आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

20 वर्षांनंतर म्हटले, थँक यू टीचर !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काल मी अधिकायांच्या एका कार्यक्रमाला गेले होते. दुपारी जेवणाचा ब्रेक झाला. एक अधिकारी माझ्या जवळ आले आणि म्हणाले, ‘मॅडम, आपकी मॅथ्स की टीचर मेरी सास है.’ वीस वर्षांपूर्वीचा काळ अगदी स्मृतिपटलावर ताजा झाला. मी त्या अधिकाऱ्यास म्हटले, माझे टीचरशी बोलणे करून द्या. दोन दशकांनंतर मी पहिल्यांदा टीचरशी बोलत होते. मी माझ्या टीचरला पहिला शब्द म्हटला थँक यू मॅडम! आज मी ज्या शिखरावर आहे त्यात माझ्या शिक्षकांचे योगदान मोठे आहे, हे मला विसरता येण्यासारखे नाही. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी ‘दिव्य मराठी’सोबत बोलत होत्या.

स्मृती इराणी गणिताच्या शिक्षिका श्रीमती गौरी बॅनर्जी यांच्याबद्दल भरभरून बोलायला लागल्या. शिक्षक दिन जवळ येऊन ठेपला असताना कालच त्यांच्याशी बोलता आले याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. आर.के.पुरम येथील होली चाइल्ड ऑक्जिलियम स्कूलमध्ये इयत्ता ९वीमध्ये असताना बॅनर्जी मॅडम मला गणित शिकवायच्या. मला चांगले आठवते; त्या मला खूप रागवायच्या आणि प्रसंगी मी त्यांचा मारही खाल्ला होता. काल त्यांच्याशी बोलणे झाले तेव्हा मी याची आठवण करून दिली आणि प्रेमाने त्यांना ‘थँक यू मॅडम’ म्हटले. शिक्षकांच्या रागावण्यात एक जिव्हाळा दडलेला असतो. आपला विद्यार्थी चांगला घडावा, अशी शिक्षकाची तळमळ असते. त्यासाठी ते धडपडतात. मला बॅनर्जी मॅडमच्या भावना कळत होत्या; परंतु ते वय समजून घेण्याचे तरी कुठे होते. प्रत्येकाचेच तसे असते. वयाच्या एका टप्प्यावर आल्यावर आणि आपल्या आयुष्याला चांगली दिशा मिळाली की शिक्षकांचे महत्त्व कळते आणि त्यांनी तेव्हा रागावण्याचा अर्थबोधही होतो.

मी आता देशाची शिक्षणमंत्री आहे. प्रत्येकाने शिक्षकांचा अभिमान बाळगायला पाहिजे अशी पिढी तयार व्हावी, असे मला वाटते. मी विद्यार्थ्यांना विचारते, मोठेपणी तुला काय व्हायचे आहे. मुलगा असो की मुलगी त्यांच्याकडून उत्तर येते, मला इंजिनिअर व्हायचे आहे, डॉक्टर व्हायचे आहे, आयटीमध्ये नाव कमवायचे आहे... परंतु मला शिक्षक व्हायचे आहे असे उत्तर अपवादानेच येते. मला हे बदलायचे आहे. मला शिक्षक व्हायचे आहे, असे अनेकांच्या तोंडून निघायला पाहिजे त्यासाठी शिक्षकाचे महत्त्व वाढवणे गरजेचे आहे. त्यांचा आदर आणि सन्मान ही बाब महत्त्वाची आहे. दरवर्षी शिक्षक दिन येतो आणि जातो; तो महोत्सव म्हणून साजरा व्हायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात शिक्षकाचे महत्त्व बिंबवावे लागणार आहे.

स्मृती इराणी शिक्षक दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशाला एक संदेश देणार आहेत. त्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगताना शिक्षकांबद्दलचा आदरभाव त्यात व्यक्त केला.

माँ,पिता, दोस्त, गाईड...
ये सारे किरदार निभाये जिसने
चेहरों के समन्दर में,
हर एक चेहरे को अनोखा माना जिसने
सही सवाल के साथ साथ,
सही जवाब देना सिखाया जिसने
हमारे आनेवाले कल को,
अपने आज से सींचा जिसने
हमारे कंधों को,
हर जिम्मेदारी उठाने के
काबिल बनाया जिसने
गलतियों में डांट,
पर उस डांट मे प्यार छुपाया जिसने
आपका शिक्षक आपका टीचर,
जिन्होने आप को बनाया
आज उनका दिन मनाईये,
कहिये थैंक यू टीचर!

शंभरीचा आनंद!
भाजपसरकारला दोन दिवसांपूर्वीच 100 दिवस पूर्ण झालेत. आपण शंभर दिवसांचे मूल्यांकन कसे करता? असा प्रश्न विचारला तेव्हा स्मृती इराणी म्हणाल्या, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करतो. खूप राबवून घेतात. मंत्री म्हटले की आधी मजेचे पद असल्याचा समज होता; परंतु प्रत्यक्षात तसे नाही. जेवढा वेळ दिला तेवढा कमीच आहे. प्रत्येक जण झपाटल्यागत काम करतो. विशेष म्हणजे भाजपने जो वचननामा प्रकाशित केला होता त्यानुसार सरकारने या दिवसांत काम केले आहे. आम्हाला त्याचे समाधान आहे.