आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवशक्ती संगम : शक्तिप्रदर्शन की मार्गहीन दर्शन?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वपक्ष सत्तेत असल्याने निश्चित कार्यक्रमाची वाट दाखवण्याची नामी संधी दुष्काळी महाराष्ट्रात बाेलणाऱ्या भागवतांपुढे हाेती. गणवेशधारी मंत्र्यांना युक्तीच्या चार गाेष्टी सांगायला हव्या हाेत्या, समाजकारणाची भाषा बाेलणाऱ्या संघाच्या नेतृत्वाने शहरीकरणातून निर्माण झालेल्या समस्यांवर भाष्य करणे अपेक्षित हाेते. त्यांची गाडी हिंदू राष्ट्र, हिंदू एकतेच्या पुढे सरकली नाही.

बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी, नरेंद्र मोदी, राज ठाकरे आदी नेत्यांच्या सभांना लाखाहून अधिक लोकांची गर्दी अलीकडच्या दशकात महाराष्ट्राने अनेकदा पाहिली. ऐंशीच्या दशकात शरद जोशींच्या सभांना लाखोंनी माणसे जमत. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या अाध्यात्मिक कार्यक्रमांना लाखो जण येत. गर्दीचे अप्रूप महाराष्ट्राला असण्याचे कारण नाही. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांच्या सभा-मोर्चांचा आकडा लाखाच्या पुढेच असतो. तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘शिवशक्ती संगम’ मेळाव्याला जमलेल्या गर्दीची फार चर्चा झाली. सोशल मीडियातून या गर्दीची छायाचित्रे ‘व्हायरल’ होत आहेत. वास्तविक केंद्रात, राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संघाला गर्दी जमवता आली नसती तरच नवल ठरले असते. पुणे, पिंपरी-चिंचवड या साठ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या दोन शहरातलेच चाळीस हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक मेळाव्याला होते. याशिवाय सहा जिल्ह्यांमधल्या शेकडो गावांमधून वाहनांची व्यवस्था होती.

संघाची गर्दी लोकांच्या लक्षात राहिली कारण खाकी चड्डी-पांढरा सदरा या गणवेशातल्या स्वयंसेवकांची संख्याच लाखाहून अधिक होती. आखून दिलेल्या जागेतच होणाऱ्या त्यांच्या शिस्तबद्ध हालचाली, कवायती, घोषवादन, या सगळ्या रचनेची सरसंघचालक मोहन भागवत यांनी उघड्या वाहनातून केलेली पाहणी वगैरे संघाची नेहमीची आन्हिके सैनिकी थाटाची होती. शिस्तबद्ध गर्दी पाहणे हे कुतूहल होते. त्यामुळे शिवशक्ती संगमाला हौशा, नवशा प्रेक्षकांनीही भरपूर गर्दी केली. या पार्श्वभूमीवर मेळाव्यातल्या गर्दीबाबत फार आश्चर्य वाटून घ्यावे असे काही नाही.

पुण्यातल्या मेळाव्याची तयारी वर्षभरापूर्वीपासून सुरू होती. गुगल मॅपचा वापर करून पुणे परिसरातल्या जवळपास १८० मोकळ्या जागांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. रेसकोर्सच्या सुमारे ९२ एकरांच्या मैदानाचा विचार झाला. मात्र घोडे दौडण्याचा ‘ट्रॅक’ त्या ठिकाणच्या इतर इमारती पाहता सभास्थान आणि परगावाहून येणाऱ्या वाहनांसाठी जागा अपुरी पडली असती. अखेरीस हिंजवडी परिसरात सलग एका ठिकाणी असलेली साडेचारशे एकरांची जागा पर्याय म्हणून पुढे आली. मुंबई-पुणे महामार्गानजीकची ही जागा प्रामुख्याने सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिककडून येणाऱ्या वाहनांसाठी सोयीची होती. मुबलक जागा आणि परगावच्या लोकांना येण्यासाठीची सुलभता या दोन निकषांवर हिंजवडी गावाजवळच्या मारुंजी परिसराची निवड झाली. मात्र यामागेसुद्धा संघाचे ‘विशेष डोके’ असल्याचा शोध काहींनी लावला. संघाच्या बौद्धिक क्षमतेबद्दलचा अवास्तव कल्पनाविस्तार, एवढेच त्याचे वर्णन करावे लागेल.

