आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BLOG: नारायण राणेंचा दबदबा संपला? अजितदादांचा विनोद!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर अधिवेशन, 7 डिसेंबर.
पुन्हा नारायण राणेंबद्दलच का लिहितोय या बद्दलचा खुलासा आधीच. राणे यांच्याबद्दल मला कोणताही वैयक्तीक राग, लोभ, आकस नाही. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शुन्यातून पुढे आलेला नेता, कुशल प्रशासक वगैरे म्हणून राणेंबद्दल सर्वसामान्य माणसाला जितका आदर वाटेल तितकाच मलाही तो आहे. त्यांच्याशी आजवर झालेल्या वैयक्तीक भेटींमध्ये त्यांच्याकडून नेहमीच स्नेहाची वागणूक मिळाली आहे. झालंय इतकंच की गेल्या तिन्ही दिवसात मी बहुतांश वेळ विधानपरिषदेतलंच कामकाज कव्हर केलंय. ऐकावं असं बोलणारे वक्ते विधानपरिषदेत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही नाहीत. या वक्त्यांमध्ये राणेंचं नाव आघाडीवर. या एकाच कारणामुळं गेल्या तीन दिवसात राणेंबद्दल दुसऱ्यांदा लिहितोय. गैरसमज नसावा.

राणेंचा दबदबा संपला ?
मुत्सद्दीपणा, सावधगिरी, दोन पावलं पुढं जाण्यासाठी प्रसंगी चार पावलं मागं येण्याचा कावेबाजपणा हे यशस्वी राजकारणासाठी आवश्यक गुण मानले जातात. नारायण राणेंसारख्या ज्येष्ठ नेत्याकडं या गुणांचा बऱ्यापैकी अभाव आहे. राणे फार कॅलक्युलेटेड वागत नाहीत, अशी त्यांच्या चाहत्यांची तक्रार राहिलेली आहे. आक्रमकता आणि कोणालाही शिंगावर घेण्याची वृत्ती हा राणेंच्या राजकारणाचा प्रमुख स्वभाव. मनात येईल ते बोलून टाकण्याच्या सवयीनं अनेकदा ते अडचणीतही येतात. काही संधी त्यांच्यापासून दुरावतात. शिवसेनेत असताना ही \'स्टाईल\' त्यांना शोभून गेली. कॉंग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी बदलायला हवं होतं, शिवसेनेची \'राडा संस्कृती\' कॉंग्रेसमध्ये चालणार नाही, असे सल्ले त्यांना कॉंग्रेसजनांकडून मिळाले. अर्थातच राणे फारसे बदलले नाहीत.

हेही वाचा...BLOG: नारायण राणे का चिडले? बाबुरावांनी ट्रकमध्ये त्यांची गाडी घालून पार केला ओढा!

त्यांच्या आक्रमकतेमुळं आणि विरोधकांना संपवण्यासाठी सर्व ते मार्ग अवलंबवण्याच्या वृत्तीमुळं \"नारायण राणे\" या नावाचा राजकीय वर्तुळात चांगलाच दबदबा होता. राणेंचे विरोधक त्याला \"दहशत\" म्हणतात. राणेंच्या राजकारणावर रक्ताचे डाग असल्याचेही आरोप अनेकदा झाले. राणेविरोधक कायमचे गायब झाल्याच्या तक्रारी झाल्या.

न्यायालयाच्या पातळीवर मात्र हे आरोप कधीही सिद्ध होऊ शकलेले नाहीत. राणेंसंबंधीच्या या चर्चेचा परिणाम ते सभागृहात बोलतानाही नेहमी जाणवायचा. पूर्वी शिवसेनेकडून विधानसभेत मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते पुन्हा कॉंग्रेसकडून मंत्री या नात्याने जेव्हा जेव्हा सभागृहात ते बोलायला उभे राहायचे तेव्हा राणेंना अडवण्याचा, त्यांच्या भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न फारसा व्हायचा नाही. तसा तो झालाच तर राणेंच्या नजरेची जरब किंवा चार-दोन शब्दांनीच समोरचा आमदार गर्भगळीत होऊन खाली बसायचा. बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी राणेंनी वार कसे झेलले, शिवसेना फोडल्यानंतर छगन भुजबळ यांना किती दिवस लपून राहावं लागलं होतं, राणे संतापल्याचे पाहून एखादा आमदार दुरुनच कसा पळून गेला, प्रशासकीय अधिकारी वर्ग राणेंना कसा चळाचळा कापायचा, स्वतः राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर मुंबईतल्या अनेक शाखा प्रमुखांनी पोलिस संरक्षण कसं घेतलं हे आणि यासारखे शेकडो किस्से राजकीय वर्तुळात चवीनं ऐकवले जातात. राणेंचा आदेश पाळण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांची फळी राणेंच्या पाठीशी उत्स्फुर्तपणे उभी असायची. या सगळ्यातून तयार झाला तो राणेंचा प्रचंड दबदबा. त्यांची दहशत, त्यांची जरब, त्यांची पकड.

