आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंदमान-निकोबारच्या ‘काळ्या पाण्या’वर एकतेचे तरंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगालच्या उपसागरातील अंदमान-निकोबार बेटांची माळ भारताचा अविभाज्य भाग असल्याची कल्पना फार थोडक्यांना आहे. अनेकांच्या अखंड भारत वर्णनाची उडी ‘काश्मीर से कन्याकुमारी तक’च्या पुढे जात नाही. आम्हाला विसरू नका. ‘काश्मीर से निकोबार तक’ म्हणा, असे येथील तरुण सांगतो, तो त्यामुळेच. अंदमान-निकोबार भारतात असल्याबद्दलची शंका असली तरी कोलकात्यापासून साडेबाराशे आणि चेन्नईपासून ११९० किलोमीटर सागरी अंतरावरचे ‘पोर्ट ब्लेअर’ आणि याच शहरातले ‘सेल्युलर जेल’ अनेकांना माहिती असते. सेल्युलर जेलपेक्षाही ‘काळे पाणी’ हा शब्द आठवतोच. अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत या दोन शब्दांनी दहशत माजवली होती. वास्तविक, अंदमान-निकोबार द्वीपसमूहाभोवतीचा समुद्र नितळ निळा आणि कमालीचा सुंदर आहे. ‘येथे येणारा जिवंत परतत नसतो,’ हा लौकिक ब्रिटिशांनी मिळवून दिला आणि ‘काळ्या पाण्या’ची भीती वाक्प्रचारच बनली. इंग्लंडमधल्या राजकीय कैद्यांना, गुन्हेगारांना ब्रिटिश ऑस्ट्रेलियात नेऊन सोडत. त्याचप्रमाणे ‘युनियन जॅक’ला आव्हान देणार्‍या भारतीय क्रांतिवीरांना आणि येथील इतर गुन्हेगारांना भारतापासून तोडण्यासाठी ‘काळ्या पाण्या’वर धाडले जात असे.

ब्रिटिशांच्या आधी दक्षिणेतल्या राजांनी अंदमान-निकोबारवर सत्ता गाजवल्याचे दाखले आहेत. ‘अंदमान’चा संदर्भ तर थेट रामायणातील हनुमानाशी जोडतात. हनुमानचे ‘हन्दुमान’ आणि पुढे ‘अंदमान’ झाले. निकोबारचा इतिहास चौल राजवटीपर्यंत मागे नेतात. चौलांच्या अधिपत्याखाली ‘नक्कवरम’ नाव असलेली बेटे कालौघात निकोबार झाली. स्थानिकांकडून ऐकायला मिळालेली अंदमान-निकोबार या नावाची उत्पत्ती अशी आहे. मधल्या कालखंडात ही बेटे दुर्लक्षित होती. ब्रिटिशांमुळे येथील राबता वाढला. ब्रिटिशांची जहाजे या बेटांना लागली तेव्हा त्यांना अंदमानी, ओंगी, जारवा, सेंटिनलीज, निकोबारी, शाँपेन या आदिम-आदिवासींचा सामना करावा लागला. आदिवासींचे भाले-बाण ब्रिटिशांच्या तोफा-बंदुकांपुढे टिकण्याची सूतराम शक्यता नव्हतीच. ब्रिटिशांनी त्यांना हव्या असलेल्या बेटांवरून आदिवासींना सहजी हुसकावले. ब्रिटिशांच्या सेवेसाठी ‘मेनलँड’हून भारतीय मजुरांची आयात सुरू झाली. सन १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याने ब्रिटिशांना हादरवले. या लढ्यातल्या दोनशे स्वातंत्र्यसैनिकांची पहिली तुकडी १० मार्च १८५८ या दिवशी अंदमानात आणली. ‘काळ्या पाण्या’ची हिंदुस्थानला बसलेली ही पहिली दहशत होती. १९०६ मध्ये सेल्युलर जेलचे काम पूर्ण झाल्यानंतर भारतीय उपखंडातील इतर गुन्हेगारांनाही काळ्या पाण्यावर पाठवले जाऊ लागले.

