आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sukrut Karandikar About On Maharashtra Politics After Vidhan Parishad Election

पवारांचा पराभव, काँग्रेसची सुटका, सत्ताधाऱ्यांत फूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वच्या सर्व आठ जागांचे निकाल विरोधात गेले असते, तरी विधान परिषदेतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का लागणार नव्हता. मुद्दा होता तो फक्त राजकीय धक्का देण्याचा. सत्ताधाऱ्यांना यात मर्यादित यश मिळाले.

विधान परिषदेच्या आठ जागांसाठीची निवडणूक जाहीर झाली यात देवेंद्र फडणवीस कोणते राजकीय डावपेच खेळणार याची उत्सूकता होती. विधान परिषदेच्या आठ जागांसाठी नगरपालिका आणि महापालिकांमधल्या प्रतिनिधींनी मतदान केले. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमधली पक्षनिहाय ताकद निवडणुकीपूर्वीच स्पष्ट असल्याने निकाल काय लागतील, याचा कागदोपत्री अंदाज बांधणे सोपे होते. धक्कादायक निकालांची अपेक्षा होती. घडलेही तसेच. ‘राष्ट्रवादी’ने सोलापूरची जागा प्रतिष्ठेची केली. काँग्रेससाठी कोल्हापूरचा सामना अटीतटीचा ठरला. सत्ताधारी शिवसेनेने मुंबईत दगाफटका होऊ नये यावर लक्ष केंद्रित केले. नागपूरची जागा बिनविरोध जिंकण्यात यशस्वी झालेल्या भाजपने मुंबईत चमत्कार घडवण्याचा प्रयत्न केला.
पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणाचा आणि सामाजिक समीकरणांचा बाज पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मनापासून एकत्र लढले तर येथे त्यांना पराभूत करणे दुरापास्त होते. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव काँग्रेसच करू शकते. या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजप-सेना पुरस्कृत प्रशांत परिचारक यांनी दीपक साळुंखे यांना अस्मान दाखवल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला पडलेले भगदाड दिसून आले. हा पराभव ‘राष्ट्रवादी’च्या नेतृत्वाला जिव्हारी लागणारा ठरला. सोलापुरातली ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ची एकत्रित ताकद पाहता परिचारक हरणारी लढाई लढत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक उपाध्यक्ष आणि सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक ऊर्फ पंत हे प्रशांत यांचे काका. या पंतांची पुण्याई हीच काय ती प्रशांत परिचारक यांच्या जमेची बाजू होती. सोलापुरातील ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यापासून ते विष्णुपंत कोठे, सिद्धराम म्हेत्रे, राजन पाटील आदी सर्वांशी पंतांचे दीर्घकाळपासूनचे व्यक्तिगत संबंध आहेत. पंढरपूर तालुक्याचे त्यांनी दीर्घकाळ नेतृत्व केले आहे. ‘पंढरपूरची वीट हलली,’ अशा गमतीदार शब्दांत सुशीलकुमार शिंदे सुधाकरपंतांच्या राजकीय खेळ्यांचे वर्णन करतात. या वेळी पंढरपूरची वीट पुतण्यासाठी हलली. पुतण्याच्या विजयासाठी पंतांनी जिल्हाभर जपलेली राजकीय पुण्याई खर्ची घातली. स्वतः प्रशांत यांनी गेल्या दशकभरापासून जाणीवपूर्वक वाढवलेल्या संपर्काचाही त्यांना फायदा झाला.

शरद पवारांच्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत सोलापूर जिल्ह्याने त्यांना नेहमीच साथ दिली. ‘पवार बोले, जिल्हा हाले’ अशी या जिल्ह्याची राजकीय अवस्था राहिली आहे, परंतु दुसऱ्या फळीतल्या ‘राष्ट्रवादी’च्या राज्यस्तरीय नेतृत्वाला तशी ताकद दाखवता आलेली नाही. अन्यथा अजित पवारांनी सोलापुरात तळ ठोकल्यानंतरही ‘राष्ट्रवादी’ला सपाटून मार खावा लागला नसता. स्थानिकांना विश्वासात न घेता उमेदवार लादायचा ऐनवेळी येऊन दमबाजी करायची, हे कार्यकर्ते दरवेळी चालवून घेतीलच असे नाही, हा धडाच ‘राष्ट्रवादी’च्या स्थानिक प्रतिनिधींनी दिला. माढ्याचे नेतृत्व संजय शिंदे यांनी सोलापुरी हिसका दाखवल्याची रसभरीत चर्चा रंगते. सोलापूर काँग्रेसने तर अजित पवारांचे नेतृत्व सपशेलच धुडकावले. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, पालकमंत्री विजय देशमुख यांचे कष्टही परिचारकांच्या कामी आले. एकतर्फी विजयाची आशा बाळगणाऱ्या लढतीत ‘राष्ट्रवादी’ला पराभव पचवावा लागला.

