आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sudhir Gadgil Article About Bal Thackeray On His Second Death Anniversary

मोकळेपणाने बोलणारे, स्पष्टवक्ते असणारे बाळासाहेब ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलाखतीतले बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच्यापेक्षा वेगळे नव्हतेच कधी. एकमेकांशी गप्पा मारल्याच्या आविर्भावात त्यांच्याबरोबरची प्रत्येक मुलाखत रंगली. मोकळेपणाने बोलणारे, स्पष्टवक्ते, एक सुंदर खट्याळपणा तसेच मिश्कील टिप्पणी करणारे, व्यंगचित्रकाराची नजर असलेले असे बाळासाहेब बोलायला लागले की ऐकणारे गुंग होत. अगदी मोकळ्या मनाचा माणूस असल्याने हातचे काही राखून बोलायची त्यांना सवयच नव्हती. बोलता बोलता एखाद्याची फिरकी घेण्याची त्यांची खास लकब मुलाखतीतच काय पण त्यांच्या जुन्या भाषणांमध्येही दिसून येते. महाराष्ट्रात असे फारच थोडे वक्ते होऊन गेले की ज्यांचे बोलणे ओघवते आणि ऐकावेसे असायचे. बाळासाहेब त्यांपैकीच एक फर्डे वक्तृत्व म्हणावे लागेल. त्यांच्या आवाजातला चढउतार, मिश्कील चिमटे आणि भाषेवरील प्रभुत्व यामुळे त्यांच्या बोलायला मजा यायची. माझ्यासकट अनेकांनी त्यांच्या जाहीर, खासगी मुलाखती घेतल्या; मात्र बाळासाहेब या भारदस्त नावाचे दडपण प्रत्येकाच्या मनावर असायचे. अनेक मुलाखतकारांची त्यांना प्रश्न विचारताना घाबरगुंडी उडायची. मात्र हजारोंचे ‘साहेब’ असणा-या त्यांना जर तुम्ही स्वत:बद्दल थोडासा विश्वास निर्माण करून दिलात, तर खुल्या दिलाने ते चक्क गप्पा मारायला सुरुवात करतील, एवढे मात्र खरे होते. माझ्याबद्दल त्यांच्या मनात असाच आपलेपणा निर्माण झाला असावा, ज्यामुळे मी त्यांच्याशी छान संवाद साधू शकत असे. एका मुलाखतीतून निर्माण झालेल्या सुसंवादाच्या धाग्यामुळेच त्यांनी नंतर अनेक आयोजकांना त्यांची मुलाखत घेण्यासाठी माझेच नाव वारंवार सुचवले. त्यामुळे त्यांच्या सलग तीन मुलाखती मी चॅनल्ससाठी घेतल्या होत्या. त्यांची मीडियावर उत्तम पकड होती. काय बोलायचे याचे मुद्दे त्यांच्या मनात पक्के असत आणि मुळात संवाद साधण्याची सवय असल्यामुळे पोपटपंची केल्यासारखी त्यांची मुलाखत कधीच झाली नाही. जसे ते दसरा मेळाव्याला हजारोंच्या संख्येशी संवाद साधत, तसाच संवाद ते निर्जीव कॅमे-यापुढेही साधत.
आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीशीही ते अगदी गप्पा मारल्यासारखे बोलत. ऐकणा-याच्या मनात चटकन शिरायची विद्या त्यांना असावी, असे वाटते. मग ती शिवाजी पार्कवरील सभा असो वा मुलाखत, त्यांच्या बोलण्यातली जादू ऐकणा-याला भारावून टाकायची. बोलण्याच्या बाबतीत जसे ते अपटुडेट असायचे तसेच ते कपड्यांबद्दलही दक्ष असायचे. स्वत:च्या मतांबद्दल ते नेहमी आग्रही असायचे. कोणी त्यांच्या वाटेला गेला की त्याला ते शब्दांचे असे फटकारे मारायचे, की तो गारद होऊन जायचा. पण मुळात मनातून माणसे जोडण्याकडे त्यांचा जास्त कल होता. त्यांनी मुलाखतीत मला अनेकदा सांगितले होते की एकदा प्रबोधनकारांनी त्यांना घराबाहेर नेले आणि दारात असलेल्या चपलांच्या ढिगाकडे बोट दाखवून ते म्हणाले, ‘ही बघ, एवढी माणसं मला भेटायला येतात हीच संपत्ती आहे.’ एकूणच माणसे जपण्याचे बाळकडू त्यांना वडिलांकडूनच मिळाले होते. व्यंगचित्रकाराचे मन असल्यामुळे समोरच्या माणसामधली किंवा घटनेमधली विसंगती त्यांना चटकन कळायची, त्यामुळे त्यावरील त्यांचे भाष्यही तितकेच चटकन येत असे. 22 नोव्हेंबरला मी त्यांची मुलाखत रेकॉर्ड केली त्या वेळी त्यांना मी म्हटले, ‘का नाही व्यंगचित्र काढत? आम्हाला आवडेल तुम्ही पुन्हा हातात ब्रश घेतलेला.’ त्यावर ‘आता हात थरथरतो, पण आतून इच्छा आहे. आता सुरुवात केली की पहिला फटकारा तुझ्यावरच मारतो थांब.’ असे हजरजबाबी उत्तर देऊन माझी गोची केली होती. ‘हा मुलगा वात्रट आहे, प्रश्न विचारतो; पण याचे प्रश्न बोचकारणारे नसतात तर गुदगुल्या करतात,’ असेही त्यांनी म्हटल्याचे आठवते. माझ्यावर त्यांनी मनापासून प्रेम केले, मात्र त्यांच्या मार्मिक टिप्पणीतून मीसुद्धा सुटलो नाही.

मुलाखतीतले बाळासाहेब हे वेगळे नव्हतेच कधी. गप्पा मारल्याच्या आविर्भावात त्यांच्याबरोबरची प्रत्येक मुलाखत रंगली. स्पष्टवक्ते, एक सुंदर खट्याळपणा तसेच मिश्कील टिप्पणी करणारे, व्यंगचित्रकाराची नजर असलेले असे बाळासाहेब बोलायला लागले की ऐकणारे गुंग होत. हातचे काही राखून बोलायची त्यांना सवयच नव्हती. बोलता बोलता एखाद्याची फिरकी घेण्याची त्यांची खास लकब मुलाखतीतच काय पण त्यांच्या जुन्या भाषणांमध्येही दिसून येते.