आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतमातेच्या रक्षणासाठी प्रत्येक जन्मी सैन्यात नोकरी मिळावी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘भारतीय तरुणांमध्ये देशभक्ती ओतप्रोत भरलेली आहे. युद्धाची घोषणा कधीही झाल्यास मातृभूमीच्या रक्षणासाठी जिवाची बाजी लावणारे निधड्या छातीचे असंख्य तरुण स्वेच्छेने पुढे येतील. जगात माझ्या भारतासारखा दुसरा देश नाही व सैन्यासारखी दुसरी संस्था नाही. मला भारतामध्येच शतदा जन्म मिळावा व सैन्याचीच नोकरी करण्याचे भाग्य लाभावे,’ अशा भावना ब्रिगेडियर सुरेंद्र पावामणी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’जवळ व्यक्त केल्या. त्या त्यांच्याच शब्दांत...

‘लढाई माहीत नसलेला आजचा तरुण हा तिसर्‍या पिढीतील आहे. 1971 नंतर लढाई झाली नाही. कारगिल युद्ध झाले त्या वेळीही भारताच्या तरुणाईचे रक्त सळसळले होते. असे असले तरी विदेशाचे आकर्षण वाढले आहे. 25 वर्षांपूर्वी केवळ मोजकेच तरुण नोकरीसाठी विदेशात जायचे. आज शिक्षणापासून तरुण विदेशात जात आहेत. जगातील इतर देशांइतकीच कॉर्पोरेट संस्कृतीची क्रेझ भारतात आहे. परिश्रम न करताच सर्व काही प्राप्त करण्याच्या नादात समाजिक मूल्यांच्या -हास झाला. स्वातंत्र्य मोफत उपभोगणारा तरुण नैतिकतेपासून दूर जाताना दिसतोय. प्रलोभनांचा पाठलाग करताना तो वाहवत जाताना दिसतो.

विदेशी जाण्याचीही संधी
सहाव्या वेतन आयोगाने सैन्यात गलेलठ्ठ पगार दिला आहे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये नोकरी करताना विदेशात जाण्याची संधी मिळते. मी मिडल ईस्टमध्ये एक वर्ष युनोच्या माध्यमातून सेवा केली. प्रामाणिकपणा, एकात्मता, एकनिष्ठपणा, शिस्त, समर्पणाची भावना कॉर्पोरेट जगतात अभावानेच दिसते. सैन्यातून कॉर्पोरेट जगतात जाण्याचे प्रकार असले तरी ते सैन्याचे वेस्टेज आहे. सैन्यात 50 ते 54 वयात निवृत्त होणारा अधिकारी आपली पुढील सोय करतो. सैन्याची शिस्तच त्यांना चांगली नोकरी मिळवून देते.

सामाजिक समस्या
अलीकडे सामाजिक समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सैन्यातील आपल्या भावाला कुटुंबातील व्यक्ती सांभाळून घेत नाहीत. जवान नोकरीत असताना त्याचे भाऊ जमीन लाटतात. सतत घरापासून लांब असल्याने त्याच्या समस्या सोडवण्याऐवजी वाढच करतात. प्रत्येक समस्या समाजाशी निगडित असून समाजच त्यातून मार्ग काढू शकतो.
शब्दांकन : सतीश वैराळकर

देशात महाराष्ट्र अग्रेसर
जवानांच्या समस्या सोडवण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. इथे सैन्य व स्थानिक प्रशासन हातात हात घेऊन चालतात. सैन्याची समस्या विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, प्रांत, तहसीलदार आदी सर्वच गांभीर्याने घेतात.

लष्कराचेही कॅम्पस इंटरव्ह्यू
सप्टेंबरपासून लष्करातर्फे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणार आहेत. शेवटच्या वर्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयात जाऊन मुलाखती घेतल्या जातील. प्रगत तंत्रज्ञानात निपुण असलेले विद्यार्थी वीस वर्षे सैन्यात नोकरी करतील. आगामी काळात तंत्रज्ञानावर आधारित लढाई राहील.

दोन वर्षांत आत्महत्या नाही
सैन्यात जवानांच्या सुट्यांसंबंधीचे नवीन धोरण आल्याने दोन वर्षांपासून आत्महत्या नाहीत. एक जवान वर्षाकाठी 90 दिवस पगारी रजा उपभोगतो. वर्षातून वारंवार घरी जाता यावे, यासाठी पुरेपूर काळजी घेतली जाते. आत्महत्या हा घरगुती वातावरणाशी निगडित प्रश्न आहे.

सैन्याकडे तरुणांचा ओढा
सैन्यात 14 हजार अधिकार्‍यांची कमतरता असली तरीही भरतीत तरुणांची संख्या वाढत आहे. नियम शिथिल न करता सक्षम उमेदवारच निवडले जातात. उत्तम जीवन जगण्याइतके वेतन सैन्य दलात मिळते. शिवाय सैन्यातील व्यक्तीची दिनचर्या त्यास विविध आजारांपासून दूर ठेवते.