आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Success Stories Of Businessman's Of Dalit Community Success Stories Of

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्रातील दलित उद्योजकांच्या पहिल्या पिढीचा परिचय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिका, संघटित व्हा, उद्योजकतेची कास धरा

‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा,’ असा मंत्र भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाला दिला होता. त्या तेजस्वी संदेशाच्या जोरावर दलित समाजानेही कात टाकली आहे. सरकारी नोकऱ्यांच्या मागे न धावता उद्योग-व्यवसायातील नवनवी क्षितिजे दलित तरुण पादाक्रांत करीत आहे. अमेरिकेतील ‘कृष्णवर्णीय भांडवलशाही’च्या धर्तीवर देशात ‘दलित भांडवलशाही’ रुजू पाहत आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्रातील निवडक दलित उद्योजकांच्या पहिल्या पिढीचा हा परिचय...
दलित भांडवलशाही - उद्योगक्षेत्रात दलित नेतृत्व तयार करण्यासाठी दलित भांडवलशाहीची संकल्पना

मिलिंद कांबळे, संस्थापक अध्यक्ष, डिक्की
पहिल्या, दुसऱ्या पिढीतील दलित उद्योजकांच्या गरजा ओळखून त्यांना मदत करण्यासाठी वेगळ्या चेंबरची स्थापना

१.दलित उद्योजकांसाठी स्वतंत्र चेंबर स्थापन करण्याची गरज का वाटली?
खरे तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते. कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डॉक्टर ऑफ सायन्स या अर्थशास्त्राच्या पदव्या प्राप्त केल्या होत्या आणि त्यांच्या अर्थशास्त्रातील भरीव कामगिरीमुळे त्यांना एक अर्थतज्ज्ञ म्हणून मान्यताही मिळाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचारांचा मी अभ्यासक आहे. त्यांच्या आर्थिक विचारांचा अभ्यास करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ‘शिक्षण, राजकारण, समाजकारण या बरोबरीने ‘अर्थकारण' याचीही कास दलित समाजाने धरली तर दलित समाजाला प्रगती करण्यावाचून कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळेच दलित तरुणांमध्ये आत्मविश्वास जागवला पाहिजे, यशस्वी उद्योजक घडवले पाहिजेत. असे प्रथमतः मला जाणवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचारांना मूर्तरूप देण्यासाठीच आम्ही काही उद्योजकांनी दलित समाजातील युवकांच्या प्रश्नांचा तसेच समाजातील आर्थिक प्रश्नांचा मागोवा घेतला. दलित समाजाचा आर्थिक विकास व्हायचा असेल तर ठोस स्वरूपात कृती करण्याची आवश्यकता आहे हे ओळखून २००५ मध्ये DICCI म्हणजेच ‘दलित इंंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज' या संघटनेची स्थापना केली. पहिल्या किंवा दुसऱ्याच पिढीतील दलित उद्योजकाला व्यवसाय उभा करण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. दलित उद्योजकांच्या गरजा ओळखून, सरकारशी चर्चा करून धोरणे निश्चित करण्यासाठी चेंबरचा अधिक प्रभावी वापर होऊ शकतो. म्हणून दलित उद्योजकांसाठी अशा वेगळ्या चेंबरची स्थापना करावी, असे वाटले.

२. सरकारी नोकरीच्या मागे न लागता युवकांनी उद्योग क्षेत्रात झेप घ्यावी, असे तुम्हाला वाटते. पण मुळात उद्योग सुरू करताना भांडवल हा महत्त्वाचा अडसर असतो. त्या पार्श्वभूमीवर दलित उद्योजक घडणे खरेच शक्य आहे का?
दलित समाजाची आजची लोकसंख्या ही ३० कोटींच्या आसपास आहे. देशाच्या डेमाग्रॅफीमध्ये तरुणांची संख्या ६५% आहे. म्हणजेच दलित तरुणांची आज लोकसंख्या १५ कोटींच्या आसपास आहे. सरकारी नोकऱ्यांची संख्या ही खूपच कमी आहे. मग दलित तरुणांनी हातावर हात धरून बसायचे का? डिक्कीचे दलित तरुणांना आवाहन आहे की केवळ सरकारी नोकरीच्या मागे न लागता उद्योग-व्यवसायात उडी घ्यावी. कारण आजमितीला देशात मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत.