कोल्हापुरात हीच वेळ महादेवराव महाडिकांवर आली. दोन दशकांपासून कोल्हापुरात वर्चस्व राखलेल्या महाडिकांना काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी अस्मान दाखवले. ‘राष्ट्रवादी’चे हसन मुश्रीफ, ‘जनसुराज्य’चे विनय कोरे यांच्याबरोबरची महापालिका निवडणुकीपासूनची एकी टिकवून ठेवण्यात सतेज पाटील यशस्वी झाले. काँग्रेसची अधिकृत उमेदवारी मिळवण्यात महाडिक अयशस्वी झाले, तेव्हाच त्यांचा पहिला पराभव झाला. मात्र, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जोडीने पुन्हा विधान परिषदेची पायरी चढता येईल, असे महाडिकांना वाटले. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना अशा सर्वच पक्षांशी कधी ना कधी साटेलोटे ठेवणाऱ्या महाडिकांचे राजकारण या वेळी चालले नाही. महापालिकेतील पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांना दुसऱ्यांदा महाडिकांसोबत पराभूत व्हावे लागले. यासंदर्भात सतेज पाटील यांची विजयानंतरची प्रतिक्रिया पाटलांनी लक्षात घेण्यासारखी आहे. ते म्हणाले,“चंद्रकांत पाटील साधे आहेत. ते सत्तेत असल्याने गुळाच्या ढेपेला मुंगळे लागावेत तसे त्यांच्या अवतीभोवती अनेक जण गोळा होत आहेत. मात्र, ढेपेला मुंगळे लागतात तेव्हा मुंगळ्यांचे काहीच नुकसान होत नाही; पण ढेप संपत जाते.” कोल्हापुरातील भाजपच्या राजकारणाची फेरमांडणी करताना पाटील यांना ही प्रतिक्रिया लक्षात ठेवावी लागेल.

अकोला-बुलडाण्यात शिवसेनेच्या गोपीकिशन बाजोरिया आणि धुळ्यात काँग्रेसच्या अमरीशभाई पटेल यांनी सहज विजय मिळवले. काँग्रेसची बंडखोरी वेळेत शमल्यामुळे नगरमध्ये ‘राष्ट्रवादी’च्या अरुण जगताप यांना अडचण आली नाही. नागपुरातदेखील गिरीश व्यास या भाजपच्या जुन्या कार्यकर्त्याला दमडीही खर्च न करता बिनविरोध आमदारकी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे दोघेही नागपुरातले असल्याने व्यास यांचा विजय ‘पक्षा’चा मानला गेला. मुंबईतली दुसरी जागा जिंकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रसाद लाड यांच्यासाठी मोर्चेबांधणी केली. शिवसेनेची साथ लाभली असती तर मुंबईतल्या दोन्ही जागा भाजप-सेना युतीकडे आल्या असत्या; परंतु शिवसेनेने मुख्यमंत्र्यांचे मनसुबे उधळून लावले आणि काँग्रेसचा होणारा पराभव टळला.

निवडणुकीनंतर एकूण ७८ जागांच्या विधान परिषदेत भाजपचे बळ दोनने वाढून चौदावर गेले. शिवसेनेच्या सात जागा झाल्या. ‘राष्ट्रवादी’ २८, तर काँग्रेस २० जागांवर आहे. दोन्ही काँग्रेसने प्रत्येकी एक जागा गमावूनही त्यांचे एकत्रित संख्याबळ ४८ आहे. त्यामुळे आताच्या आठ निकालांमुळे परिषदेतल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का लागलेला नाही. विधान परिषद सुरळीत चालवण्यासाठी भाजपला ‘राष्ट्रवादी’सोबतची मैत्री टिकवावीच लागेल. स्थानिक कार्यकर्त्यांमधल्या साठमारीनंतर राजधानीतल्या नेतृत्वाला साटेलोट्याची तयारी ठेवावी लागेल.