आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sukrut Karandikar Article About On Mahayuti In Maharashtra

महायुतीला मित्रांचे ओझे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभेसाठी केलेली मैत्री विधानसभा लढवताना भाजप-सेनेसाठी डोकेदुखी ठरली आहे. भाजप-सेनेचे मित्र जागावाटपात कोणत्या तडजोडी स्वीकारतात, यावरून त्यांचा संघर्ष वैयक्तिक लाभासाठी की तत्त्वांसाठी हेही स्पष्ट होईल.
लोकसभा निवडणूक जिंकायचीच, या इर्षेने पेटलेल्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी रामदास आठवले (आरपीआय), राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना), विनायक मेटे (शिवसंग्राम), महादेव जानकर (स्वतंत्र भारत पक्ष) असे नवे मित्र जोडले. मुंडे यांच्या या प्रयत्नांमागे सामाजिक, प्रादेशिक गणिते होती. युतीपासून फटकून असणारी दलित मतांची पेढी आठवले यांच्या रुपाने त्यांना फोडायची होती. काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग राजू शेट्टी यांच्यामुळे युतीकडे वळेल, हा मुंडेंचा होरा होता. महादेव जानकर आणि विनायक मेटे यांचा वापर ठरावीक जातींचे प्रतिनिधित्व दाखवण्यासाठी होणार होता. ही सगळी समीकरणे लोकसभा निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वी मुंडे यांनी जुळवून आणली होती. मतदारांच्या मनात काय चालले आहे, याचा नेमका अंदाज त्यावेळी कोणालाच नव्हता. प्रत्यक्ष निकालानंतर महाराष्ट्रात अभूतपूर्व मोदी लाट दिसून आली. कधी न जिंकलेल्या जागासुद्धा महायुतीच्या उमेदवारांनी विक्रमी मताधिक्याने जिंकल्या. देशातले काँग्रेस आघाडी सरकार घालवायचेच, असा स्पष्ट कौल महाराष्ट्रातल्या जनतेने घेतला. केंद्रात प्रथमच भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले. या ‘स्वबळा'मुळे अडीच दशकांहून जुना मित्र असलेल्या शिवसेनेचीही अडचण भाजपला वाटू लागली; तिथे या कालपरवाच्या मित्रांचे काय घेऊन बसता? मतदार बदल घडवणारच होते याचा अंदाज आधीच लागला असता तर इतक्या पक्षांची मोट बांधली नसती, असे भाजप नेते खासगीत कुजबुजू लागले. कारण लोकसभेनंतरचे त्यांचे लक्ष्य विधानसभा आहे. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतल्या जागावाटपाचा पेच तणावापर्यंत जाऊन पोहोचला आहे. म्हणूनच तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पहिली यादी जाहीर करतो, असे सांगणाऱ्या युतीला जागावाटपाची प्राथमिक यादीसुद्धा झालेली नाही. लोकसभा निकालांनी जागावाटपाचे संदर्भच बदलले. केंद्राप्रमाणे राज्यातले आघाडी सरकार जाणार, अशी चिन्हे आता केवळ विरोधकांनाच नव्हे तर सत्ताधाऱ्यांनाही दिसताहेत. सत्ताधारी मंत्र्यांची खासगीतील देहबोली आणि भाषा पराभूत मनोवृत्तीचे दर्शन घडवणारी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे तालुका-जिल्हा स्तरावरचे अनेक शिलेदार भाजप-शिवसेनेच्या वळचणीला जाऊन जागा शोधू लागले आहेत. स्थानिक पातळीवर ताकद असणाऱ्या या मातब्बर मंडळींना सामावून घ्यायचे, पक्षातील निष्ठावंतांना न्याय द्यायचा आणि पुन्हा महायुतीतल्या सहा मित्रांची काळजी करायची, असा तिहेरी पेच निर्माण झाला आहे. मोठी अडचण कोणाची असेल तर महायुतीतल्या छोट्या घटक पक्षांची. रिपाइं, शिवसंग्राम, शेतकरी संघटना आणि जानकरांचा पक्ष या सर्वांनी मिळून सुमारे ऐंशी जागांची मागणी केली आहे. एकूण 288 पैकी ऐंशी जागा मित्रपक्षांना सोडल्यावर मग उरलेल्या 200-220 जागांचे वाटप कोणत्या सूत्रावर करायचे, हा प्रश्न जटिल आहे. तब्बल पंधरा वर्षांनी सत्ता मिळण्याचे संकेत मिळू लागल्याने भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री कोण, ही स्पर्धा रंगली आहे. ‘ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री', ‘महायुतीतले सगळे घटकपक्ष मिळून ठरवतील तो मुख्यमंत्री', ‘अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेऊ', अशा सूत्रांची मांडणी होत आहे. मूळच्या युतीमध्येच मुख्यमंत्रिपदाची रस्सीखेच सुरु असल्याने मित्रपक्षांचे ओझे जड होऊ लागले आहे. कोणाच्या कोट्यातून कोणत्या मित्रांना जागा सोडायच्या हा निर्णय होत नसल्याने आठवले-शेट्टी आणि मेटे-जानकर यांची चलबिचल वाढली आहे. वास्तविक रामदास आठवले आणि राजू शेट्टी हे दोन नेते व त्यांच्या संघटनेमागे जितके जनमत आहे त्या तुलनेत मेटे-जानकर यांची ताकद किती, हा युतीपुढचा प्रश्न आहे. आठवले यांनी मुंबईतल्या मोक्याच्या जागा मागितल्याने शिवसेनेची गोची झाली आहे. तुलनेने शेट्टी यांना जागा देण्यात भाजप-सेनेला फारशा अडचणी येणार नाहीत. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यात भाजप-सेनेची ताकद मुळातच कमी आहे. शेट्टी यांना याच भागात उमेदवार उभे करायचे आहेत. महाराष्ट्रातल्या दोन जातींच्या नेतृत्वाचा दावा असणाऱ्या मेटे-जानकर यांच्यामागे किती पाठबळ आहे, याची मूठ झाकलेली आहे. त्यामुळेच किती वाटा द्यायचा, याचा निर्णय झालेला नाही. विधान परिषदेची आमदारकी किंवा सत्ता आल्यानंतर कोठेतरी वर्णी लावण्याची हमी देऊन या नेत्यांची समजूत काढता येईल का, असा प्रयत्न भाजप-सेनेकडून सुरु आहे.