आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण जेमतेम,मूकबधिर..तरीही विमान निर्मिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षण - सातवी उत्तीर्ण
कुटुंब - मारिया (पत्नी) आणि जोशुआ (मुलगा).
चर्चेत - नुकतीच त्यांनी १४ लाख रुपयांत विमाननिर्मिती केली आहे.

साजी ५ वर्षांचे असताना कार्डबोर्डच्या साहाय्याने कार, बस आणि विमान बनवत असत. मात्र, त्यांच्या या प्रतिभेकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. सातवीनंतर साजीला शिकवायचेच नाही, असे वडिलांनी ठरवून टाकले होते; पण तीन मुलांमध्ये साजी एक दिवस आपला लौकिक वाढवेल याची कल्पनाही त्यांना आली नव्हती. दूरचित्रवाणी संच घरोघरी येण्यास सुरुवात झाली तेव्हा त्यांनी टीव्ही दुरुस्तीत कौशल्य प्राप्त केले. हेच त्यांच्या उत्पन्नाचे साधनही बनले. लग्न समारंभातील फोटोग्राफीतून थोडेफार पैसे मिळत होते. विविध मशीन्स उघडून पाहणे आणि त्यात दुरुस्ती करण्याचा त्यांना छंद जडला. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे शिक्षण नसतानादेखील मशीनमधील भागांची जोडणी व बिघाड त्यांना लवकर समजत असे.
तथापि, त्यांचे पहिले प्रेम आकाशात उडणाऱ्या विमानाच्या निर्मितीचे होते. रबराच्या झाडांवर कीटकनाशकांच्या फवारणीसाठी दोन हेलिकॉप्टर उडत असल्याचे त्यांनी एकदा पाहिले. त्यांनी वैमानिकांशी मैत्री केल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टर उडवण्यास दिले. यानंतर १५ व्या वर्षी हेलिकॉप्टर उड्डाण करणाऱ्या कंपनीचा पत्ता शोधत त्यांनी मुंबई गाठली. दोन आठवड्यांच्या वास्तव्यात त्यांनी साजी यांना हेलिकॉप्टर निर्मितीबाबत दोन पुस्तके दिली. लहानपणापासून मूकबधिर असलेल्या साजी यांना हवाई दलातील निवृत्त विंग कमांडर एस. के. जे. नायर यांचे मार्गदर्शक लाभले.

त्यांनी निर्मिती केलेल्या अल्ट्रा लाइट साजी एक्स एअर - एस विमानाने तामिळनाडूच्या मनीमुथर खोऱ्यात अनेक उड्डाणे केली आहेत. यात आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी हे विमान बाजारपेठेपेक्षा निम्म्या किमतीत आणि रिसायकल्ड सामग्रीतून तयार केले आहे. त्यांना सरकारकडून काेणतीही मदत मिळाली नाही. १४ लाख रुपये निर्मिती खर्चासाठी साजी यांना जमीन आणि सामान विकावे लागले होते. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या विमानाची बनावट करण्यासाठी किमान २५ लाख रुपये खर्च येतो. पाच वर्षांच्या परिश्रमातून विमान तयार झाले, तेव्हा टेकऑफसाठी जागा उपलब्ध नव्हती. तेव्हा त्यांनी मनीमुथर खोऱ्यात विमान उड्डाणाची तयारी केली.
साधारणपणे विमानात प्रोपेलर फायबर ग्लास लावणे अपेक्षित असते. त्याऐवजी त्यांनी लाकडी प्रोपेलरचा वापर केला. प्रोपेलर तयार करणे अवघड काम आहे. मात्र, साजी यांनी अनेक जणांच्या मदतीने त्यात यश मिळवले. अशाच पद्धतीने कॉकपिट तयार करण्यासाठी ४० हजार रुपये खर्च येतो, मात्र त्यांनी ते ५ हजारांत पूर्ण केले. या विमानाच्या निर्मितीआधीही त्यांनी आगळेवेगळे प्रयत्न केले आहेत.