Home | Divya Marathi Special | sucess story on rahul taneja

दीडशे रुपयांनी सुरुवात अन् दहा वर्षांत बीएमडब्ल्यू

नरेश वशिष्ठ (जयपूर) | Update - Jun 06, 2011, 01:29 PM IST

आत्मविश्वास, मेहनत आणि प्रयत्नांतील सातत्य यामुळे अनेक गोष्टी मिळवता येतात. ढाब्यावर केवळ दीडशे रुपये पगारावर काम करणार्‍या एखाद्याने बीएमडब्ल्यूसारखी महागडी कार खरेदी केली.

  • sucess story on rahul taneja

    आत्मविश्वास, मेहनत आणि प्रयत्नांतील सातत्य यामुळे अनेक गोष्टी मिळवता येतात. ढाब्यावर केवळ दीडशे रुपये पगारावर काम करणार्‍या एखाद्याने बीएमडब्ल्यूसारखी महागडी कार खरेदी केली. त्यासाठीचा नंबरही सर्वांत जास्त किंमत मोजून खरेदी केला, यावर कुणी सहजासहजी विश्वास ठेवणार नाही; पण हे शक्य करून दाखवले आहे जयपूरच्या मालवीय नगरमधील रहिवासी राहुल तनेजा याने.

    दारिद्रय़ाला कंटाळून राहुलने वयाच्या अकराव्या वर्षीच घर सोडले. त्यानंतर त्याने ढाब्यावर दीडशे रुपये महिन्याची नोकरी स्वीकारली. आर्थिक तंगीच्या काळातही राहुलने शिक्षणाची साथ सोडली नाही. सकाळी शाळा आणि रात्री उशिरापर्यंत ढाब्यावर तो नोकरी करायचा. मिळणार्‍या दीडशे रुपये पगारातून तो ऐंशी रुपये शाळेची फी जमा करत होता. अशा खडतर प्रयत्नांमुळेच शाळेतही त्याने चांगले मार्क मिळवले. यानंतर त्याने फटाके विकण्याचा व्यवसायही केला. मात्र, एवढय़ानेही जेव्हा खर्च भागेना त्या वेळी त्याने दिल्लीहून चामड्याची जॅकेट्स जयपूरला आणून विकण्याचा व्यवसायही केला. सहाशे रुपये भाडे देऊन घेतलेल्या छोट्याशा घरात त्याने अनेक छोटे-छोटे व्यवसाय सुरू केले. त्यानंतर राहुलने केटरिंग आणि मॉडेलिंगही केले.

    सततच्या कष्टांना यश
    आज राहुलचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. स्वकष्टाने त्याने बीएमडब्ल्यूसारखी महागडी गाडी खरेदी केली आहे. इतकेच नाही, तर त्या गाडीसाठी 14 सीपी 0001 हा नंबरही सर्वांत जास्त किंमत म्हणजेच दहा लाख रुपये इतक्या किमतीला विकत घेतला आहे. कष्टातले सातत्य माणसाला शेवटी यश मिळवून देतेच, याचे राहुल हे उत्तम उदाहरण आहे.

Trending