संघाचे असे मेळावे देशाच्या सर्व भागांत नियमित अंतराने होत असतात. गेल्या वर्षी अाैरंगाबाद येथे असेच शक्तिप्रदर्शन झाले हाेते. त्यानंतर या स्वरूपाचे शक्तिप्रदर्शन पहिल्यांदाच झाले. कोणत्याही संघटनेच्या-पक्षाच्या कार्यक्षमतेची आणि जिवंतपणाची चाचणी घेण्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक असतात. या मेळाव्याच्या निमित्ताने ‘संघाची यंत्रणा’ तत्पर असल्याचे सिद्ध झाले. त्याहून महत्त्वाचे म्हणजे समाजाच्या सर्व थरांमध्ये संघ झिरपत असल्याचेही पाहण्यास मिळाले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी हा मेळावा झाला. त्यांना वंदन करण्यास भागवत विसरले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांना संघाने यापूर्वीच गुरुपद दिलेले आहे. मात्र आशीर्वाद देणारे शिवाजींचे भव्य छायाचित्र हे व्यासपीठावरचे नेपथ्य खास संदेश देणारे होते. जातपात पाहता ‘हिंदू’ म्हणून एकत्र या, या संघमताचा पुनरुच्चार भागवतांनी केला. राष्ट्रवादाने भारलेल्या तरुण पिढीला आकर्षित करून घेण्यासाठी संघाचे शिस्तबद्ध, आधुनिक शक्तिप्रदर्शन कामी आले. शिवशक्ती संगमाच्या माध्यमातून संघाने हवे असलेले ईप्सित साध्य केले. संघटन बळकट असल्याची खात्री संघाला झाली.

इंटरनेटमुळे गर्दी आणि सभास्थान हे मुद्दे आता खरे तर अनाठायी किंवा कमी महत्त्वाचे ठरू लागले आहेत. सोशल मीडियावरची एखादी प्रतिक्रिया, एखादी मोहीमसुद्धा प्रचंड मोठी क्रांती घडवते, हे इजिप्तने जगाला दाखवून दिले. तरीही संघाला पारंपरिक मार्गाने शक्तिप्रदर्शन करावेसे का वाटावे, हा खरा चर्चेचा मुद्दा आहे. भागवतांच्या पंचेचाळीस मिनिटांच्या भाषणासाठी कोट्यवधी रुपयांच्या चुराड्याचा खटाटोप का केला गेला? हे प्रश्न संघाच्या शक्तिप्रदर्शनानंतर विचारले जात आहेत. संघाची चिकाटी, निरलस सेवावृत्ती सर्वश्रुत आहे. स्वपक्ष सत्तेत असल्यामुळेच संघाच्या शक्तीला निश्चित कार्यक्रमाची उदा. जनधन याेजना, मुद्रा बँकेच्या माध्यमातून गरजूंना साहाय्य करण्याची वाट दाखवण्याची नामी संधी दुष्काळी महाराष्ट्रात बोलणाऱ्या भागवतांपुढे होती. गर्दीत बसलेल्या मुख्यमंत्र्यांना आणि अनेक गणवेशधारी मंत्र्यांना युक्तीच्या चार गोष्टी सांगता आल्या असत्या. बेरोजगारी, शेती आणि पाण्याचा प्रश्न सध्याच्या महाराष्ट्राला अधिक महत्त्वाचा आहे. मात्र शिवाजीराजांच्या छायाचित्रापुढे बोलताना प्रजादक्षतेचा भाव या ‘भागवत पुराणा’त दिसला नाही. समाजकारणाची भाषा बोलणाऱ्या संघाच्या नेतृत्वाने शहरीकरणातून निर्माण झालेल्या समस्यांवर भाष्य केले नाही. त्यांची गाडी हिंदू राष्ट्र आणि हिंदू एकतेच्या पुढे सरकली नाही.

भगव्या ध्वजाला गुरू मानणाऱ्या संघाने हिंदू धर्माच्या झेंड्याखाली पुण्यात केलेल्या विराट संघटनाची दखल चीन-पाकिस्तानपासून आखातातल्या मुस्लिम देशांपर्यंत आणि जपानपासून युरोप-अमेरिकेपर्यंतच्या अनेक प्रसारमाध्यमांनी आवर्जून घेतली. यापूर्वी अशी मेळाव्यांची दखल घेतली जात नव्हती कारण संघ सत्तेवर नव्हता. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या पंतप्रधानांवर संघाचा वरदहस्त आहे. त्यामुळेच संघाचा हिंदू राष्ट्रवाद आणि भारतीय लोकशाही हातात हात घालून वाटचाल करणार का, याचा वेध घेण्याची उत्सुकता जगाला आहे. भारतभूमीला माता मानणारे आणि शेकडो वर्षांपासून याच मातीत राहणारे मुस्लिम, बौद्ध, शीख, जैन, ख्रिश्चन, पारशी हे अल्पसंख्याकसुद्धा हिंदूच असल्याची संघाची भूमिका आहे. संघाच्या व्यापक स्वीकारार्हतेमधला नेमका अडसरसुद्धा हाच आहे. शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून स्वतःला हिंदू मानणाऱ्यांची संख्या वाढवत न्यायची आणि देशाचे रूपांतर अधिकृतपणे ‘हिंदू राष्ट्रा’त करायचे, हे संघाचे अंतिम ध्येय आहे. पुण्यातला मेळावा त्या ध्येयपूर्तीकडे टाकलेले छोटे पण चिकाटीचे पाऊल होते. राजकीय ताकद वाढलेल्या भाजपच्या ‘सर्वतोपरी’ साहाय्याने अशी पावले देशभर टाकली जातील.