आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅडबरी : एकट्याने सुरू केलेल्या उद्योगात आज ८० हजार कर्मचारी कार्यरत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- कॅडबरीचे संस्थापक जाॅन कॅडबरी यांनी दोन शतकांपूर्वी बर्मिंगहॅममधून सुरू केला होता व्यवसाय
- १८५४ मध्ये जॉन कॅडबरी यांना राणी व्हिक्टाेरिया यांच्याकडून शाही परिवारासाठी चॉकलेट बनवण्याचा आदेश िमळाला.
- सध्या कॅडबरी कंपनीची एकूण संपत्ती ११ अब्ज पाउंड (१ हजार अब्ज रुपये) आहे.
१८ व्या शतकात इंग्लंडमध्ये "क्वॉकर्स फॅमिली' नामक समुदाय होता. या समुदायातील लोक स्वत:ला "मित्रांचा धार्मिक समूह' म्हणायचे. ते कोणत्याही धार्मिक संस्थेशी जोडलेले नव्हते, तर त्यांच्या स्वतंत्र रूढी आणि परंपरा होत्या. ईश्वर आणि आपल्यात अन्य बाबींचा अडथळा त्यांना मान्य नव्हता. युरोपच्या विद्यापीठांमध्ये त्यांच्या मुलांना प्रवेशही नव्हता आणि ते लष्करातही जाऊ शकत नव्हते. अशा परिस्थितीत ते वैद्यकीय, इंजिनिअरिंगसारख्या करिअरचा विचारही करू शकत नव्हते. त्यामुळे उद्योग हाच एकमेव सुरक्षित पर्याय त्यांच्यासमाेर होता. अशाच एका परिवारात १२ ऑगस्ट १८०१ रोजी "कॅडबरी'चे संस्थापक जॉन कॅडबरी यांचा जन्म झाला.

जॉन यांच्या कुटुंबीयाचा मद्य, मांस, धूम्रपान इत्यादी व्यसनांना विरोध होता. स्वत: जॉन हेसुद्धा आपल्या परंपरा आणि मूल्यांप्रती जागरूक होते. त्यामुळे अन्य युवकांप्रमाणे कोणताही व्यवसाय ते करू शकत नव्हते. शालेय जीवनात ते लीड्सच्या एका कॉफी दुकानात काम करायचे.
मद्यप्राशन करणाऱ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायी पेय उपलब्ध करून देण्याच्या विचाराने त्यांनी १८२४ मध्ये बर्मिंगहॅममध्ये दोन खोल्यांत कॉफीचे दुकान सुरू केले. या ठिकाणी ते चहा, कॉफीसोबतच कोको आणि चॉकलेट ड्रिंकही विकायचे. या व्यवसायाचा चांगलाच जम बसला. मात्र, दरम्यान एक रंजक गोष्ट घडली. या दुकानातील चहा किंवा कॉफीपेक्षा चॉकलेट ड्रिंकला जास्त मागणी होती. त्यामुळे जाॅन यांनी याच उत्पादनावर लक्ष केंद्रित केले. त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुतच आहे. कॅडबरी कंपनी सुरू केल्यानंतर दोन वर्षांनी १८२६ मध्ये जॉन यांनी त्यांच्यापेक्षा दोन वर्षाने मोठ्या प्रिसिला अॅना डेमंड यांच्याशी लग्न केले. त्यानंतर दोनच वर्षांनी प्रिसिला यांचे निधन झाले. त्यानंतर १८३२ मध्ये जॉन यांनी कँडिया बारो यांच्याशी लग्न केले. या दांपत्यास सात मुले झाली.

केवळ १५ वर्षांतच जॉन कॅडबरी हे विशेष प्रकारच्या चॉकलेट आणि ड्रिंक्समुळे ब्रिटनमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. तेव्हा त्यांचे बंधू बेंजामिन हेसुद्धा या व्यवसायात उतरले होते. त्यामुळे कंपनी "कॅडबरी ब्रदर्स' नावाने ओळखली जाऊ लागली. १८३१ मध्ये जॉन यांनी एका चारमजली इमारतीत फॅक्टरी सुरू केली. १८४२ पर्यंत या कंपनीचे १६ प्रकारचे चॉकलेट ड्रिंक आणि कोको उत्पादने बाजारात आली होती. १८४७ मध्ये जॉन यांनी बर्मिंगहॅम शहराच्या मध्यभागी एका नव्या इमारतीत फॅक्टरीचे स्थलांतरण केले. १८५० च्या दरम्यान जॉन आणि बेंजामिन यांच्यात वितुष्ट आले आणि बेंजामिन कंपनीतून बाहेर पडले. त्याचदरम्यान जॉन यांचे पुत्र रिचर्ड आणि जॉर्ज यांचाही या व्यवसायातील रस वाढला होता.

१८६१ मध्ये तब्येतीच्या कारणावरून जॉन यांनी निवृत्ती पत्करली. तेव्हा रिचर्ड यांचे वय २५, तर जॉर्ज यांचे २१ वर्षे होते. या स्थापित उद्योगाला त्यांनी नंतर वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहोचवले. ११ मे १८८९ रोजी जॉन कॅडबरी यांनी जगाचा निरोप घेतला. जगातील पहिले मिल्क बार चॉकलेट १८७५ मध्ये स्वित्झर्लंडच्या डेनियल पीटर या व्यावसायिकाने बनवले होते. या उत्पादनाची कॅडबरी बंधूंना चांगलीच स्पर्धा मिळाली. १८९९ मध्ये रिचर्ड यांच्या मृत्यूनंतर जॉर्ज यांनी हा व्यवसाय पुढच्या पिढीकडे देण्याची तयारी सुरू केली. दरम्यान, निवृत्ती घेण्याआधी १९०५ मध्ये जॉर्ज यांनी डेअरी मिल्क या कॅडबरीच्या लोकप्रिय चॉकलेटचा अाविष्कार केला.
फोटो - १८२४ मध्ये बर्मिंगहॅममध्ये कॅडबरी यांनी सुरू केलेल्या पहिल्या दुकानाचे छायाचित्र.