आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज फेडण्यासाठी आम्ही दिवस-रात्र रक्ताचं पाणी केलं असतं...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शेती पिकवून दोन पैसे मिळतील आणि त्यातूनच पुढे उज्ज्वल भविष्याचा अंकुर फुटेल, या आशेने काही शेतकर्‍यांनी कर्ज काढले. दुर्दैवाने अस्मानी संकटाने शेतीचे वाटोळे झाले. घेतलेले कर्ज फेडण्यासाठीही हाती काही उरले नाही. अशा वेळी यातील काही शेतकर्‍यांनी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला. मरणानंतर वेदना संपतील या भोळ्या आशेनेच त्यांनी जीवनयात्रा संपवली. कदाचित त्यांच्या मरणानंतर त्यांच्या वेदना अबोल झाल्या असतील. पण, त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदना मात्र अधिक तीव्र झाल्या आहेत. कुणाच्या पत्नीला आता दुसर्‍याच्या शेतात राबावं लागत आहे, तर कुणाच्या मुलांवर अक्षरश: रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.

आत्महत्येनंतर कुणाचंही कुटुंब सावरू शकलेलं नाही आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांसाठी नाशिकमधील त्र्यंबकेश्वरजवळ सुरू असलेल्या आधारतीर्थ आश्रमातील मुलांशी ‘दिव्य मराठी’ने जेव्हा संवाद साधला तेव्हा हे विदारक सत्य समोर आलं. परंतु, दुसर्‍याच्या आयुष्यात आता असं दु:ख येऊ नये म्हणून ही मुलं एकत्रितपणे मराठवाड्यात प्रबोधन यात्रा करणार आहेत. या यात्रेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या काही निवडक मुलांची ही चित्तरकथा...

विदर्भात प्रबोधन यात्रा
फेसबुकच्या वॉलवर एकत्र आलेल्या काही संवेदनशील तरुणांनी सोशल नेटवर्किंग फोरमची स्थापना केली आहे. या फोरममार्फत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. हे फोरम आणि आधारतीर्थ आश्रम यांच्या संयुक्त प्रयत्नाने ते १२ जानेवारीदरम्यान मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांना भेटी दिल्या जाणार आहेत. या भेटींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलांचा सहभाग असणार आहे. शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे कसे हाल होतात हे तेथील शेतकर्‍यांना पटवून देण्याचे काम या प्रबोधन यात्रेतून केले जाणार असल्याचे सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड आधारतीर्थचे त्र्यंबक गायकवाड यांनी सांगितले.

भाऊ-बहिणीची व्यथा
बुलढाणा जिल्ह्यातील बोरखेडी गावातील आशा आणि समाधान भाऊसाहेब शेरे हे भाऊ-बहीण. वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर आई खचली आणि काही काळात तिनेही अखेरचा श्वास घेतला. मातृ-पितृ छत्र हरपल्यानंतर हे भाऊ-बहीण रस्त्यावर आले. दोघंही आई- वडिलांच्या आठवणीत आजही रडतात. कर्ज कसेही फेडता आले असते. त्यासाठी आम्हीपण रक्ताचे पाणी केले असते. पण वडिलांनी आत्महत्या करायला नको होती. ते गेले म्हणून आई गेली आणि आई गेली म्हणून आमचा आनंदही हिरावला गेला, असं दोघं हताशपणे सांगतात.
धुळे जिल्ह्यातील वासखडी गावातील ललिता कैलास पवार आठवीत शिकते आहे. तिच्या पाठीशी दोन जुळ्या बहिणी रिद्धी आणि सिद्धी. वडिलांच्या पश्चात आता या दोघींची तिला चिंता असते. असे पोरकेपण अन्य मुलांच्या नशिबी येऊ नये म्हणून ती सांगू इच्छिते की, फक्त एकदा आमचे हाल पाहा. तुमच्या मुलांवर काय बेतू शकते हे जाणून घेण्यासाठी आमच्याशी बाेला. कृपा करून आत्महत्या करू नका. नाही तर आमच्यासारखे तुमचेही कुटुंब रस्त्यावर येईल...
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, काही निवडक मुलांची ही चित्तरकथा...