आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगेश्वर दत्त - देशातील सर्वात महागड्या पहिलवानाची यशोगाथा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्म : २ नोव्हेंबर १९८२
कुटुंब : आई - सुशीला देवी (शिक्षिका), वडील स्व. राममेहर (शिक्षक होते), भाऊ मुकेश (शिक्षक)
चर्चेत - नुकताच तो देशातील महागडा पहिलवान ठरला आहे.
योगेश्वर दत्तच्या २ नोव्हेंबर या वाढदिवशीच त्याला भारतीय कुस्ती लीगमध्ये सर्वात महागड्या खेळाडूचा बहुमान प्राप्त झाला. त्याच्यावर ३९.७० लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. ऑलिम्पिक विजेता सुशील कुमारवर त्याखालोखाल ३८.२० लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती.

योगेश्वर शिक्षक व्हावा, अशी आई-वडिलांची इच्छा होती. त्याचे आजोबा रतिराम हरियाणाच्या सोनिपतमधील एका गावात शिकवत होते. वडील राममेहर आणि आई सुशीला देवी शाळेत शिक्षक होते. योगेश्वरचा लहान भाऊ मुकेशनेही कुटुंबाचा हा व्यवसाय निवडला. घरच्यांनी त्याचे नाव मनीष ठेवले; मात्र सर्वजण लाडाने त्याला योगी म्हणून हाक मारत. यातूनच तो पुढे योगेश्वर म्हणून नावारूपाला आला. शिक्षक होण्याऐवजी ८ वर्षांच्या योगेश्वरचे बलराज पहिलवान प्रेरणास्थान बनले. लहानपणी पहिलवान होण्याच्या इच्छेतून तो तालमीत जाऊ लागला. मुलाने अशा पद्धतीने वेळ वाया घालवू नये, असे आईला वाटत होते. मात्र, तो शिक्षणातही हुशार होता. लहानपणी सतबीरसिंह यांनी त्याला प्रशिक्षण दिले. १९९२ मध्ये पाचवीत असलेल्या योगेश्वरने एकदा घरी भिंतीवरचे घड्याळ आणले. घरच्यांनी विचारणा केली, तेव्हा त्याने कुस्ती जिंकल्याचे सांगितले. त्या दिवशी राममेहर यांनी निर्णय बदलला आणि मुलाला पहिलवान होण्यासाठी प्रोत्साहन देऊ लागले. त्याच्या आहाराची काळजी घेऊ लागले. ते स्वत: रोज सकाळी बदाम वाटून देत होते. मुलाला कुस्ती जिंकण्यासाठी प्रोत्साहन देत होते.

२००६ मध्ये दोहात आशियाई स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. योगेश्वर दोह्याला गेल्यावर नऊ दिवसांनी वडिलांचे निधन झाले. याचा धक्का योगेश्वरला बसला. कारण त्याला पहिलवान करण्यात वडिलांनी कोणतीही कसर ठेवली नव्हती. त्या वेळी त्याच्या घोट्याला जखम झाली होती. भावनिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्याही खचल्यानंतरही त्याने कुस्ती जिंकली आणि देशाला प्रतिष्ठित कांस्यपदक जिंकून दिले. २००३ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने पहिले सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर पदकांची कमाई होत राहिली. सन २०१३ मध्ये त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१४ मध्ये ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने पुन्हा सुवर्णपदक पटकावले.