आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Blog: पुणं \'विद्वानांचं शहर\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर अधिवेशन, 6 डिसेंबर.
तामिळनाडूच्या नेत्या जयललिता यांच्या निधनामुळं अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज झालं नाही. दोन्ही सभागृहात श्रद्धाजंलीपर भाषणं झाली आणि दिवसभरासाठी कामकाज तहकूब झालं.

पुणे 'विद्वानांचं शहर'
आख्खी दुपार मोकळी. बातम्यांचा दुष्काळ. नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मुख्यालयाला भेट देऊन वेळ सत्कारणी लावला. मुंबई, नागपूर पाठोपाठ पुण्यातही मेट्रो आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर 'नागपूर मेट्रो'चं सुरु झालेलं काम पाहणं उपयोगाचं होतं. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी हा योग घडवून आणला. पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण असे नागपुराच्या मध्यातुन जाणारे एकूण 38 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचं काम अक्षरशः युद्धपातळीवर सुरु आहे. 8 हजार 680 कोटींचा हा प्रकल्प. आंतरराष्ट्रीय बँकांनी 0.6 आणि 1 टक्के व्याजदरावर दिलेल्या कर्जावर कामं सुरु आहेत. नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनच्या मुख्यालयात उलटी गणती करणारं घड्याळ लटकवलं आहे. मेट्रो प्रकल्प पूर्ण होण्यास किती दिवस, किती मिनिट शिल्लक राहिले याचा हिशोब हे घड्याळ दर सेकंदाला देतं. तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमची कामं या नियोजित वेळापत्रकाच्याही काही दिवसांनी पुढं आहेत. फंडस् मिळण्यात कोणत्याच अडचणी नाहीत. उलट सरप्लस निधी आम्हाला उपलब्ध आहे. त्यामुळं येत्या 2 वर्षात नागपुरकर मेट्रोतुन प्रवास सुरु करणार यात जराही शंका नाही. नागपूर मेट्रोचं भूमिपूजन 2014 च्या ऑगस्ट महिन्यात झालं. दोन वर्षात 30 टक्के कामं पूर्ण झाली आहेत. सध्याच्या वेग पाहता या अधिकाऱ्यांचा दावा खरा मानता येईल.

नागपूर मेट्रोची कामं पाहताना प्रस्तावित 'पुणे मेट्रो'ची तुलना मनात येणं स्वाभाविक होतं. आजच्या नागपुराची लोकसंख्या, नागपुरातील दुचाकी-चार चाकींची संख्या, शहराचा भौगोलिक पसारा यांची पुण्याशी तुलना केल्यावर एक बाब ठळकपणे जाणवते - खरं म्हणजे उशीरात उशीरा 90 च्या दशकाअखेर पर्यंत पुण्यातून मेट्रो धावायला हवी होती. तितकं द्रष्टं राजकीय नेतृत्व पुण्याला मिळालं नाही. आता खूप उशीर झालाय. तरी अजून कामांना सुरुवात नाही.

पेन्शनरांच्या पुण्यात नागरी हिताची अवास्तव (आणि अनेकदा तर भीतीदायक) काळजी करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, स्वयंघोषीत तज्ञ, पर्यावरण तज्ञ वगैरे पैशाला पासरी आहेत. इतकं असूनही या शहरातला कचऱ्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही. वाहतुकीचा बोजवारा नेहमीचाच. पर्वतीपासून पुण्यातल्या बहुतेक टेकड्यांचा गळा अतिक्रमणांनी दाबून टाकलाय. साधा नदी पात्रातला रस्ता काहींच्या विरोधानं होऊ शकलेला नाही. नितिन गडकरी म्हणाले होते त्याप्रमाणं, "पुणं हे "विद्वानांचं" शहर असल्यानं इथं प्रकल्प पूर्ण करण्यात अड़थळे फार."

वेगानं पूर्ण होणारी नागपूर मेट्रो पाहताना गडकरींनी उडवलेली ही खिल्ली सतत आठवत होती. विकासकामं पुढं नेणारी विद्वत्ता हवी की प्रत्येक कामात अडथळे निर्माण करणारी? 'नागपूर मेट्रो'ला पुण्याचं काम मिळणार; हे नागपुरचं पुण्यावरचं आक्रमण असल्याच्या तद्दन फालतू अस्मिता पुण्याच्या महापालिकेत जागवल्या गेल्या होत्या. दिल्ली, बंगळूर, कोची या शहरांमधली मेट्रो प्रत्यक्षपणे मार्गस्थ करणारी, भारतीय रेल्वेत आयुष्य काढलेली तंत्रज्ञ मंडळी 'नागपूर मेट्रो'त आहेत. यांच्या अनुभवी तांत्रिक कौशल्यावर विश्वास ठेवायचा की "पढिक" डोक्यांवर?
(नागपूर मेट्रोच्या सुसाट प्रगतीबद्दल सविस्तरपणे लवकरच लिहिण.)

पुढे वाचा, 'झिरो माईल' नागपूर !
बातम्या आणखी आहेत...