आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swami Jayalalithaa Friendship Sometimes Good And Bad, Divya Marathi

स्वामी- जयललितांची मैत्री-वैर; कधी रंजक, तितकेच रहस्यमय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता आणि वरिष्ठ भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या राजकीय संबंधांत सातत्याने कटुता राहिली आहे. वेळोवेळी परस्परांवर त्यांनी टीका केली. या वितुष्टाची सुरुवात ९० च्या दशकात झाली.
१९९२ मध्ये तामिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (टिडको)च्या अध्यक्षा आयएएस चंद्रलेखा यांनी यातील निर्गुंतवणुकीचा विरोध केला. त्यामुळे मुख्यमंत्री जयललितांना माघार घ्यावी लागली. काही दिवसांतच चंद्रलेखावर अ‍ॅसिड हल्ला झाला. यात जयललितांचा हात असल्याचा आरोप झाला.चंद्रलेखा यांना स्वामींनी समर्थन दिले. चंद्रलेखा यांनी नोकरी सोडून स्वामींच्या पक्षात प्रवेश केला. याच वर्षी तािमळनाडू लघु उद्योग निगम (तांसी)ची काही संपत्ती जया पब्लिकेशन व शशी इंटरप्रायजेसद्वारा खरेदी केल्याने वादाला तोंड फुटले. यात जयललिता व शशिकला या भागीदार होत्या. स्वामींच्या याचिकेत सरकारचे ३.५ कोटींचे नुकसान झाल्याचे नमूद केले होते. २००१ मध्ये जयललितांची निर्दोष सुटका झाली.

स्वामींच्या तक्रारीनंतर १९९५ मध्ये तत्कालीन राज्यपाल चन्ना रेड्डी यांनी जयललिता यांच्याविरुद्ध तांसी व कोळसा डील प्रकरण चालवण्यास परवानगी दिली. स्वामीद्वारे लिट्टे प्रमुख प्रभाकरनला ‘इंटरनॅशनल परियाह’(तामिळमध्ये दलितांसाठी अपशब्द) असे संबोधण्यात आल्याचा आरोप जयललितांनी केला. त्यावर स्वामींना अटक करण्यासाठी छापे टाकण्यात आले. हे प्रकरण फार लांबले. सध्या स्वामींची प्रतिमा भ्रष्टाचार विरोधी आंदोलक अशी तयार झाली आहे.

१९९६ मध्ये त्यांनी जयललिता यांच्यािवरुद्ध बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा खटला दाखल केला. त्यासाठी त्यांना २७ दिवसांचा कारावास झाला. त्या काळात दोघांमधील नाते सौहार्दाचे झाले. स्वामींनी १९९९ मध्ये एका मुलाखतीत सांगितले, जयललितांनी कारावासात असताना त्यांच्याशी संपर्क केला. मला तुमच्याशी वैर घ्यायचे नाही, असे जया बोलल्याचे त्यांनी सांगितले. करुणानिधींविरुद्ध आपण एकी करू, असा निरोप त्यांनी स्वामींना दिला. १९९८ मध्ये लोकसभा निवडणुकीत एआयएडीएमके व जनता पार्टीने मिळून निवडणूक लढवली. स्वामी मदुराई सीटवरून जिंकले. जयललिताने तत्कालीन अटलबिहारी सरकारमध्ये स्वामींना अर्थमंत्री बनविण्यासाठी मोठे लॉबिंग केले होते. मात्र हा प्रयत्न अयशस्वी राहिला.

एप्रिल १९९९ मध्ये स्वामींनी एक टी पार्टी आयोजित केली. यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व जयललिता सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर जयललितांनी अटलबिहारी सरकारचे समर्थन काढून घेतले. त्यामुळे सरकार पडले. त्यानंतरच्या निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत आली. जयललितांनी स्वामींची साथ कायमची सोडली.