औरंगाबाद जिल्ह्यापेक्षा थोड्या कमी म्हणजे सव्वाआठ हजार चौरस किलोमीटर आकारमानाच्या एकूण ५७२ बेटांपैकी फक्त ३७ बेटांवर वस्ती आहे. जेमतेम चार लाख लोक आज येथे राहतात. यात मूळ आदिवासींची संख्या २७ हजार. तिन्ही सैन्यदले, बँका, सरकारी कार्यालये, व्यापारी जलवाहतूक आदींच्या निमित्ताने अंदमान-निकोबारातल्या अस्थायी लोकसंख्येचे (फ्लोटिंग पॉप्युलेशन) प्रमाण लक्षणीय आहे. स्थानिकांशी बोलताना ‘हमारे परदादा यहाँ कैदी थे,’ असे उत्तर अनेकांकडून ऐकायला मिळते. काळ्या पाण्याच्या शिक्षेवर आलेल्यांचे वारस मोठ्या संख्येने येथे आहेत. लोकसंख्येचा दुसरा मोठा घटक आहे माजी सैनिकांच्या वारसांचा. अंदमान-निकोबारच्या लष्करी महत्त्वामुळे स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने जाणीवपूर्वक येथील वस्ती वाढवली. अंदमानातली मराठी कुटुंबे माजी सैनिकांची आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातली ५०-६० कुटुंबे १९७४ मध्ये येथे आली. त्यातील ३४-३५ कुटुंबे आजअखेरपर्यंत तगली आहेत.

जे मराठी कुटुंबांचे, तेच इतर प्रदेशातल्या माजी सैनिकांचे. कानडी, तामिळ, तेलुगू, बंगाली, आसामी, बिहारी, पंजाबी असे सगळीकडून लोक अंदमान-निकोबारमध्ये आले. भौगोलिक जवळिकीतेमुळे बंगाली आणि दाक्षिणात्यांचे प्रमाण साहजिकच जास्त असले, तरी अंदमान-निकोबारची खरी ओळख ‘छोटा भारत’ हीच आहे. या भारताची सार्वजनिक भाषा हिंदी आणि इंग्रजी. ‘मेनलँड’लाही हेवा वाटावा, अशी अनुकरणीय बाब अंदमान-निकोबारात आहे ती म्हणजे सामाजिक समरसता. प्रादेशिक, धार्मिक आणि जातीय भेदांच्या ओंगळवाण्या स्पर्शाने येथील संस्कृती अजून विटाळलेली नाही. अनेकांचे पूर्वज कैदी म्हणून आले. १८६० नंतर महिला कैद्यांनाही ब्रिटिशांनी ‘काळ्या पाण्या’वर धाडले. शिक्षा भोगलेल्या स्त्री-पुरुषांची लग्ने ब्रिटिशांनीच लावली. त्या वेळी धर्म, प्रांत विचारण्याचा प्रश्नच नव्हता. पूर्वाश्रमीच्या कैदी जोडप्यांना अंदमानातच स्थायिक होण्यास भाग पाडण्यात आले.
ब्रिटिशांच्या माघारी पसंतीने लग्ने होऊ लागली; पण तोवरच्या ऐंशी वर्षांत पुरती सरमिसळ झाली होती. त्यामुळे ब्रिटिश गेल्यानंतरही फक्त ‘मुलगा आणि मुलगी’ याच निकषावर लग्ने लावण्याची पद्धत टिकून राहिली.

अतिवृष्टी, चक्रीवादळे, भूकंप या नैसर्गिक संकटांच्या न संपणार्‍या मालिकेत जगताना माणसाला धरून राहणे, ही येथील प्राथमिक गरज आहे. २००४ च्या सुनामीने येथील मनांमध्ये कायमची धास्ती रुजवली. बाहेरून येऊन सहसा कोणी येथे स्थिरावत नाही आणि स्थानिकांमधले उच्चशिक्षित येथे थांबत नाहीत. परिणामी, लोकसंख्या मर्यादित. स्वजातीय, स्वधर्मीय वधू-वरांच्या जोड्या जमवायच्या कशा? सून मुस्लिम, जावई ख्रिश्चन, सासरे हिंदू, सासू बहाई अशी सरमिसळ येथील घराघरांमध्ये नांदते. मंदिर, मशीद, बुद्धविहार, चर्च अंदमानात आहेतच; पण घरात एकच धर्म पाळण्याची सवय स्थानिकांना नाही. अलीकडे ब्रॉडबँड, इंटरनेट आणि डिश टीव्हीच्या माध्यमातून ‘मेनलँड’च नव्हे, तर जगभरातली विकृती अंदमानच्या सुशेगात वातावरणात घुसते आहे. विकास, प्रगती आणि माणूसपणाच्या व्याख्या बदलत आहेत. ‘मेनलँड’वरच्या जातीय-धार्मिक तणाव, विद्वेषापासून अंदमान सध्या तरी दूर असले तरी हे चित्र कधीपर्यंत टिकणार याचीच भीती आहे.

सुकृत करंदीकर, प्रतिनिधी, पुणे