आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपयशांची जबाबदारी स्वत: घेणे आवश्यक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्व-तंत्र हा अतिशय सुंदर शब्द आहे. स्वत:चे तंत्र अवगत झाले आहे, अशी व्यक्ती म्हणजे स्वतंत्र. तंत्र म्हणजे तंत्रज्ञान किंवा आंतरिक कलागुणांचे दार उघडणारी किल्ली. ही किल्ली कुठेही मिळत नाही, तर ती घडवावी लागते. ती रेडिमेड नसते तर ग्राहकानुसार तयार करावी लागते. ज्या व्यक्तीला हे तंत्र गवसते ती आयुष्यातील अनेक बंधनांत राहूनही स्वतंत्र असते. चिखलात राहूनही उमलण्याचे रहस्य जाणते. अशी निर्भीड, निर्मळ, निरामय व्यक्ती स्वतंत्र असते.
स्वातंत्र्य ही खूप मोठी जबाबदारी असते. मग ती कोणत्याही पातळीवर असो. राजकीय, मानसिक किंवा आत्मिक. कारण स्वातंत्र्य म्हणजे स्वत:ची संपूर्ण जबाबदारी उचलणे. स्वत:च्या अपयशांची जबाबदारी उचलण्याएवढे कणखर लोक खूप कमी असतात. स्वतंत्र लोक पराभव पत्करण्यासाठी स्वतंत्र असतात तसेच विजयी होण्यासाठीदेखील स्वतंत्र असतात. सुखी आणि दु:खी होण्यासाठीही ते स्वतंत्र असतात. त्यांना निरोगी राहण्याचे आणि प्रकृती बिघडवून घेण्याचेही स्वातंत्र्य असते. त्यामुळे स्वतंत्र होण्यासाठी बळकट खांदे आणि प्रबळ आत्मविश्वास हवा. स्वातंत्र्याची जबाबदारी पेलणारे खांदेही बळकट असालयास हवेत.


स्वातंत्र्य अनेक प्रकारचे असते. मनाचे, भावनांचे, विचारांचे, सवयींचे स्वातंत्र्य व माणसाच्या प्रत्येक पातळीवरील स्वातंत्र्य. आज मानसिक स्वातंत्र्याची गरज आहे. गुलामगिरी ही केवळ परकीयांचीच नसते, तर ती आपल्याच जुन्या मानसिकतेची असते, जुन्या समज-गैरसमजांची आणि अंधश्रद्धांची गुलामगिरी असते. या गुलामगिरीची आपल्याला अजिबात जाणीव नाही. आपण जागृत होऊन घाव घालणार नाहीत तोवर या गुलामगिरीतून आपली
सुटका होणार नाही. आपण भानावर आलो तरच आंतरिक अंधार दूर होईल, अन्यथा निरोगी आयुष्य जगणे शक्य नाही. स्व-तंत्र आणि स्व-स्थ (निरोगी) या दोहोंमधील ‘स्व’ खूप महत्त्वाचे आहे.


भारतीय परंपरेनुसार आयुष्य म्हणजे ‘स्व’त:ला निरोगी आणि निर्मळ बनवण्याची साधना. नवी पिढी मानसिकरीत्या स्वतंत्र असेल तरच ती समाज आणि पर्यायाने देश स्वतंत्र करेल. पण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांना स्वत:शी संघर्ष करावा लागेल. काम हेच त्यांचे ध्येय असेल आणि हाच त्यांचा आधुनिक स्वातंत्र्य लढा असेल.