद्यमान आमदारांचा पराभव करून मालोजीराजे आमदार झाले.
परंतु चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत त्यांच्याच वयाच्या राजेश क्षीरसागर नावाच्या कट्टर शिवसैनिकाने त्यांना आव्हान दिले. मालोजीराजेंचा पराभव होईल असे कुणालाही वाटले नव्हते. परंतु बहुरंगी लढतीमध्ये शहराच्या प्रश्नांसाठी आक्रमक आंदोलने करणा-या क्षीरसागर यांची सरशी झाली. शहरातील तालमींना मदत केली होती. त्या बळावर आपण सहज जिंकू, असा मालोजीराजेंचा विश्वास म्हणजे भ्रम होता हे सिद्ध झाले. यानंतर मालोजीराजेंची सक्रियता कमी होत गेली. खुद्द काँग्रेस कमिटीच्या कार्यालयातच माजी महापौर अ‍ॅड. महादेवराव आडगुळे यांनी मालोजीराजेंनी आता सक्रिय होण्याची गरज व्यक्त केली.


अशा पद्धतीने धाकटे युवराज पुन्हा राजकारणात स्थिरस्थावर होण्यासाठी धडपडत असताना ज्येष्ठ युवराज संभाजीराजे यांनी मात्र आपल्या शिडाची दिशा बदलल्याचे जाणवत आहे. चार वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात राष्‍ट्रवादी काँग्रेसची लोकसभेची उमेदवारी युवा नेते धनंजय महाडिक यांना नक्की मिळणार, असे वातावरण होते. परंतु महाडिकांची महत्त्वाकांक्षा आणि सर्व बाबतीतील तयारी पाहता या युवा नेत्याला उरावर घेण्यात दोन्ही काँग्रेस, जनसुराज्यच्या नेत्यांनी आपला तोटा ओळखला आणि महाडिक यांचा पत्ता कट झाला. अखेरच्या टप्प्यात संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी मिळाली.


छत्रपती शाहू महाराजांचे वारसदार, स्वच्छ चेहरा, दोन्ही काँग्रेसची ताकद या बळावर संभाजीराजे निवडून येतील अशी शरद पवारांसह अन्य नेत्यांची अटकळ होती. परंतु राष्‍ट्रवादीचेच तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे शरद पवारांशी बिनसले आणि त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी थेट शरद पवारांनाच टार्गेट केल्याने राज्यातच नव्हे, तर दिल्लीतही या निवडणुकीची चर्चा सुरू झाली. पवारांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेता अशा पद्धतीने पवारांना झोडपू लागला. एकीकडे राजकारणात नवख्या असलेल्या संभाजीराजेंना राष्‍ट्रवादीच्याच काही नेत्यांनी अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले असताना दुसरीकडे मंडलिकांनी या लढाईला राजा विरुद्ध प्रजा, असे स्वरूप दिले. मंडलिकांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर पवारांनी ही वेळ आणायला नको होती, असे वातावरण तयार झाले. अन्य अनेक कारणे याला सहाय्यभूत ठरली. राष्‍ट्रवादी पक्षात रीतसर प्रवेश करून नंतर तिकीट नाकारल्याची सल धनंजय महाडिक आणि त्यांचे काका आमदार महादेवराव महाडिक यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांचाही सहकार्याचा हात मंडलिकांना मिळाला आणि संभाजीराजे पराभूत झाले.


या लोकसभा निवडणुकीआधी संभाजीराजे यांनी शिवराज्याभिषेक दिन रायगडावर साजरा करण्याच्या निमित्ताने राज्यभर फिरस्ती केली होती. या उत्सवातील अनेक अडचणींच्या वेळी संभाजीराजेंनी टोकाची भूमिका घेत सरकारलाही काही निर्णय घेणे भाग पाडले होते. त्यामुळे बहुजन समाजाच्या अनेक संघटनांना त्यांचा आधार वाटू लागला. शिवाजी महाराज, शाहू महाराजांचा वारसदार म्हणून त्यांना राज्यात आणि बाहेरही जो सन्मान मिळत गेला त्यातूनही ज्यांना आपली किंमत माहिती आहे त्यांच्यासाठी राबण्याचे धोरण संभाजीराजेंनी अवलंबले. यातून मराठा आरक्षणाच्या लढाईत त्यांनी झोकून दिले आहे. त्यासाठी कानपूरपासून ते औरंगाबादपर्यंत सर्वत्र त्यांचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. साहजिकच कोल्हापूर जिल्ह्यातील राष्‍ट्रवादीशी त्यांची असलेली संगत कमी होऊ लागली. गेल्या वर्षभरात तर राष्‍ट्रवादीच्या अनेक कार्यक्रमांना त्यांची अनुपस्थिती आहे.


त्यामुळे लोकसभेला पुन्हा त्यांच्या उमेदवारीची दावेदारी असली तर त्या मागणीत फारसा दम राहिला नाही हे राष्‍ट्रवादीचेच कार्यकर्ते मान्य करतात. ज्या पद्धतीने दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या बालेकिल्ल्यात संभाजीराजेंना गेल्या निवडणुकीत कमी मते मिळाली त्यावरून ते प्रचंड नाराजही झाले ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी आता आरक्षणाची लढाई आरपार लढण्याचे ठरवले आहे तर मालोजीराजे हे पुन्हा आमदारकीसाठी कंबर कसतील असे चित्र आहे. दोन्ही युवराजांच्या भवितव्याची दिशा ही 2014 मध्ये स्पष्ट होईल हे नक्की.