आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिलशहाच्या राजधानीतून... (ब्लॉग)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेगवगेळ्या कारणांमुळं तीनदा तुर्कस्थानात इस्तांबुलला जाऊन आलो. इझमीर, अंकारा, अंतालया आणि इस्तांबुलमधून फिरताना प्रत्येकवेळी माझ्या मनाच्या कोपऱ्यात आदिलशहा हटकून असायचाच. इस्तांबुलमधली भव्य ‘ब्ल्यू मॉस्क’ पाहतानाही मला आठवला होता तो विजापुरचा गोलघुमट.
 
इयत्ता दुसरीत आमच्या शाळेच्या सहलीच्या निमित्तानं मी पहिल्यांदा विजापुरला गेलो होतो. माझं गाव कर्नाटकच्या सीमेवर. विजापुर माझ्या गावापासून शंभर किलोमीटरसुद्धा नाही. तेव्हा ‘गोल घुमटा’ची लयबद्ध, अवाढव्य गोलाई आणि त्या गोल घुमटात गुंजणाऱ्या प्रतिध्वनींचा जबरदस्त ठसा मनावर उमटला होता. अशाच न कळत्या वयात आणखी एकदा विजापुरला जाणं झालं. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी आजच गेलो. कर्नाटक सरकारनं विजापुरचं नामकरण आता 'विजयपुरा' असं केलंय. या विजयपुराला इतिहासात स्थान मिळवून देणारा युसूफ आदिलशहा चौदाव्या शतकात इस्तांबुलमध्ये जन्माला आला होता.
 
लढवय्या असणार, पण गुलाम म्हणून विकला गेला. पर्शियाच्या आक्रमक टोळ्यांबरोबर हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवर तो आला. तिथून तो थेट हिंदुस्थानच्या दक्षिणेला बिदरपर्यंत पोचला. तलवारीच्या मुठीवरची आणि घोड्यावरची मांड पक्की असल्याशिवाय त्याकाळात हे असंभवच होतं. इस्तांबूलपासून लढत, झगडत, जगत तब्बल साडेसात हजार किलोमीटरचा पल्ला पार करुन आताच्या कर्नाटकात पोचणं साधी गोष्ट आहे का? बरं नुसता आला आणि मातीत मिळून गेला असं घडलं नाही. विजयपुरचा पाया या आदिलशाहनं घातला.
 
कर्नाटक-महाराष्ट्रातले त्यावेळचे स्थानिक राजेराजवाडे, सरदार-दरकदार भलेही नेभळट असतील पण त्यामुळं पुढं दोनशे वर्ष टिकलेल्या आदिलशाहीच्या या मूळ पुरुषाचं थोरपण उणावत नाही. मराठे, पोर्तुगिझ, बहामनी, मोगल, निजाम या सगळ्यांनाच विजयपुराची दहशत वाटत राहिली होती. दूरवरच्या इस्तांबुलमधून घोड्यावरुन आलेला, माझ्या गावाच्या पलीकडं स्वतःची सल्तनत निर्माण करणारा आणि हिंदुस्थानच्याच मातीत गाडला गेलेला युसूफ आदिलशाह मला मोठा वाटतो. आदिलशाहीच्या बाकी इतिहासातील अनिष्ट बाबींबद्दल कणभरही आस्था नाही, पण तुर्कस्थान ते विजयपुरा हा पल्ला महत्त्वाचा.    
 
पुढील स्लाईडवर वाचा.. आदिलशहाने वसवलेलं गाव..गोल घुमटांची भव्‍यता..आदिलशहाने जिवंतपणीच बांधली स्‍वत:ची थडगी...वियनगरातील सुंदर परिसर...आदिलशाहपासून घेतलेला धडा
बातम्या आणखी आहेत...