हेही वाचा...Blog: पुणं \'विद्वानांचं शहर\'

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राणे पराभूत झाले. पुन्हा त्यांनी मुंबईतल्या पोटनिवडणुकीतून विधानसभेत जाण्याचा प्रयत्न केला. या दोन्हीवेळा त्यांना शिवसेनेकडून पराभव स्विकारावा लागला. शेवटी कधी नव्हे ते राणेंना मागच्या दारानं विधानपरिषदेत यावं लागलं. दरम्यानच्या काळात राणेंचंही वय झालंय. प्रकृतीच्या तक्रारी सुरु झाल्यात. राणेंचा \"तो\" दबदबा दिसत नाही. राणेंना पुर्वीसारखाच राग येतो पण त्याची फारशी दखल विरोधक घेत नाहीत. राणेंचं भाषण सुरु असताना अनेकदा त्यांना अडथळे आणले जातात. त्यांना अडवलं जातं. त्यांची वक्तव्यं रेकॉर्डवरुन काढून टाकण्याची मागणी होते.

बुधवारी तर कमालच झाली. पहिल्यांदाच आमदार झालेल्या आणि विधानपरिषदेतला पहिलाच दिवस असलेल्या शिवसेनेच्या तानाजी सावंत यांनी राणे यांचे भाषण अडवत त्यांच्या मुद्द्यांवर आक्षेप घेतला. राजकीयदृष्ट्या सावंतांचं हे कृत्य राजकीयदृष्ट्या त्यांना फायद्याचंच ठरेल. कारण थेट राणेंनाच आव्वाज टाकल्यामुळं शिवसेनेत त्यांची पत लवकर चढेल, शिवाय त्यांना अपेक्षित मतदारसंघातही त्यांची प्रतिमा लवकर तयार होईल. मनसेतून भाजपवासी आलेले प्रविण दरेकर, मुंडे समर्थक सुजितसिंह ठाकूर, भाजपाचे ज्येष्ठ आमदार भाई गिरकर हेसुद्धा राणे यांना अडवताना दिसतात. एवढंच काय विधानपरिषदेतील सभागृह नेते असणाऱ्या शांत प्रकृतीच्या चंद्रकांत पाटील यांनीही राणेंना \"विषयावर बोला,\" अशी सूचना सौम्यपणे केली.
राणेंना कॉंग्रेसअंतर्गत फारसे समर्थक नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदारसुद्धा राणेंच्या फार वाटेला जात नाहीत. राणेंकडं सत्ता नाही. दुसरीकडं भाजप-शिवसेना राज्यात-केंद्रात दोन्हीकडं सत्तेत आहे. साहजिकच त्यांचं धैर्य वाढलं आहे. परिणामी राणेंना अपेक्षित नसलेला विरोध त्यांना आता वारंवार सहन करावा लागतोय. दोन पराभव स्विकारल्यानंतर राणे विधानपरिषदेत आल्यापासूनचं त्यांचं हे दुसरं अधिवेशन आहे. दोन्ही अधिवेशनात राणेंची ती परिचीत \"दहशत\" पुर्वीसारखी उरली नसल्याचं प्रकर्षानं दिसलं. आपल्या मुद्द्यांवर वारंवार आक्षेप घेतला जात असल्याचं पाहून अडथळे आणणाऱ्यांना उद्देशून राणेंनी शेवटी कॉंमेट केली. ते म्हणाले, \"इथं मार्क मिळतात. बोलताना दहावेळा सीएमचे मार्क घेतले की पाच मार्क मिळतात. दहावेळा पीएमचं नाव घेतलं की शंभर मार्क मिळतात. मग पुढच्यावेळी वर्णी लागते.\" आहे ना गंमत. आता राणेंनासुद्धा कितीवेळा सोनिया आणि राहुल गांधींचं नाव घ्यावं लागतं? असो. राजकारणातले दिवस सारखे नसतात. संयम दाखवावा लागतो. राणेंकडे नेमका तोच कमी आहे.

पुढील स्लाइडवर वाचा...अजितदादांचा विनोद !

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...