३. सध्याच्या परिस्थितीत देशातच गुंतवणुकीचे प्रमाण कमी आहे. अशा परिस्थितीत दलितांचे कॅपिटल फॉर्मेशन कसे होणार?
मला असं वाटतं की, माणसाकडे जी ‘बुद्धी' आहे तेच मोठे ‘भांडवल' आहे. तिचा योग्य वापर केला आणि जिद्द आणि चिकाटीची जोड दिली तर जगातील कोणत्याही आव्हानाला तोंड देणे शक्य होते. देशाची नवीन आकडेवारी पाहिली तर आजमितीला अनुसूचित जाती-जमातीच्या उद्योजकांची संख्या ८७ लाख आहे. या उद्योजकांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मार्ग शोधून काढला आहे, देशांतर्गत बाजारपेठेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाला भांडवल उभारणे फार अवघड नाही. ते सहज उपलब्ध आहे.

४. नवउद्योजकांना पुढे आणण्यासाठी डिक्कीची भूमिका काय?
दलित समाजामध्ये राजकीय, शैक्षणिक, कामगार, तत्त्वज्ञान या विविध क्षेत्रात नेतृत्व तयार झाले. परंतु उद्योगक्षेत्रात नेतृत्व तयार झाले नाही. या पार्श्वभूमीवर दलित उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, दलित उद्योगपती निर्माण करणे, त्यांना राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देणे यासाठी डिक्कीने महत्त्वाचे पाऊल उचलले. ब्लॅक कॅपिटॅलिझमच्या धर्तीवर दलित कॅपिटॅलिझम संकल्पना पुढे आणली.

५. मुद्रा बँकेमध्ये अनुसूचित जाती-जमातींना कर्ज देण्यावर भर दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुद्रा बँकेचे कामकाज कसे अपेक्षित आहे?
स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ही अतिशय महत्त्व पूर्ण बाब आहे की, जो वर्ग गावकुसाच्या बाहेर होता तो वर्ग हा ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग बनू पाहत आहे. या वर्गाला ‘पॉलिसी' आणि ‘इक्विटी' यांची मदत मिळाली तर चांगले काम करू शकतील. मुद्रा म्हणजे लघुउद्योग विकास पुनर्वित्त संस्था (Micro Units Development Refinance Agency) होय. यामध्ये सरकारने २०,००० कोटी रुपयांचे भांडवल दिले आहे. तसेच ३००० कोटी रुपये क्रेडिट वाढीसाठी ठेवले आहेत.. या बँकेमार्फत ५०,००० रुपये ते १०,००,००० लाखांपर्यंतचे कर्ज लघुउद्योजकांना देण्यात येणार आहे. कर्ज वितरण प्रणालीही सोपी असावी हीच अपेक्षा आहे.

डिक्कीच्या आगामी योजना काय?
डिक्कीच्या आगामी योजनांमध्ये कौशल्य विकासावर अधिक भर राहणार आहे. ज्यामध्ये २०२५पर्यंत ५० लाख लोकांना प्रशिक्षण देणे हे उद्दिष्ट आहे. नागपूर येथे कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्याचे काम सुरू आहे. हैदराबादमध्ये देशातील पहिले ‘इनक्युबेशन सेंटर' स्थापन करणे हे आगामी योजनेतील महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. महिलांमध्येही उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी डिक्कीने महिला शाखेची स्थापना केली आहे. अनुसूचित जमातीमधील तरुणांमध्ये उद्योजकता वाढवण्यासाठी जमशेदपूर येथे इनक्युबेशन सेंटर स्थापन करण्याचा मानस आहे. १०० उद्योजकांना १०० कोटींची उलाढाल करणारे उद्योजक बनवण्याच्या दिशेने योजना
आखत आहोत.
(संतोष काळे)
पुढील स्लाइड्सवर वाचा अशाच आणखी उद्योजकांबाबत आणि इतर महत्त्वाची माहिती...