आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्वाभिमानी’ पाय पसरतेय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


राजू शेट्टी यांनी आर.आर.पाटील यांच्या मतदारसंघात दुष्काळ निवारण परिषद घेऊन सा-या महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. ऊस उत्पादकांचे नेतृत्व करणारे शेट्टी दुष्काळी भागातील शेतक-यांसाठी कसे धावले, अशी चर्चा रंगली आहे. शेट्टींच्या या परिषदेच्या हेतूविषयी शंका घेण्याचे कारण नाही; मात्र ही राजकीय विस्ताराची नांदी आहे, हेही तितकेच खरे आहे. येणा-या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूरसह पुणे, सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात उमेदवार दिसले तर नवल वाटायला नको.

राजू शेट्टी यांचा राजकीय प्रवास प्रस्थापितांविरोधात जबरदस्त संघर्षाचा राहिला आहे. जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि खासदार हा प्रवास त्यांनी केवळ शेतक-यांच्या प्रश्नांवरील चळवळीतून केला आहे. शरद जोशी यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना हीच शेतक-यांच्या प्रश्नावर सर्वाधिक सक्रिय अन् प्रभावी राहिली आहे. त्यामुळे ओघानेच शेतकरी संघटनेचे आता राज्यपातळीवर नेतृत्व करायला राजू शेट्टी यांच्याशिवाय दुसरा पर्याय हेही, हेही तितकेच खरे आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तिस-या पर्यायासाठी मोठी पोकळी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला पर्याय म्हणून भाजप-शिवसेना युतीकडे पाहिले जाते, पण सध्या शिवसेनेची अवस्था सांगण्यासारखी नाही. भाजपलाही गटबाजीने घेरले आहे. अशा परिस्थितीत लोक तिस-या पर्यायाच्या शोधात आहेत. राज्यव्यापी तिसरा पर्याय म्हणून राजू शेट्टींकडे निश्चितच पाहता येणार नाही. सध्या त्यांची राजकीय ताकद एका विशिष्ट भागापुरती मर्यादित आहे. मात्र ऊस आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून पुणे, सोलापूर, सांगली आणि सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील ‘बंडखोर’ जिल्ह्यांमध्ये राजकीय व्यासपीठावर उपयोगी ठरतील, असे शिलेदार तयार केले आहेत.
1995 ला आघाडी सरकारविरोधातील असंतोषामुळे पश्चिम महाराष्ट्रातून निवडून गेलेले बंडखोर आमदारच युतीला सत्तेवर आणण्यासाठी निर्णायक ठरले. या वेळी 1995 सारखीच स्थिती आहे. याचा फायदा उठवण्यासाठी राजू शेट्टी यांनी राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केलेल्या दुष्काळी भागाकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. राजू शेट्टी यांना पश्चिम महाराष्ट्रातील या ‘राजकीय प्रयोगाला’ भाजपचेही पाठबळ मिळू शकते. शेट्टी यांना भलेही येथे फार मोठे यश मिळवता येणार नाही; मात्र स्वाभिमानीचे उपद्रवमूल्य वाढेल, यात शंकाच नाही.